थांब लक्ष्मी, कुंकू लावते!

0
473
  • प्राजक्ता प्र. गावकर

वत्सलाने येऊन तिच्या चरणांना स्पर्श केला व ती देवघरात गेली. तिने कुंकवाचा करंडा घेतला व ती लक्ष्मीमातेला कुंकू लावायला बाहेर येणार… तोच तिच्या मनात विचार आला, ‘‘मी जर लक्ष्मीमातेला कुंकू लावले तर लक्ष्मीमाता हे घर कायमचे सोडून जाणार…..

एक गाव होतं. त्या गावात तीन भाऊ आपल्या आईसोबत राहत होते. ते तिघे भाऊ काम करत व आपला चौघांचा पोटापाण्याचा प्रश्‍न सोडवत. एकदम गरीब नव्हे आणि धड श्रीमंतही नव्हे- या माळेत मोडणारे म्हणजे मध्यमवर्गीय.
दिवस कुणासाठी थांबत नसतात. त्यांची आई म्हातारी झाली. तिला घरातले काम झेपेना. सर्वांत मोठा मुलगा गोपाळ आता विवाहयोग्य झाला होता. एक दिवस आईने त्याला म्हटलं, ‘‘गोपाळ बाळा, मला आता घरकाम सोसवत नाही रे. एखादी मुलगी बघ आणि लग्न कर बाबा.’’
रोजच आईची पिट् पिट् ऐकून गोपाळने शेजारच्या गावातली मुलगी पाहिली. तिचे माव वत्सला. नावाप्रमाणेच वात्सल्याची मूर्ती होती ती. वत्सलासारखी सुंदर आणि सुशील अशी मुलगी आपल्याला सून म्हणून आणली याचा त्या म्हातार्‍या आईला खूप आनंद झाला.ला सासूची फार काळजी घेत होती. सासू तृप्त झाली आणि या तृप्तीतच एक दिवस तिने ‘राम’ म्हटला.

नंतर वत्सलानेच आपल्या धाकट्या दिरांची लग्ने लावून दिली. आता त्या घरात तीन भाऊ व तीन जावा असे एकत्र कुटुंब नांदू लागले. वत्सला मुळातच चांगल्या स्वभावाची होती. ती सकाळी लवकर उठून घरातले केरवारे करून, गुरांना चारा घालून नंतर घरातील सर्वांसाठी चहा-नाश्ता बनवत असे. तिच्या दोन्ही जावा उशिरापर्यंत अंथरुणात लोळत पडत असत. घरकामाला अजिबात हात-बोट लावत नसत. नेहमी याचे त्याला व त्याचे याला करून लावालावी करावी आणि पोटात खड्डा पडला की फुकटचे गिळायला बसावे… असा त्यांचा दिनक्रम होता. वत्सलेच्या कष्टाळूपणानेच त्या घराला चांगले दिवस आले होते.

एक दिवस संध्याकाळी वत्सला दारात तांदूळ निवडत बसली होती. तेवढ्यात एक गाय त्यांच्या दारात येऊन हंबरू लागली. वत्सला गाईला पाहून उठली. तिला तिने नमस्कार केला व म्हणाली, ‘‘थांब माते, तुला भाकरी आणते.’’ ती माजघरात गेली. तोच तिची धाकटी जाऊ बाहेर आली व दारात गाय पाहून तिने तिला हाकलले. पण गाय जागची हालली नाही. धाकट्या जावेने गाय जात नाही हे पाहून जवळच असलेला झाडू गायीच्या तोंडावर फेकून मारला. त्याबरोबर गाय तेथून निघून गेली.

त्याचवेळी वत्सला भाकरी घेऊन बाहेर आली. पाहते तर गाय नाही आणि धाकटी जाऊ तिन्हीसांजेला केस विंचरत बसली आहे. वत्सलाने तिला उंबरठ्यावरून उठवले व तिला समजावून सांगितले की तिन्हीसांजेला दारात केस विंचरू नये. ही वेळ लक्ष्मी घरी येण्याची असते. पण वत्सलेचे ऐकण्याऐवजी तिची जाऊ तिला फणकार्‍याने म्हणाली, ‘‘दारात येणार्‍या कुठल्याही भिकारड्या गायीसाठी तुम्ही भाकरी आणायला गेलात? कशाला? गेली तर जाऊ देत ती.’’ तिचे हे बोलणे ऐकून वत्सलाला खूप वाईट वाटले. वत्सलेच्या जावेला हेही माहीत नव्हते का की तिन्हीसांजेला दारात केस विंचरू नयेत म्हणून? कारण ती वेळ लक्ष्मीची घरात येण्याची असते. आणि गाय? गायीच्या पोटात तेहेतीस कोटी देव असतात. गायीला देवस्वरूप मानतात. तर तिच्याच तोंडावर वत्सलेच्या जावेने झाडू फेकून मारला.

याचा परिणाम.. थोड्याच दिवसात या तिन्ही भावंडांना धंद्यात खोट आली आणि त्यांची हलाखी सुरू झाली. एके काळी पोटभर खाऊन राहील एवढे अन्न त्यांच्या घरी असायचे, तेथे आता दोन वेळचे जेवण मिळण्याचेही वांधे पडले. मुलेबाळे उपाशी पडली. त्यांची हीनदीन दशा पाहून वत्सला मनातून धास्तावली. ती देवीच्या पाया पडून म्हणाली, ‘‘देवी, का अशी रागावलीस आमच्यावर? मी काय पाप केलं? माझी सर्व माणसं उपाशी तापाशी तडफडत आहेत. बघवत नाही मला हे सर्व. काय शिक्षा द्यायची ती मला दे’’, असे बोलून ती रडू लागली.
देवीला तिची दया आली. देवीने वत्सलाला स्वप्नात दृष्टांत दिला, ‘‘नदीकिनारी जा. तिथे खूप दगड आहेत. ते दगड एक एक डोक्यावरून आणून तुझ्या परसात टाक. पण लक्षात ठेव. एका खेपेला एकच दगड आणायचा. मग बघ, काय चमत्कार होतो!’’ वत्सला झोपेतून जागी झाली. सकाळी उजाडल्यानंतर ती नदीकडे गेली. तिथे खूप दगड होते. त्यातला एक दगड तिने डोक्यावर घेतला व घरी येऊन परसात टाकला. अशा तर्‍हेने तिने संध्याकाळपर्यंत दगड नेले व परसात टाकले. संध्याकाळी तिचा नवरा घरी आला. त्याने पाहिले की वत्सला एक एक दगड डोक्यावरून आणतेय. तो तिला म्हणाला, ‘‘थांब वत्सला, मीपण येतो तुझ्याबरोबर’’, असे म्हणून त्याने मोठी टोपली बरोबर घेतली व तिला ‘‘चल जाऊ’’असे म्हणाला. वत्सलाने आपल्या पतीला विचारले, ‘‘हे काय? ही टोपली कशाला बरे घेतली?’’ तो म्हणाला, ‘‘टोपलीतून खूप दगड आणता येतील व आपले काम लवकर पूर्ण होईल.’’ तेव्हा तिने सांगितले, ‘‘नाही नाही. मी जसा डोक्यावरून एक एक दगड आणते तसा जर तुम्ही आणणार तरच या.’’ शेवटी वत्सलेच्या प्रेमापोटी तिचा नवरा डोक्यावरून एक एक दगड आणायला तयार झाला.

त्या दोघांनी अथक परिश्रम करून रात्री उशिरापर्यंत खूप दगडं जमा केले. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दगडं टाकून वत्सला अतिशय थकून गेली होती. परत दगड आणून टाकताना तिच्या नवर्‍याने टाकलेल्या दगडावर चुकून तिचा दगड पडला व फुटला. त्या फुटलेल्या दगडातून काहीतरी चकाकत होते. ‘‘काय चकाकतंय?’’ असे म्हणून वत्सलाने जवळ जाऊन पाहिले. तर तिला त्या फुटलेल्या दगडात चक्क हिरा मिळाला. तिने दुसरे दोन दगड एकमेकांवर आपटून फोडले तर त्यातूनही हिरे निघाले. अशा तर्‍हेने आणलेले दगडं फोडून त्या दोघांना पुष्कळ हिरे मिळाले.

वत्सलाला आपल्या स्वप्नात येऊन देवीने जे सांगितले होते त्याची सत्यता पटली. तिने देवीला हात जोडले. नंतर त्या उभयतांनी ते सर्व हिरे माजघरात एका हंड्यात भरून खड्डा करून पुरून ठेवले.
वत्सलेल्या नवर्‍याने त्या हिर्‍यापासून मिळालेल्या पैशांवर आपला व्यवसाय पुन्हा उभा केला व आपल्या भावांना त्या व्यवसायात सामील करून घेतले. हळूहळू त्या घरात लक्ष्मी येऊ लागली. पुन्हा श्रीमंती आली. पुन्हा वैभव प्राप्त झाले. मुलाबाळांच्या तोंडात आता चांगले घास पडू लागले. हे सर्व पाहून वत्सलेला आनंद होत होता. तिच्या धडपडण्याने धाकट्या जावा सुधारल्या. त्या आपणहून तिला घरकामात मदत करू लागल्या. दिवस जात होते. सर्व सुरळीत चालले होते.

एक दिवस बरोबर तिन्हीसांजेलाच घरात कलह सुरू झाला. धंद्यात मिळणार्‍या पैशांवरून धाकट्या दोन्ही भावांमध्ये भांडण सुरू झाले. वत्सलाने आणि गोपाळने पुष्कळ सांगून पाहिले की तिन्हीसांजेला भांडू नका, कारण यावेळी लक्ष्मी घरी येत असते. घर आनंदित ठेवा. पण वत्सलेचं ऐकतो कोण?
अचानक वत्सलेला देवघरात कसलातरी प्रकाश दिसला. वत्सला पळतच देवघरात गेली. पाहते तर देव्हार्‍यातून एक दिव्य अशी स्त्री बाहेर येत होती. ती स्त्री दिसायला सुंदर होती. तिने लाल वस्त्र परिधान केले होते. तिच्या हातात कमलपुष्प होते. ती सोन्याने चकचकत होती. सवाष्ण होती. वत्सलेला पाहून ती थांबली. वत्सलेने तिला नमस्कार केला व विचारले, ‘‘हे दिव्य स्त्री, तू कोण आहेस?’’
ती दिव्य स्त्री म्हणाली, ‘‘मी महालक्ष्मी आहे.’’ ते ऐकून वत्सलाने नवलाने विचारले, ‘‘हे माते, तू कुठे जात आहेस?’’ त्यावर महालक्ष्मी म्हणाली, ‘‘ज्या घरात यावेळी भांडण-तंटे होतात त्या घरात मी राहू शकत नाही. म्हणून हे घर मी कायमचे सोडून जात आहे.’’
हे ऐकून वत्सला घाबरली व मातेला म्हणाली, ‘‘हे माते, माझे काही चुकल्यास मला माफ कर, पण अशी कठोर होऊ नकोस. तू जर हे घर सोडून गेलीस तर माझी माणसं कंगाल होतील. माझी लेकरं भुकेने मरून जातील.’’
पण महालक्ष्मी पुढे जातच राहिली. ती बाहेरच्या उंबरठ्याजवळ पोचली. तिने उंबरठ्यावर आपले उजवे पाऊल ठेवले. ती जाणार तोच वत्सला तिला म्हणाली, ‘‘तू माझे ऐकणार नाहीस का माते? ठीक आहे, पण मी तुला कुंकू लावते तोपर्यंत तरी थांब’’. कुंकवाचे माहात्म्य लक्ष्मीला माहीत होते. म्हणून ती कुंकू लावून घेण्यासाठी थांबली. वत्सला म्हणाली, ‘‘माते मला वचन दे, मी तुला माझ्या हातांनी कुंकू लावल्याशिवाय तू इथून जाणार नाहीस.’’ लक्ष्मीमाता म्हणाली, ‘‘दिले वचन. नारायणाची शपथ- तू स्वतः मला कुंकू लावल्याशिवाय मी इथून जाणार नाही’’.
वत्सलाने येऊन तिच्या चरणांना स्पर्श केला व ती देवघरात गेली. तिने कुंकवाचा करंडा घेतला व ती लक्ष्मीमातेला कुंकू लावायला बाहेर येणार… तोच तिच्या मनात विचार आला, ‘‘मी जर लक्ष्मीमातेला कुंकू लावले तर लक्ष्मीमाता हे घर कायमचे सोडून जाणार. माझी सर्व माणसं पुन्हा गरीब होणार. त्यापेक्षा मी मातेला कुंकू लावलेच नाही तर…!

असा विचार करून ती माजघराच्या दिशेने निघाली. तिला दुसरीकडे जाताना पाहून लक्ष्मीमाता म्हणाली, ‘‘वत्सला तू कुणीकडे निघालीस?’’तेव्हा ती म्हणाली, ‘‘हळद आणायला. कारण कुंकवाइतकंच हळदीलाही महत्त्व आहे. तू थांब इथेच. मी आलेच पटकन!’’ असे म्हणून ती माजघरात गेली. एकवार तिने सर्वत्र नजर फिरवली.
कुंकवाचा करंडा ओट्यावर ठेवून ती तडक मागील दारी गेली व तिथे असलेल्या विहिरीत तिने स्वतःला झोकून दिले. धपकन विहिरीत काय पडले? असे म्हणून तिचा नवरा पाहायला गेला तेव्हा त्याला वत्सलाचा देह पाण्यात तरंगताना दिसला. त्याने आरडाओरडा करून भावांना बोलावून वत्सलाचा मृतदेह बाहेर काढला. इकडे लक्ष्मीमाता तिची प्रतीक्षा करत होती. तिने सर्व ताडले. ‘‘मला कुंकू लावल्यावर मी हे घर सोडून जाणार म्हणून तिने स्वतःचा घात करून घेतला. धन्य आहे तुझी वत्सला’’, असे म्हणून लक्ष्मी परत पावली देवघरात जाऊन बसली. कारण तिने वत्सलाला वचन दिले होते की ‘तू स्वतः मला कुंकू लावल्याशिवाय मी जाणार नाही’. म्हणून मग महालक्ष्मी त्या घरात कायमचीच राहू लागली.