पोलिसांनी तपास करण्याची वनखात्याची मागणी
फोंडा पोलीस स्थानकातील गृहरक्षक दिनेश गावडे (48) यांचा मृत्यू हा गव्याच्या हल्ल्यात झाला की मानवी हल्ल्यात याचा तपास केला जावा, अशी सूचना वनखात्याने एका पत्राद्वारे पोलिसांना केली आहे. खात्याचे उपवनसंरक्षक जे. के. वर्की यांनी दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक संतोष देसाई यांना पत्र लिहून वरील मागणी केली आहे. गृहरक्षक दिनेश गावडे यांचा बेतोडा येथे झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
गृहरक्षक गावडे हे गवारेड्याच्या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाल्याचे व त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरले होते. मात्र, आता वनखात्याने त्याविषयी शंका व्यक्त केलेली असून पोलिसांना या घटनेची कसून चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत.
मयत दिनेश गावडे यांच्या झालेल्या शवचिकित्सेत ज्या जखमा आढळून आल्या आहेत त्या गवारेड्याच्या हल्ल्यात होणाऱ्या जखमांसारख्या नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे या हल्ल्याविषयी संशय निर्माण झालेला आहे. त्याशिवाय दिनेश गावडे यांच्यावर बेतोडा येथील ज्या ठिकाणी हा हल्ला झाला होता त्या ठिकाणी वनखात्याला गवा रेड्याच्या पायाचे ठसे, शेण अथवा केस असे कोणतेही पुरावे मिळाले नसल्यानेही शंका निर्माण झाली आहे.वनमंत्री विश्वजीत राणे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून वनखात्याला सखोलपणे चौकशी करण्याच्या सूचना केल्या आहेत.
दुचाकीला धडक
बेतोडा येथे बुधवारी रात्री दुचाकीवरून जात असताना दिनेश तुळशीदास गावडे (48, रा. उडीवाडा-उसगाव) यांचा गव्याचा धक्का बसून मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. दिनेश गावडे हे फोंडा पोलीस हद्दीत गृहरक्षक म्हणून काम करीत होते.