परप्रांतीयांना १ जानेवारीपासून गोमेकॉत शुल्क लागू ः आरोग्यमंत्री

0
75

महाराष्ट्र कर्नाटकसारख्या शेजारच्या राज्यांतून उपचारासाठी गोमेकॉ इस्पितळात येणार्‍या रुग्णांना येत्या १ जानेवारीपासून शुल्क लागू करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल सांगितले. मात्र, परराज्यातून येणार्‍या व शुल्क भरू न शकणार्‍या गरीब रुग्णांना शुल्क माफ करण्यात येणार असल्याचे राणे यांनी नमूद केले. परराज्यातील रुग्णांना खाटीमागे दर दिवशी ५० रु. आकारण्यात येणार आहेत.

ज्या गोमंतकीयांकडे दिनदयाळ स्वास्थ योजनेची कार्डे असतील त्यांना उपचारासाठी येताना ती आणावी लागतील. ती न आणणार्‍यांचेही दिनदयाळ स्वास्थ योजनेखालील कार्डातील पैसे कापले जातील, असे राणे म्हणाले.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही या शुल्क आकारणी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्याशिवाय महाराष्ट्र राज्याच्या प्रतिनिधीशीही आपण सदर प्रश्‍नी बोललो आहे. कर्नाटक राज्याच्या प्रतिनिधीशी बोलणी व्हायची आहेत असे त्यांनी सांगितले.
गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाबरोबरच मडगाव येथील हॉस्पिसियो या जिल्हा इस्पितळात तसेच फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात व म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात उपचार घेणार्‍या बिगर गोमंतकीयांना हे शुल्क लागू करण्यात येणार आहे. तातडीने हृदयशस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असलेल्या परप्रांतातील रुग्णांकडूनही शुल्क आकारण्यात येणार नाही.

दिनदयाळ कार्ड सक्तीचे
दिनदयाळ स्वास्थ योजनेखालील बरेच रुग्ण आपल्या कार्डावरील पैसे संपतील यासाठी बर्‍याच वेळा उपचारासाठी येताना कार्ड न घेताच येतात. पण यापुढे कार्ड न घेता येणार्‍या रुग्णांच्या कार्डांचा तपशील गोवा इलेक्ट्रॉनिक्सकडून मिळवून त्यांचे पैसे वजा केले जातील, असे राणे यांनी नमूद केले. दिनदयाळ योजनेवर सरकार ८० कोटी रु. खर्च करते. त्यामुळे या कार्डधारकांना गोमेकॉत उपचारासाठी येताना ही कार्डे आणणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचे राणे यांनी नमूद केले. लवकरच ८ नव्या १०८ रुग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच दुचाकी वाहनेही लवकरच आणण्यात येतील.