पश्‍चिम बंगालमध्ये दुसर्‍या टप्प्यात ८० तर आसामात ७३ टक्के मतदान

0
152

>> नंदीग्राममध्ये प्रसारमाध्यमांच्या वाहनांवर दगडफेक

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी काल गुरूवारी दुसर्‍या टप्प्यातील ३० जागांसाठी ८०.४३ टक्के मतदान झाले. तर आसाममध्ये ७३.०३ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. पश्‍चिम बंगालमध्ये दुसर्‍या टप्प्यातील ३० मतदारसंघांसाठी हे मतदान झाले. दक्षिण २४ परगणा, बांकुरा, पश्चिम मिदनापूर, पूर्व मिदनापूर या जिल्ह्यांमध्ये हे मतदान झाले. या निवडणुकीत १७१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

पश्‍चिम बंगालमधील नंदीग्राममध्ये मुख्यमंत्री व तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी व भाजपतर्फे पूर्वाश्रमीचे तृणमूल कॉंग्रेसचे सुवेंदू अधिकारी यांच्यात थेट लढत होत आहे. या ठिकाणी ८०.७९ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यासाठी सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाले. नंदीग्राममध्ये प्रसारमाध्यमांच्या गाड्यांवर अज्ञातांनी हल्ला करत दगडफेक केली.

दरम्यान, यावेळी ममता बॅनर्जी यांनी, नंदीग्राममध्ये भाजपचा कधीच विजय होणार नाही. नंदीग्राममधील ९० टक्के मतदान हे मलाच झाले असून ही निवडणूक मीच जिंकणार असल्याचा दावा केला. तर अधिकारी यांनी, ममतांनी २ तास मतदान रोखून धरले. अन्यथा इथे ९० टक्के मतदान झाले असते. ममता यांनी हे सर्व नाटक केले आहे. या ठिकाणी तृणमूल कॉंग्रेसचा एकही कार्यकर्ता नव्हता. ममतांना इथे पाठिंबाही नाही. त्यामुळे त्यांचा पराभव निश्‍चित असल्याचा दावा केला.
ममता बॅनर्जी या गेल्या ५ दिवसांपासून नंदीग्राममध्ये ठाण मांडून होत्या. त्यांनी काही मतदान केंद्रांना भेटीही दिल्या. दुसरीकडे सुवेंदू अधिकारी यांनीही मतदान केंद्रांना भेटी देत जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, आसाममध्येही दुसर्‍या टप्प्यासाठी काल मतदान झाले. यावेळी ही मतदानाची टक्केवारी ७३.०३ टक्के असल्याची माहिती आयोगाने दिली.