नुवेतील घरफोडीत लाखोंच्या ऐवजाची लूट

0
90
नुवे येथील गोम्स यांच्या बंगल्यावर दरोडा घालून लुट करणार्‍या अज्ञातांनी आतील सामान असे अस्ताव्यस्त टाकून दिले. (छाया : गणादीप शेल्डेकर)

वृद्ध दांपत्यावर प्राणघातक हल्ला
कुपे-नुवे येथे काल पहाटे राज गोम्स यांच्या घरात घुसून अज्ञात चोरांनी राज गोम्स व इझाबेला गोम्स या वृद्ध दांपत्यावर प्राणघातक हल्ला करून लाखो रुपयांचा ऐवज पळविला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून बेशुद्ध आहेत. त्यांच्यावर खाजगी इस्पितळात उपचार सुरू आहेत.कुपे-नुवे येथे राज गोम्स (६२) व पत्नी इझाबेथ गोम्स (५५) या तळमजल्यावरील खोलीत झोपली होती. तर बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर मुलगी इझाबेला गोम्स व जावई केलवीन व्हिएगश व मुले झोपली होती. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास स्वयंपाक घरातील खिडकीचे गज काढून चोरटे आत घुसले व वरच्या मजल्यावरील खोलीला बाहेरून कडी लावली. त्यानंतर खाली राज गोम्स यांच्या खोलीत घुसले. चोरांचा आवाज ऐकून राज गोम्स जागे झाले व चोरांना जाब विचारताच त्यांनी त्यांच्यावर दंडुक्याने डोक्यावर प्राणघातक हल्ला केला. ते बेशुद्ध होऊन रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळले. त्यानंतर त्यांची पत्नी इझाबेला गोम्स यांनाही मारहाण झाली. कपाटातील माळ व रोख चार हजार रुपये नेल्याचे सांगण्यात आले. ती दोघेही बेशुद्ध असल्याने चोरीत कोणत्या वस्तू नेल्या याची माहिती मिळू शकली नाही. सकाळी पाच वाजता मायणा कुडतरी पोलिसांना समजताच निरीक्षक हरीश मडकईकर, उपअधीक्षक मोहन नाईक यांनी धाव घेतली. त्यानंतर पोलीस अधीक्षक शेखर प्रभूदेसाई, पोलीस उपमहानिरीक्षक रंगनाथन यांनी भेट देवून पहाणी केली.
सायंकाळी दक्षिण गोव्यातील सर्व पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेवून रंगनाथ यांनी दक्ष राहण्याचा इशारा दिला. सध्या गोम्स दांपत्य बेशुद्ध असल्याने विशेष माहिती मिळू शकत नाही असे रंगनाथन यांनी सांगितले.