तपोनिष्ठ जीवनाची अखेर

0
88

पाच शतकांहून अधिक काळाची अत्यंत उज्ज्वल आणि देदीप्यमान, लखलखती परंपरा लाभलेल्या श्री गोकर्ण पर्तगाळी मठाचे २३ वे अधिपती प. पू. श्रीमान विद्याधिराजतीर्थ स्वामीजींचे काल महानिर्वाण झाले. ह्या महान मठपरंपरेतील एक तेजस्वी पर्व संपुष्टात आले. प्राचीन सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक ज्ञानविज्ञानाची सांगड घालून ज्ञातिकार्याला समाजसन्मुख करणारा एक महान तपस्वी गोमंतकाच्या पवित्र भूमीमध्ये पाच दशके अहर्निश साधना करीत आणि समाजाला अखंड प्रेरणा देत अखेर आषाढी एकादशीच्या पूर्वदिनी वृंदावनस्थ झाला. मठाच्या लक्षावधी अनुयायांच्या अश्रुधारा कोसळत्या जलधारांत मिसळून गेल्या.
‘यज्ञ आयुष्य हे, मृत्यू ही सांगता’ असे कविवर्य बा. भ. बोरकर म्हणून गेले आहेत. स्वामीजींनी आपल्या समाजसमर्पित जीवनकाळामध्ये जणू एक यज्ञच आरंभिला होता. पाठीशी एकाहून एका महान पूर्वसुरींचे आशीर्वाद होते हे खरे, परंतु बदलत्या काळानिशी नव्या पिढीतील मूल्यनिष्ठा, संस्कार लोप पावत चालले असताना ज्ञातिकार्य तितक्याच चैतन्यमयी रीतीने सुरू ठेवणे ही काही सोपी बाब नव्हे. विद्याधिराजतीर्थ स्वामीजींनी हे चैतन्य तर निर्माण केलेच, परंतु ते केवळ ज्ञातिपुरते सीमित न राहू देता सकल समाजाला त्याचा लाभ मिळावा ह्या दृष्टीनेही त्यांनी सतत प्रयत्न केले. केवळ मठातील कर्मकांडांपुरतेच सीमित जीवन ह्या मठपरंपरेतील एकाहून एक उत्तुंग प्रज्ञेच्या स्वामीजींच्या मांदियाळीमध्ये कधीच नव्हते. प्रत्येक मठाधिपतीने आपल्या काळाला अनुसरून समाजाभिमुख कार्य केल्याचे आपल्याला गतइतिहास चाळताना पानोपानी पाहायला मिळते.
काल महानिर्वाण झालेल्या श्रीमद् विद्याधिराजतीर्थ स्वामीजींना गुरू श्रीमद्द्वारकानाथतीर्थ स्वामीजींनी मुंबईत वडाळ्याच्या राममंदिरात २२ फेब्रुवारी १९६७ रोजी शिष्यपदाची दीक्षा दिली होती. आपल्या पूज्य गुरूजींच्या साक्षीने वेदविद्यांमध्ये पारंगत होत वेद, उपनिषदे, श्रुती, स्मृती, पुराणांचे पठण आणि मनन, चिंतन तर त्यांनी केलेच, परंतु तपोनिष्ठ, संन्यस्त जीवनाचा पूर्वसुरींनी घालून दिलेला आदेश निग्रहीपणे पाळला. म्हणूनच तर जेव्हा गुरूंच्या महासमाधीनंतर प्रत्यक्ष मठाधिपतीपदाची धुरा स्वीकारण्याची वेळ आली तेव्हा दूरदूर पसरलेल्या ज्ञातिनुयायांसाठी पूर्वसुरींप्रमाणेच तेही सर्वांसाठी परमवंदनीय, परमपूजनीय ठरले.
आपल्या कार्यकाळामध्ये पर्तगाळ मठातील श्रीवीर रामदेव आणि श्री वीर विठ्ठलाच्या चरणी लीन होत तेथील व्रतवैकल्ये, पूजाअर्चा, विधि-उत्सवांची परंपरा पुढे चालवत असतानाच समाजाच्या सर्वत्र विखुरलेल्या पुरातन मठांच्या जीर्णोद्धाराचे कामही स्वामीजींनी हाती घेतले. अंकोला, वाराणसी, कारवार, व्यंकटपुरा, भटकळ, गंगौळी, यल्लापूर, मंगळुरू अशा ठिकठिकाणच्या मठांचा जीर्णोद्धार करून नवी चेतना प्रवाहित केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पर्यावरणानुकूल आणि वास्तुशास्त्रानुरुप झालेला श्रीपर्तगाळी मठाचा जीर्णोद्धारही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतो. केवळ मठमंदिरांचा उद्धार करूनच ते थांबले नाहीत. श्री स्वामी द्वारकानाथ विश्‍वस्त मंडळ आणि विद्याधिराज धर्मादाय विश्‍वस्त मंडळाच्या माध्यमातून त्यांनी चौफेर सामाजिक कार्यामध्येही वाटा उचलला. पनवेल, कुमठा वगैरे ठिकाणचे वृद्धाश्रम, इस्पितळे, शाळा आदींमधून त्यांची ही समाजहितैषी दृष्टी दिसून येते. नव्या विज्ञानानिष्ठ पिढीला ज्ञातीशी जोडण्यासाठी गुणवंत विद्यार्थी सत्कारांद्वारे त्यांच्यावर आप्तस्वकीयांच्या कौतुकाची थाप देताना प्राचीन भारतीय संस्कृतीचा महान वारसा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्यही त्यांनी अविरत केले आहे. विद्याधिराज पुरस्कारांच्या रूपाने समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कार्य करून दाखविणार्‍या ज्ञातिबांधवांना सन्मानित करून समाजकार्याशी जोडून घेण्याचाही स्वामीजींनी अखंड प्रयास केला.
हे चौफेर कार्य करीत असताना व्यक्तिगत संन्यस्त, तपोनिष्ठ जीवनामध्ये कुठेही खोट येणार नाही याची आत्यंतिक दक्षता स्वामीजींनी पदोपदी घेतली. या तपोनिष्ठ जीवनानेच त्यांना उदंड ऊर्जा प्रदान केली असावी. त्यामुळे ९९ साली त्यांनी अत्यंत प्रतिकूल हवामानामध्ये यशस्वी केलेली गंडकीयात्रा, दरवर्षी होणारे सर्वांना सामावून घेणारे चातुर्मास सोहळे, मठातील वार्षिक श्री रामनवमी उत्सव ह्या सगळ्यांमधून त्यांचा प्रत्यक्ष जीवनादर्श सर्वांसमोर सतत राहिला होता. गोमंतकाच्या पवित्र भूमीमध्ये अवितर मांगल्यसिंचन करीत आलेल्या श्री गोकर्ण पर्तगाळी मठपरंपरेच्या एका पाईकाने क्षणैक विश्राम घेतला असला तरी शिष्यस्वामी विद्याधीशतीर्थ यांच्या रूपाने या उज्ज्वल परंपरेचा प्रवाह असाच खळाळत पुढे जाईल हे निःसंशय आहे!