राज्यात धर्मांतरविरोधी कायदा तयार करण्याची गरज आहे. या नवीन कायद्याला विरोधी पक्षांनी सहकार्य केले पाहिजे, असे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना काल केले.
आमदार प्रेमेंद्र शेट आणि क्रूझ सिल्वा यांनी एका लक्षवेधी सूचनेद्वारे उत्तरप्रदेश पोलिसांनी धर्मांतरण प्रकरणामध्ये गोव्यातून अटक केलेल्या आयेशा नामक महिलेचा मुद्दा उपस्थित केला. हा विषय सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेचा आहे, असे दोनही गटातील आमदारांनी चर्चेत बोलताना सांगतिले.
धर्मांतर प्रकरणी आयेशा उर्फ एस. बी. कृष्णा उर्फ निक्की (35 वर्षे) ह्या जुने गोवेत राहणाऱ्या महिलेला उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केल्याचा मुद्दा प्रेमेंद्र शेट यांनी उपस्थित केला.
उत्तर प्रदेश पोलिसांनी जुने गोवेतून अटक केलेली आयेशा ही बेकायदा धर्मांतरणाच्या कारवायांमध्ये गुंतलेली आहे. या महिलेच्या कारवायांबाबत गोवा पोलीस अनभिज्ञ आहेत. या महिलेच्या बँक खात्यात विदेशातून मोठ्या प्रमाणात निधी जमा होत आहे. सदर महिला निधी वेगवेगळ्या खात्यात वळवत आहे. या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रेमेंद्र शेट यांनी केली.
गोव्यातही ‘लव्ह जिहाद’
देशातील अनेक राज्यांनी जबरदस्तीने धर्मांतर करण्यावर बंदी घालणारा धर्मांतरविरोधी कायदा मंजूर केला आहे. गोव्याला सुध्दा अशा प्रकारचा कायदा तयार करावा लागणार आहे. राज्यात विशिष्ट हेतूने ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे घडत आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आयेशा फक्त सुट्टीत गोव्यात येत होती : मुख्यमंत्री
आयेशा ही गोव्यात राहत नव्हती, तिचे पालक गोव्यात राहतात. सुट्टीत ती गोव्यात येत होती. या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू असल्याने सविस्तर माहिती जाहीर केली जाऊ शकत नाही. उत्तरप्रदेश पोलीस याप्रकरणी तपास करीत असून, गोवा पोलीस त्यांना सहकार्य करीत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.