Home Featured डिचोलीतील पिता-पुत्राच्यामृत्यू प्रकरणाचे कोडे उलगडले

डिचोलीतील पिता-पुत्राच्यामृत्यू प्रकरणाचे कोडे उलगडले

0

नाईकनगर-बोर्डे-डिचोली येथील एका घरात सोमवारी वडील व मुलाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता. मात्र त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते. वडील संजय म्हापसेकर (58) यांनी पहिल्यांदा आपल्या 14 वर्षीय मुलाचा खून केला आणि नंतर स्वतः आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तसेच घटनास्थळी सापडलेल्या 12 पानी चिठ्ठीतून मुलाच्या खुनाचे कारणही समोर आले आहे.

डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी सायंकाळी सुमारे 6.49 च्या सुमारास उघडकीस आली. पणजी येथील राज्य पोलीस नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीकडून फोनवरून डिचोलीतील बोर्डे येथील नाईक नगर भागातील एका भाड्याच्या घरात आत्महत्येची घटना घडल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर डिचोली पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घरात प्रवेश केल्यानंतर पोलिसांना दोन मृतदेह आढळले.

सदर मृतदेह संजय शशिकांत म्हापसेकर (58) आणि त्यांच्या मुलाचा असल्याचे स्पष्ट झाले. संजय म्हापसेकर यांचा मृतदेह जमिनीवर, तर मुलाचा मृतदेह पलंगावर आढळून आला.

मंगळवारी गोमेकॉमध्ये करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार, 14 वर्षीय मुलाचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे स्पष्ट झाले, तर संजय म्हापसेकर यांचा मृत्यू विषारी पदार्थ सेवनामुळे झालेल्या श्वासरोधामुळे झाला, असे समोर आले.

संजय म्हापसेकर यांनी आपल्या मुलाची हत्या करून नंतर आत्महत्या केली, असा निष्कर्ष वैद्यकीय अहवाल, सुसाईड नोट आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी काढला आहे. या प्रकरणी डिचोली पोलीस स्थानकात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिठ्ठीत काय लिहिले होते?
घटनास्थळी तपासादरम्यान पोलिसांना संजय म्हापसेकर यांनी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली होती. या चिठ्ठीत त्यांनी मुलाचे अभ्यासात दुर्लक्ष, गैरवर्तन आणि बेशिस्त या संदर्भात सुरू असलेल्या वादांचा उल्लेख केला होता. तसेच मुलाच्या वागणुकीमुळे कुटुंबाच्या, विशेषतः मुलीच्या भवितव्यावर परिणाम होईल, अशी भीती त्यांनी चिठ्ठीतून व्यक्त केली होती.