राज्य सरकारने केले आश्वस्त
राज्यात पेट्रोल, डिझेल, तसेच एलपीजीची कोणतीही टंचाई नसून, टंचाईच्या भीतीपोटी घाबरून लोकांनी पेट्रोल, डिझेल व एलपीजीसाठी रांगा लावू नयेत, अशी जाहीर नोटीस काल गोवा सरकारच्या नागरी पुरवठा खात्याने काल काढली. पेट्रोलपंपांवर वाहनचालक मोठ्या संख्येने गर्दी करू लागल्याच्या पार्श्वभूमीवर काल नागरी पुरवठा खात्याने वरील जाहीर नोटीस जारी केली.
पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण होण्याच्या भीतीपोटी राज्यातील वाहनचालक सर्वच पेट्रोलपंपांवर गेल्या दोन दिवसांपासून गर्दी करू लागल्याने सध्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या गर्दीमुळे लोकांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या टंचाईची भीतीही वाढू लागली आहे. त्याशिवाय वाहतुकीची कोंडी होणे आदी समस्याही निर्माण झाल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळाले.
सरकारचे परिस्थितीवर लक्ष आहे. पेट्रोल असो, डिझेल असो अथवा एलपीजी, त्याचे वितरण वेळोवेळी व सुरळीतपणे होत असल्याने कुणीही घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.