Home बातम्या पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गदारोळ

पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गदारोळ

0

>> लोकसभेचे कामकाज 4 वेळा तहकूब; राज्यसभेतही डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावरुन गोंधळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काल पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यांवरून राज्यसभा आणि लोकसभेत गदारोळ पाहायला मिळाला. या मुद्द्यांवर चर्चा व्हावी अशी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी केली. दिवसभरात लोकसभा चार वेळा तहकूब करण्यात आली. त्यानंतर दुपारी 4 वाजता लोकसभेचे कामकाज मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरून लोकसभेत विरोधकांनी काल गदारोळ केला. सरकारचे प्रमुख या नात्याने पंतप्रधानांनी या मुद्द्यांवर सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. ही मागणी मान्य न झाल्याने विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे लोकसभा चार वेळा तहकूब करण्यात आली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये शस्त्रविराम घडवून आणल्याचा जो दावा केला होता, त्या दाव्यावरुन काल लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीकडे विरोधकांचा गदारोळ झाला. या गदारोळात राज्यसभेत एक विधेयक मंजूर करण्यात आले. तसेच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे जस्टिस यशवंत वर्मा यांना हटवण्याचा प्रस्तावही संसदेत मांडला गेला.

संसदेच्या दोन्ही सदनांचे कामकाज सुरू झाले, तेव्हा पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमध्ये लागू करण्यात आलेल्या ‘एसआयएआर’वर चर्चा करा ही मागणी विरोधकांनी केली आणि गदारोळ करण्यास सुरुवात केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षातील सदस्यांना प्रश्नोत्तराचा तास चालू द्या अशी विनंती केली. मात्र विरोधकांनी घोषणा सुरू ठेवल्या आणि ते सगळे सभागृहातील मोकळ्या जागेत आले. ज्यानंतर ओम बिर्ला यांनी दुपारी 12 वाजेपर्यंत लोकसभा तहकूब केली. 12 वाजता पुन्हा कामकाज सुरू झाले, तेव्हा पुन्हा एकदा मोकळ्या जागेत उतरुन विरोधी पक्षातील खासदारांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करा, अशी मागणी विरोधी पक्षातील खासदारांनी केली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की आम्ही प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहोत. तुम्ही सभागृहाचे कामकाज चालू द्या. मात्र विरोधकांचा गदारोळ सुरू राहिला.

राहुल गांधींना बोलण्याची संमती नाकारली
लोकसभेतल्या या गदारोळानंतर राहुल गांधी यांनी बोलण्याची संमती मागितली जी त्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे पुन्हा गदारोळ झाला. ज्यानंतर लोकसभेचे कामकाज आधी चार वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

राज्यसभेत काय घडले?
राज्यसभेत मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर विरोधी पक्षातील खासदारांनी ऑपरेशन सिंदूरबाबत चर्चा करा अशी मागणी केली. नियम 267 च्या अंतर्गत चर्चा करा अशी विनंतीही केली. देशावर जेव्हा पहलगामचा दहशवादी हल्ला झाला तेव्हा सगळे विरोधक सरकारच्या बरोबर उभे होते. पण 22 एप्रिलला झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर अजूनही तो हल्ला करणारे दहशतवादी सापडलेले नाहीत किंवा त्यांना शोधून ठार मारण्यात आलेले नाही, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.