पणजी महापालिका व ५ पालिका भाजपकडे

0
202

>> कुंकळ्ळीत कॉंग्रेसचा झेंडा; साखळी पोटनिवडणुकीत भाजपला धक्का

राज्यातील पणजी महानगरपालिकेसह डिचोली, पेडणे, वाळपई, कुडचडे व काणकोण या पाच नगरपालिकांच्या निवडणुकीच्या काल झालेल्या निकालाअंती भाजप समर्थक उमेदवारांनी सत्ता संपादन केली आहे, तर कुंकळ्ळी नगरपालिकेवर कॉंग्रेस समर्थकांनी वर्चस्व मिळविले आहे. नावेली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत भाजप व कॉंग्रेसला हादरा देत अपक्ष उमेदवार विजयी झाला, तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना धक्का देत साखळी नगरपालिकेच्या प्रभाग ९ मधील पोटनिवडणुकीत भाजपविरोधी गटाचे राजेंद्र आमशेकर विजयी झाले.

पणजीवर बाबुशचा झेंडा, पण पाच जागा गमावल्या

>> सुरेंद्र व रूथ फुर्तादोंचा दमदार विजय
>> बाबुश व यतीन पारेख यांचे पुत्र विजयी

पणजी महानगरपालिका मंडळाच्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांचे समर्थक ३० पैकी २५ जागांवर विजयी झाले असून भाजपविरोधी गटाने ५ जागांवर विजय मिळविला. या निवडणुकीत १५ नवीन चेहरे, विद्यमान १२ नगरसेवक आणि ३ जुने नगरसेवक निवडून आले आहेत. विद्यमान ६ नगरसेवकांना पराभव पत्करावा लागला आहे.

पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठी २० मार्च २०२१ रोजी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी येथील फार्मसी महाविद्यालयाच्या आवारात काल करण्यात आली. पणजी महानगरपालिकेच्या सर्व जागांवर भाजप समर्थक विजयी होतील असा दावा आमदार बाबुश मोन्सेरात यांनी केला होता. तथापि, ‘आम्ही पणजीकर’ या गटाने अनेक प्रभागांत भाजपच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे केल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट होत आहे.
आम्ही पणजीकर गटातील माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो आणि त्याची पत्नी रूथ फुर्तादो हे दांपत्य विजयी झाले आहे. महापौर उदय मडकईकर, उपमहापौर वसंत आगशीकर, माजी महापौर विठ्ठल चोपडेकर, शुभम चोडणकर, आमदार बाबूश मोन्सेरात यांचे पुत्र रोहित मोन्सेर्रात, माजी महापौर यतीन पारेख यांचे पुत्र करण पारेख विजयी झाले आहेत.

भाजपचे विद्यमान नगरसेवक किशोर शास्त्री, शेखर डेगवेकर, राहुल लोटलीकर, सुरय्या माखिजा पिंटो, रेखा कांदे आणि रुपेश हळर्णकर यांना पराभव पत्करावा लागला. अस्मिता केरकर यांना सर्वाधिक ७६.६१ टक्के मते मिळाली.

मुख्यमंत्र्यांच्या साखळीत
भाजप उमेदवार पराभूत

>> पालिकेवर सत्ता स्थापनेच्या हालचालींस वेग
>> नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल

साखळी नगरपालिकेच्या प्रभाग नऊमधील पोटनिवडणुकीत माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी समर्थित ‘टुगेदर फॉर साखळी’ गटाचे उमेदवार राजेंद्र आमेशकर (२५९) विजयी ठरले. भाजपचे दशरथ आजगावकर यांना २४२ मते मिळाली.

माजी नगराध्यक्ष धर्मेश सागलानी, प्रवीन ब्लॅगन, रियाज खान आदींनी आमेशकर यांच्या या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला.

साखळी पालिकेतील बलाबल आता बदलल्याने साखळी पालिकेत सत्तांतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नगराध्यक्ष यशवंत माडकर यांच्या विरोधात सहा नगरसेवकांनी १८ रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता. धर्मेश सगलानी गटाचे सात नगरसेवक झाल्याने पुन्हा हा गट सत्ता स्थापनेसाठी सक्रिय झाला आहे.
दरम्यान, नगरसेवक राजेश सावळ यांना अपात्र ठरवण्यासाठी हालचाली सुरू असून याबाबत संबंधित अधिकार्‍याकडे लेखी तक्रार नोंदवण्यात आली आहे.
भाजपने षड्‌यंत्र रचून साखळी पालिकेवर मागल्या दाराने सत्ता स्थापन केली होती. आता आपला गट पुन्हा पालिका काबीज करील असे माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांनी सांगितले.