तीन दिवसांचे अधिवेशन हा फार्स

0
99

>> सरकारवर विरोधकांची जोरदार टीका


विरोधी आमदारांना घाबरून पावसाळी विधानसभा अधिवेशन ३ दिवसांचे करण्यात आले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली. तर हे तीन दिवसांचे अधिवेशन म्हणजे निव्वळ फार्स असल्याची टीका गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे.

गोवा विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक काल पार पडली. अधिवेशन केवळ तीन दिवसांचे असल्याने सात शून्य प्रहर प्रस्ताव आणि ४ लक्षवेधी प्रस्ताव घेण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती विधिमंडळ कामकाज मंत्री मावीन गुदिन्हो यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. त्यावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. मंत्री गुदिन्हो यांनी, खासगी सदस्य दिवससुध्दा ठेवण्यात आला आहे. खासगी कामकाज पूर्ण झाल्यानंतर सरकारी कामकाज घेतले जाणार आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्प मंजुरीला येईल, असेही यावेळी सांगितले.

आगामी अधिवेशनात विरोधक राज्याच्या दुरावस्थेवर सरकारला धारेवर धरणार आहेत. ३ दिवसांचे अधिवेशन बोलाविण्याचा घेतलेला हा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या निर्णयाविरुद्ध आहे. सर्व आमदारांना विविध विषयांशी निगडित प्रश्‍न विचारण्याच्या घटनेने दिलेला अधिकार हे सरकार या पद्धतीने हिरावू पाहत आहे, असा आरोप कामत यांनी केला. विधानसभा अधिवेशन हा निव्वळ फार्स आहे. सरकारला केवळ अर्थसंकल्प मंजूर करून घ्यायचा आहे. आमदारांच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्याची तयारी नाही, अशी टीका विजय सरदेसाई यांनी केली.