पश्‍चिम बंगाल, ओडिशा राज्यांची पंतप्रधानांकडून हवाई पाहणी

0
129

>> बैठकीस ममतांनी मोदींना ठेवले ताटकळत

‘यास’ चक्रीवादळाच्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल पश्चिम बंगाल आणि ओडिशाला भेट दिली. पंतप्रधान मोदींनी आधी चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची हवाई पाहणी केली. पंतप्रधान मोदींनी चक्रीवादळाने नुकसान झालेल्या राज्यांसाठी १००० कोटींची मदत जाहीर केली.
यानंतर पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे मुख्य सचिव हे ३० मिनिटे उशिरा पोहोचले. बैठकीत उपस्थित झाल्यानंतर त्यांनी चक्रवादळासंबंधी कागदपत्रे दिली. आपल्याला दुसरी बठक असल्याचे सांगून त्या निघूनही गेल्या. यावेळी पंतप्रधान मोदींसह राज्यपाल जगदीप धनखड, पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि केंद्रीय राज्यमंत्री देवश्री चौधरी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींनी दोन्ही राज्यांना प्रत्येकी ५०० कोटींच्या आर्थिक मदतीसह केंद्रीय पथक पाठवणार असल्याची घोषणा केली. चक्रीवादळातील मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख आणि गंभीर जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली.

ममतांचे स्पष्टीकरण
ममता बॅनर्जीनी त्यावर स्पष्टीकरण देताना पंतप्रधान मोदींनी बैठक बोलावली. पण दीघामध्ये आपली बैठक आहे हे आपल्या लक्षात नव्हते. यामुळे बैठकीला जाऊन पंतप्रधानांना अहवाल दिला. यानंतर पंतप्रधानांची परवानगी घेऊन आपण बैठकीतून बाहेर पडल्याचे सांगितले.

दुःखदायक प्रकार ः राजनाथ
राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरून पश्चिम बंगाल सरकारवर अर्थात अप्रत्यक्षपणे ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालमधला आजचा घटनाक्रम धक्कादायक आहे. पंतप्रधानांसोबत अशा प्रकारचा व्यवहार दु:खदायक असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.