अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

0
186

दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना २०१९चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला. ५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने रजनीकांत यांना गौरवण्यात येणार असल्याची घोषणा काल गुरूवारी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. यावेळी कोरोना संसर्गामुळे सर्व पुरस्कारांची घोषणा उशिरा करण्यात आली. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणाही करण्यात आली होती. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो.

मंत्री जावडेकर यांनी यावेळी सांगितले की, रजनीकांत गेली अनेक दशके चित्रपटसृष्टीत वावरत आहेत. अभिनेते, निर्माते आणि लेखक म्हणून त्यांचे सिनेसृष्टीतील योगदान महत्त्वपूर्ण आहे. यावर्षी आशा भोसले, मोहनलाल, विश्वजित चटर्जी, शंकर महादेवन आणि सुभाष घई या सर्व निवड सदस्यांनी एकमताने हे नाव दिले आहे. दरम्यान, रजनीकांत हे फाळके पुरस्कार मिळालेले १२ वे दाक्षिणात्य कलाकार आहेत.

रजनीकांत यांचे हिट चित्रपट
रजनीकांत यांनी एकाहून एक हिट सिनेमे दिले आहेत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत आजही त्यांची जादू कायम आहे. रजनीकांत यांच्या सुपरहिट हिंदी चित्रपटात दरबार, २.०, द रोबोट, त्यागी, चालबाज, अंधा कानून, कबाली, खून का कर्ज, दोस्ती दुश्मनी, इंसाफ कौन करेगा या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल.