सत्तरी तालुक्यातील अंजुणे धरणाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने सुमारे 250 कोटी रुपयांच्या निधीला तत्त्वत: मंजुरी दिली असून, राज्यातील नदी स्वच्छतेसाठी सहकार्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवी दिल्ली दौऱ्यावरून परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याशी अंजुणे धरणाविषयी चर्चा केली. केंद्रीय मंत्रालयाने अंजुणे धरणातील सुधारणा कामांसाठी आणि त्याच्या कालवा जाळ्याच्या दुरुस्ती, नूतनीकरणासाठी 250 कोटींहून अधिक रुपयांच्या निधीला तत्त्वत: मान्यता दिली आहे. पाटील यांच्यासमोर नद्या आणि जलस्रोतांच्या, विशेषतः साळ नदी आणि सांतइनेज खाडीच्या स्वच्छता वपुनरुज्जीवनासाठीचे प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रकल्पांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर झाल्यानंतर केंद्र सरकार या प्रस्तावांवर सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन पाटील यांनी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे प्रलंबित असलेल्या गोव्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
एसटी समाजाला येत्या 2027 च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. केंद्रीय नेत्यांशी एसटी आरक्षणाच्या विषयावर चर्चा करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.