परीक्षांना आत्मविश्‍वासाने सामोरे जा

0
277
  • निलांगी औ. शिंदे
    (धारगळ- पेडणे)

मुलांनो, परीक्षेचा बागुलबुवा न बाळगता त्या परीक्षेशी मैत्री करा. जे आहे त्याचा अभ्यास करा, वाचन करा, चिंतन-मनन करा. त्या विषयावर चर्चा करा. तो विषय तुमच्या भाषेत समजून घ्यायचा प्रयत्न करा. पुढचं वर्ष एक नवीन उपलब्धी, एक नवीन जोश घेऊन तुमची वाट पाहतंय. नैराश्य झटकून आत्मविश्‍वासाच्या बळावर यशस्वी व्हा.

कोरोना महामारीची टाळेबंदी अगदी अशा काळात सुरू झाली की मुलांचा अभ्यास शिगेला पोचला होता. सर्वांनाच सत्रांत परीक्षांचे वेध लागले होते. कोरोना व्हायरस एका- एका देशात पसरत होता आणि हां हां म्हणेपर्यंत आपल्या देशात, प्रसंगी राज्या-राज्यात फैलावू लागला होता. देशात टप्प्या-टप्प्याने टाळेबंदी लागू करण्याशिवाय पर्याय नव्हता. टाळेबंदीमुळे शाळा- महाविद्यालये, विश्‍वविद्यालयेही अनुषंगाने बंद ठेवणे भागच होते.
मुलांनी आदल्या मे महिन्यापासून शिकवण्या लावलेल्या होत्या. काही मुलांनी शिकवण्या न घेता कसब पणाला लावलं होतं. आई-वडिलांनी रजा घातलेल्या होत्या. त्यात सगळंच बंद, मग परीक्षांचं काय… असा जेव्हा प्रश्‍न आला तेव्हा काही इयत्तांच्या वार्षिक परीक्षेच्या राहिलेल्या प्रश्‍नपत्रिका आणि दहावीच्या परीक्षा… थोडीशी टाळेबंदी हटवून, सुरक्षेचे सर्व विधी वापरून घेण्यात आली.

त्यानंतर नवीन वर्गांमध्ये प्रवेश वगैरे सर्वच तसं लांबणीवरच पडत गेलं. सगळा अभ्यास संचारमाध्यमावरून सुरू झाला. ज्या गावांमध्ये आंतरजाल म्हणजे इंटरनेट किंवा भ्रमणध्वनीचे प्रभावक्षेत्र नसेल अशा ठिकाणची मुले या ‘ऑनलाइन’ अभ्यास प्रकारापासून वंचित राहिलीय. तिथल्या शिक्षकांनी अनेकविध उपायांमधून शिक्षण सुरू ठेवलंच. अभ्यासपत्रिका, कार्यपत्रिका तयार करून दर आठवड्याच्या शेवटी पालकांना न्यायला लावणे वगैरे. काही ठिकाणी लेखी अभ्यास ‘व्हॉट्‌सऍप’वर वर्गशः गट बनवून पाठवण्यात आला. त्यावर सकाळ-संध्याकाळ ‘गुगल मीट’ घेणे सुरू आहे. या दरम्यान झूम ऍप, गुगल क्लासरूम, पॅडलेटसारखे ऍपसुद्धा सर्वांच्या भ्रमणध्वनीवर स्थानापन्न झाले.
अभ्यास असा हवेत होता. त्यात ऑनलाइन परीक्षासुद्धा दरवर्षीच्या क्रमानेच काही शाळा-कॉलेजमधून घेण्यात आल्या. घरी बसून परीक्षा देताना काही तोटे होते- जसे की मुलांच्या हातात मोबाइल… बटन दाबल्यावर गुगल मदतीला… त्यात ‘नेटवर्क’, ‘रेंज’ नसणे ही नवीन सर्वसाधारणपणे वर्गबुडवी कारणेसुद्धा दिमतीला होतीच. पाठवलेला सर्व अभ्यास वह्यांवर उतरलेला नव्हता. लेखनाची सवय नव्हती. त्यामुळे गैरप्रकार प्रश्‍नपत्रिका सोडवण्यात होतील यात शंकाच नव्हती.

पूर्णपणे अभ्यासाची सवय नष्ट होणंसुद्धा हानिकारकच. पण ते मुलांपर्यंत पोहोचवणं पालकांच्यासुद्धा हाताबाहेरचंच आहे. मुलं सक्तीच्या सुट्‌ट्या अनुभवत आहेत. हातात सर्वांत भयानक अस्त्र मोबाइल आहे, ज्यामुळे काही मुलांचं भवितव्य भयंकर धोक्यात आहे.

अशा स्थितीत दहावी-बारावी व थोड्या दिवसांनी नववी-अकरावीचे वर्ग खूप सुचारू पद्धतीने सुरू झाले. मुलांच्या मानसिकतेचा व अभ्यासाच्या स्थितीचा अंदाज शिक्षकांना येऊ लागला.
सर्व शाळांमधून दहावीच्या प्रथम मध्यसत्र परीक्षा संपून आता द्वितीय मध्यसत्र परीक्षा सुरू होणार आहेत. आयुर्वेदिक, मेडिकल, अभियांत्रिकी अशा सर्व व्यावसायिक महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू आहेत. काही ठिकाणी प्रथम वर्षाच्या परीक्षा आत्ता घेतल्या जात आहेत.

मुलांमध्ये प्रचंड निराशा आहे. कारण हे की प्रथम वर्षाची परीक्षा होण्यापूर्वीच द्वितीय वर्षाचा अभ्यास सुरू केलेला. त्याचा ऑनलाइन अभ्यास सुरू होता. गेल्या दहा महिन्यात ज्यांनी प्रथम वर्षाचा अभ्यास न करता द्वितीय वर्षाच्या अभ्यासात मन रमवलं, त्यांची अचानक प्रथम वर्षाची सत्रांत परीक्षा घोषित झाल्याने भंबेरी उडाली.
काही ठिकाणी परीक्षेच्या चार-पाच दिवस आधी वेळापत्रक पाठवलं गेलं. मुलं निर्धास्त होती. त्यांच्यावर संकट कोसळलं. मुलांना मार्गदर्शनाची गरज होती. त्यामुळे गेले दहा महिने जी मुलं महाविद्यालयात गेलीच नव्हती ती मुलं तिथे जाऊन परीक्षा देताना बावरणे साहजिकच होते.

अनेक ठिकाणी परीक्षा सुरू आहेत. माझी सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की- अभ्यासाच्या भयाने खचून जाऊ नका. परीक्षेमध्ये विराम घ्यायचासुद्धा विचार करू नका. जे काही शिकवलेलं आहे, जे साहित्य उपलब्ध आहे त्याचा आत्मविश्‍वासाने आणि हिमतीने अभ्यास करा, वाचन करा. जे अत्यंत आत्मविश्‍वासाने आणि जिद्दीने कराल त्यात यश नक्की मिळेल. त्यामुळे परीक्षेत अपयशी होऊ या कल्पनेने खचून न जाता, परीक्षा न देण्याचा किंवा अभ्यास झाला नाही म्हणून हतबल अथवा निराश होऊ नका. हा काळच असा आहे, जो गेल्या शंभर वर्षांत आला नव्हता, तो आपल्या नशिबी आला आहे. त्यामुळे हा काळ जसा आपल्याला सुखरूप ठेवून जातोय, तसा परीक्षेचा काळही जाईल. त्याला मनापासून सामोरे जा.

यापुढे दहावी-बारावीच्या परीक्षादेखील व्हायच्या आहेत. सर्व मुलांनी एकच विचार करायचा आहे की त्यांची तुकडी ही अशी पहिलीच भाग्यवान तुकडी आहे ज्यांचा अभ्यास दोनदा होतोय. ऑनलाइन शिकवून झाल्यानंतर, सगळा अभ्यासक्रम संपल्यानंतर शाळेत वर्ग सुरू झालेत. झपाट्याने पुन्हा उजळणी करण्याच्या मागे शिक्षक लागले. त्यात खुपसे धडे कापण्यात आलेले आहेत. त्या धड्यांना लागणारा वेळ वाचलेला आहे. आता अत्यंत सकारात्मकरीत्या वेळापत्रक बनवून प्रत्येक विषयाला योग्य वेळ देत अभ्यास करण्याची गरज आहे. असं दरवर्षी नसतं. ते यावर्षी कोरोनामुळे लाभलेलं आहे.

मुलांनो. एक ठोस ध्येय निर्धारित करा आणि त्या दिशेने प्रयत्न करत रहा. यश तुमचेच आहे. या सर्व परीक्षांकडे एका उत्सवाप्रमाणे पहा, असं आपले माननीय प्रधानमंत्री सांगतात. मुलांनो, जेव्हा आपल्याकडे गणेशचतुर्थी असते किंवा ताई-दादाचं लग्न असतं… आठवून पहा आपण किती जोशात, किती आवेशात तयारी करत असतो. छोट्या- छोट्या गोष्टींकडे किती काळजीपूर्वक लक्ष देतो आणि तो दिवस उजाडला की परिपूर्णतेचा अनुभव येत असतो. अगदी आदल्या रात्रीपर्यंत हे राहिलं का… ते राहिलं का….अशी धाकधूक होत असते. पण मग सर्व सुरळीत होतं की नाही? मग मुलांनो, परीक्षेचा बागुलबुवा न बाळगता त्या परीक्षेशी मैत्री करा. जे आहे त्याचा अभ्यास करा, वाचन करा, चिंतन-मनन करा. त्या विषयावर चर्चा करा. तो विषय तुमच्या भाषेत समजून घ्यायचा प्रयत्न करा. पुढचं वर्ष एक नवीन उपलब्धी, एक नवीन जोश घेऊन तुमची वाट पाहतंय. नैराश्य झटकून आत्मविश्‍वासाच्या बळावर यशस्वी व्हा.