Home Featured पाकच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानात 400 ठार

पाकच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानात 400 ठार

0

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून, काबूलमध्ये पाकिस्तानने सोमवारी रात्री एका रुग्णालयावर हवाई हल्ला केला. त्यात 400 लोक ठार झाले, तर 250 हून अधिक लोक जखमी झाले. पाकिस्तानने मात्र तालिबानचा हा दावा फेटाळला आहे. काबूल या ठिकाणी नशामुक्ती केंद्र असलेल्या एका रुग्णालयावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला, असे अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते शराफत जमान यांनी सांगितले. दरम्यान, पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू राशिद खानने संताप व्यक्त केला.

तालिबानच्या माहितीनुसार रात्री 9 च्या सुमारास पाकिस्तानकडून हा हवाई हल्ला करण्यात आला. रुग्णालयावर बॉम्ब टाकला गेल्याने 400 लोक ठार झाले, तर 250 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.

दुसरीकडे या प्रकरणी पाकिस्तानने कानावर हात ठेवले आहेत. आम्ही हा हल्ला केलेलाच नाही. आम्ही जो हवाई हल्ला केला तो दहशतवादी तळांवर केला. सामान्य नागरिकांना आम्ही ठार केले नाही, असे पाकने म्हटले आहे.

हल्ल्याचे व्हिडीओ व्हायरल
अफगाणिस्तान सरकारच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ज्या रुग्णालयावर हल्ला करण्यात आला ते दोन हजार खाटांचे सुसज्ज रुग्णालय होते. अशा पद्धतीने रुग्णालयावर हल्ला केला जाणेे आणि सामान्य नागरिकांचा जीव घेणे ही बाब अतिशय निंदनीय आहे. पाकने हे वृत्त नाकारले असले तरीही स्फोटाचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर आगीचे लोळ आणि धुराचे लोट हे दिसून येत आहेत.

भारताने व्यक्त केला निषेध
भारताने या हल्ल्यानंतर पाकचा तीव्र शब्दात निषेध केला असून सामान्य नागरिकांना लक्ष्य करणारे हे भ्याड आणि अक्षम्य कृत्य असल्याची टिप्पणी केली आहे. काबूलमधील ओमिद व्यसनमुक्ती उपचार रुग्णालयावर पाकिस्तानने केलेल्या अमानुष हवाई हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. हे एक भ्याड आणि अमानवीय हिंसक कृत्य आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.