काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले स्पष्ट; आपल्यावरील टीकेमागे बोलविता धनी वेगळाच
काँग्रेस पक्षातून फुटून बाहेर गेलेल्यांना 2027 च्या गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. पक्षांतर करणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपणाविरोधात वैयक्तिक पातळीवर टीका सुरू झाली आहे. ह्या टीकेचा बोलविता धनी वेगळाच आहे, असे गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना मंगळवारी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तात्काळ आपल्याविरोधात वैयक्तिक टीका, अपप्रचार सुरू झाला आहे. आपल्यावर करण्यात येत असलेली टीका आणिअपप्रचारामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, गोव्यात काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन आणि संघटनात्मक बळकटीकरण भाजपला अस्वस्थ करीत आहे. एकसंध, आक्रमक आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारी काँग्रेस ही भाजपच्या अहंकारी, दिशाभूल करणाऱ्या आणि अपयशी कारभारासाठी सर्वांत मोठे आव्हान ठरू शकते, याची त्यांना जाणीव आहे, असेही गिरीश चोडणकर यांनी सांगितले.
सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या व्यक्तींमार्फत करण्यात येणारे हे हल्ले आपल्याला ना विचलित करू शकतात, ना घाबरवू शकतात. या हल्ल्यांमुळे आपण कमकुवत होत नाही; उलट आपला निर्धार अधिक मजबूत होतो. बदनामी करण्याचा प्रत्येक प्रयत्न गोव्याच्या जनतेसाठी लढण्याची आणि या सरकारच्या अपयशांचा पर्दाफाश करण्याची आपली बांधिलकी अधिक दृढ करीत आहे, असे चोडणकर यांनी सांगितले.
राज्यात वाढती बेरोजगारी, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, भ्रष्टाचार, पर्यावरणाची हानी आणि सामान्य गोमंतकीयांवर वाढत चाललेला आर्थिक भार यासारख्या गंभीर प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी भाजप सरकारने आपल्या राजकीय विरोधकांवर हल्ले करण्यासाठी ‘प्रॉक्सी वॉरियर्स’ची फौज तैनात केली आहे, असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला.
मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारने ट्रोल्स आणि राजकीय एजंट्सचे व्यवस्थापन करण्यात वेळ घालवण्याऐवजी जनतेच्या रास्त प्रश्नाशी उत्तरे देण्यावर भर द्यावा. गोव्याला प्रचारबाजी नव्हे, तर सुशासनाची गरज आहे, असेही चोडणकर यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाला प्रत्येक स्तरावर बळकट करणे, पक्ष कार्यकर्त्यांना एकत्र आणणे, भाजप सरकारला जाब विचारणे आणि जनतेविरोधी प्रत्येक निर्णयाचा पर्दाफाश करणे हेच ध्येय आहे. काँग्रेस पक्ष हा जनतेचा आवाज म्हणून कायम कार्यरत राहील आणि सत्ताधाऱ्यांकडून रचल्या जाणाऱ्या धमक्या, अपप्रचार किंवा राजकीय सूडबुद्धीच्या कारवायांना कोणत्याही परिस्थितीत बळी पडणार नाही, असेही चोडणकर
यांनी सांगितले.