पाकच्या छुप्या युद्धाला चोख उत्तर देऊ : पर्रीकर

0
103

परिणाम सहा महिन्यात दिसतील
जम्मू-काश्मीरमध्ये बर्‍याच काळापासून चालू असलेल्या छुप्या युद्धाला पाकिस्तानचा पाठिंबा असल्याच्या लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग यांच्या वक्तव्याची दखल संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गंभीर दखल घेतली असून या छुप्या युद्धाविरोधात योग्य पावले उचलण्यात येणार व त्याचे परिणाम येत्या सहा महिन्यात दिसून येतील असा सज्जड इशाराही दिला आहे.जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतीय हद्दीत दहशतवाद्यांकडून होणारी घुसखोरी व या भागातील पाक सैनिकांकडून होणारे शस्त्रसंधी उल्लंघनाचे सातत्यपूर्ण प्रकारांचा कठोरतेने बिमोड करण्याचा संदेशही पर्रीकर यांनी याद्वारे पाकला दिला आहे. योग्य उपाययोजनेनंतर शत्रूला छुपे युद्ध खेळण्यात रस राहणार नाही, असेही पर्रीकर म्हणाले. भारताला पाकिस्तानशी शांततापूर्ण संबंध हवे आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले. विशेष म्हणजे सध्या पाकिस्तान दौर्‍यावर असलेले अमेरिकेचे विदेश सचिव जॉन केरी यांनीही पाकिस्तानने लष्करे तैयबा, तालिबान व हक्कानी यासारख्या दहशतवादी गटांचा बिमोड करण्यासाठी जोरदार पावले उचलण्याची सूचना केली आहे.
दरम्यान, एका वार्षिक पत्रकार परिषदेत बोलताना देशाचे लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग यांनीही जम्मू-काश्मीरमधील छुप्या युद्धाला पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचा आरोप केला. या छुप्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतासाठी धोका निर्माण होण्यासह आव्हानेही वाढली असल्याचे ते म्हणाले.
अलीकडेच पेशावरमधील शाळेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर तरी पाक लष्कराच्या वर्तनात बदल झाला आहे की काय हे पाहण्यासाठी थोडे थांबून पहावे लागेल अशी टिप्पणी त्यांनी केली.