पवार- शहा भेटीच्या वार्तेने महाराष्ट्रात राजकीय खळबळ

0
82

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, पक्षनेते प्रफुल्ल पटेल आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात नुकतीच अहमदाबादेत एका फार्महाऊसमध्ये भेट झाल्याचे वृत्त एका गुजराती दैनिकाने दिल्याने महाराष्ट्रात राजकीय खळबळ निर्माण झाली आहे.
दरम्यान, या कथित गोपनीय भेटीबाबतचे रहस्य वाढवताना रविवारी अमित शहा यांनी ‘सगळ्याच गोष्टी जाहीर करता येत नाहीत’ असे संदिग्ध विधान केल्याने प्रकरणात अधिक रंगत आली. पवार यांची भेट झाल्याचा त्यांनी इन्कार न केल्याने महाराष्ट्रात खळबळ निर्माण झाली. अशा प्रकारची कोणतीही बैठक झाली नसल्याचा निर्वाळा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला, परंतु नंतर ‘शहा आणि पवारसाहेब भेटले असतील तर त्यात चिंता करण्यासारखे काय आहे?’ अशी भूमिका त्यांनी घेतली.

या दरम्यान पवार हे आजारी असून इस्पितळात दाखल होत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलीक यांनी जाहीर केले व पवारांचे केरळ व पश्‍चिम बंगालमधील प्रचार दौर्‍यासह सर्व कार्यक्रम रद्द झाल्याचे सांगितल्याने शहा – पवार भेटीबाबत अधिक कुतूहल निर्माण झाले आहे.

पवारांवर बुधवारी शस्त्रक्रिया
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा पित्ताशयाचा आजार बळावला असून त्यांच्यावर उद्या बुधवारी ३१ मार्च रोजी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ऐंशी वर्षीय पवार यांच्यावर २००४ साली कर्करोगाची शस्त्रक्रिया झाली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवक्ते नवाब मलीक यांनी ट्वीट करून पवारांच्या आजाराची माहिती दिली. पवार यांचे पुढील सर्व कार्यक्रम तूर्त रद्द करण्यात आले असल्याचेही मलीक यानी म्हटले आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी फोन करून आपली चौकशी केल्याबद्दल स्वतः पवार यांनी ट्वीट करून त्यांना धन्यवाद दिले.