पर्रीकरांना विमानतळावर हृद्य निरोप

0
85

मावळते मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल दाबोळी विमानतळावर भावूक मनःस्थितीत आपल्या खाजगी गाडीतून उतरून आपल्या शेकडो समर्थकांचा निरोप घेतला.संध्याकाळी ५ वाजल्यापासून दाबोळी विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. निमित्त होते गोव्याचे मावळते मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना निरोप देण्याचे. तत्पूर्वी भाजपाचे मंत्री, आमदार यांच्या गाड्यांचा ताफा येत राहिला. गोवा भाजपाध्यक्ष विनय तेंडुलकर, मंत्री मिलिंद नाईक, महादेव नाईक, वास्को आमदार कार्लुस आल्मेदा, थिवीचे आमदार किरण कांदोळकर, ग्लेन टिकलो, सुभाष फळदेसाई, प्रमोद सावंत, रमेश तवडकर, सिद्धार्थ कुंकळकर, अभिजित पर्रीकर, मायकल लोबो, दिलीप परुळेकर, ऍड. फ्रान्सिस डिसोझा, खासदार नरेंद्र सावईकर, सदानंद शेट तानावडे, काब्राल निलेश, सतीश धोंड, एलिना साल्ढाणा आदी मनोहर पर्रीकरांसोबत दिल्लीला जायला यावेळी निघाले.
खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यावेळी मनोहर भाई आता केंद्रीय मंडळात गेल्याने गोवा राज्याचे प्रश्‍न आता सुटण्यास बळकटी आली असल्याचे सांगितले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यां व्यतिरिक्त टूरिस्ट टॅक्सी असोसिएशनतर्फे अभिनंदनाचे फलक घेऊन उभे राहिले व श्री. पर्रीकर यांना निरोप दिला.