पणजीत स्मार्ट ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा प्रस्ताव ः पर्रीकर

0
86

पणजी स्मार्ट सिटी शहरात स्मार्ट ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
आल्तिनो पणजी येथे मोकळ्या जागेच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर मुख्यमंत्री पर्रीकर बोलत होते. शहरात ८० हजार स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. स्मार्ट मीटरची फाईल क्लीअर करण्यात आली आहे. स्मार्ट मीटर बसविण्यात आल्यानंतर मीटर रिडरची गरज भासणार नाही. वीज खात्याच्या कार्यालयात मीटर रिडींग नोंदची सुविधा असणार आहे. स्मार्ट मीटरच्या धर्तीवर स्मार्ट ट्रान्स्फार्मर बसविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. शहरातील काही भागातील ट्रान्स्फार्मरवर जादा भार येतो. स्मार्ट ट्रान्स्फार्मरमध्ये विजेचा जादा भार दुसर्‍या ट्रान्स्फार्मरकडे वळविण्याची सुविधा असणार आहे, असेही पर्रीकर यांनी सांगितले.

दोनापावल येथे इफ्फीसाठी कायम स्वरूपी साधन सुविधा उपलब्ध करण्यासाठी कन्वेंशन सेंटर उभारण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. सल्लागाराची निवड करण्यासाठी १२ जानेवारीपर्यत सामंजस्य करार केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले. स्मार्ट सिटी योजनेखाली दर आठवड्याला एक मोकळी जागा विकसित करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. मोकळ्या जागेत बगिचा, मुलांना खेळण्यासाठी साधन सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. अमृत मिशन अर्तंगत आल्तिनो पणजी येथे मोकळी जागा विकसित करण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यात काम पूर्ण केले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले. स्मार्ट सिटी अर्तंगत पाणी पुरवठा, मलनिस्सारण व इतर साधन सुविधा सुधारण्याचे काम हाती घेण्याबरोबरच मोकळ्या जागा विकसित करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. रायबंदर येथे भूमीगत वीज केबल घालण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. यावेळी माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येकर, नगरसेवक पुंडलिक राऊत देसाई आदी उपस्थित होते.