पणजीतील मतदार कुंकळ्येकर यांनाच निवडून आणतील

0
104
पणजीतील जाहीर सभेवेळी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा आदींच्या उपस्थितीत समर्थकांशी हस्तांदोलन करताना उमेदवार सिध्दार्थ कुंकळ्येकर.

प्रचारसभेत मुख्यमंत्री पार्सेकरांचे प्रतिपादन
पणजी मतदारसंघातील मतदारांनी सलग पाच वेळा मनोहर पर्रीकर यांना विधानसभेवर निवडून आणले व आता त्यांचे उत्तराधिकारी सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनाही ते भरघोस मतांनी निवडून आणतील, असा विश्‍वास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल येथील महालक्ष्मी मंदिरासमोर आयोजित केलेल्या प्रचारसभेत बोलताना व्यक्त केला.मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री झाल्यानंतरच खर्‍या अर्थाने पणजीचा व गोव्याचा विकास झाल्याचे पार्सेकर म्हणाले. भाजप पणजीच्या जनतेचा ऋणी आहे, असे सांगताना ते म्हणाले की, सर्वांत पहिल्यांदा गोव्यात कमळ फुलले ते पणजी मतदारसंघात. सर्वांत अगोदर पणजीचा निकाल जाहीर झाला होता व मनोहर पर्रीकर हे निवडून आले होते. नंतर सलग पाचवेळा लोकांनी पर्रीकर यांना निवडून आणले. त्यामुळे ते विरोधी पक्षनेते बनले, मुख्यमंत्री बनले व आता ते केंद्रीय संरक्षण मंत्री बनू शकल्याचे ते म्हणाले. भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता, मुख्यमंत्री व आता केंद्रीय संरक्षण मंत्री बनला, त्याचे श्रेय पणजीतील लोकांनाच द्यावे लागणार असल्याचे ते म्हणाले.
नको त्या गोष्टी कॉंग्रेसनेच आणल्या : उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा म्हणाले की, विरोधी कॉंग्रेस पक्ष ज्या गोष्टी नको म्हणून आता ओरड करतो आहे, ते सगळे त्याच लोकांनी आणले होते. मांडवीतील तरंगते कॅसिनो हे कॉंग्रेस सरकारनेच आणले होते. आता तेच या कॅसिनोंच्या नावाने आवाज उठवीत असल्याचे ते म्हणाले. यावेळी पर्यावरण मंत्री एलिना साल्ढाणा, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, आमदार ग्लेन टिकलो, डॉ. प्रमोद सावंत, वैदेही नाईक, उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर, खासदार नरेंद्र सावईकर, नीलेश काब्राल, अवधूत आंगले, मिनीन डिक्रुज आदींची भाषणे झाली.
पणजीचे मतदार हुशार : पर्रीकर
केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या भाषणात पणजीतील मतदार हुशार असल्याचे सांगून आपल्याप्रमाणेच भाजपचे विद्यमान उमेदवार सिध्दार्थ कुंकळ्येकर यांनाही निवडून देतील असा विश्‍वास व्यक्त केला. पणजीतील आपण अनेक विकास कामे केली. अजूनही काही विकासकामे करायची आहेत असे त्यांनी सांगितले.