पंजशीर पडले!

0
44

अखेर पंजशीर पडले. पाकिस्तानचे सर्वतोपरी लष्करी साह्य असलेल्या तालिबानपुढे नॅशनल रेझिस्टन्स फोर्सला अपुर्‍या शस्त्रसामुग्रीनिशी आणि चहुबाजूंनी कोंडी केलेल्या स्थितीत टिकाव धरणे कठीण होते. परंतु तरीही अहमद मसूद यांनी अत्यंत निधडेपणाने तालिबानला ललकारत तीव्र लढा दिला. अजूनही त्यांनी आपली हार मानलेली नाही. आमचे लढवय्ये अजूनही मैदानात आहेत आणि धोरणात्मक ठिकाणांवरून ते तालिबानशी लढतील असे मसूद यांनी जाहीर केले आहे. अर्थात, ह्या लढण्याला मर्यादा आहेत. मसूद यांनाही त्याची जाणीव आहे. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी अफगाणिस्तानच्या जनतेला राष्ट्रीय उठावाची हाक दिलेली आहे. परंतु तालिबानसारख्या क्रूर, पाशवी राजवटीशी लढण्यासाठी निःशस्त्र उठाव करणे म्हणजे स्वतःला मरणाच्या दारात लोटणे ठरेल, त्यामुळे इच्छा असूनही अफगाणी नागरिक त्यात उतरू शकणार नाहीत.
पंजशीरचे खोरे सोव्हियतांविरुद्धच्या युद्धात आणि नंतरच्या नव्वदच्या दशकातील तालिबानी राजवटीमध्ये देखील अजेय राहिले होते, परंतु तत्कालीन युद्धतंत्र आणि युद्धसामुग्री आणि आजची अद्ययावत युद्धसामुग्री आणि तंत्रज्ञान यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे तालिबानला पाकिस्तानच्या प्रशिक्षित लष्कराची सर्वतोपरी मदत मिळाली आणि
पाकिस्तानी लष्कराच्या द्रोनद्वारे जेव्हा पंजशीरवर बॉम्बफेक सुरू झाली, तेव्हा तेथील डोंगराळ भागातील आपल्या ठिकाणांवर पाय रोवून, खालच्या मैदानी भागांवरून चढाई करू पाहणार्‍या तालिबानला रोखून धरलेल्या एनआरएफच्या लढवय्यांना तेथे टिकाव धरणे कठीण होणे स्वाभाविक होते. शिवाय संख्येच्या आणि शस्त्रबळाच्या दृष्टीनेही तालिबानी वरचढ होते. त्यामुळे बघता बघता एका रात्रीत पंजशीरच्या सर्व सातही जिल्ह्यांमध्ये तालिबानी पोहोचले आणि त्यांनी महत्त्वाची ठिकाणे काबीज केली आहेत.
खरे तर अहमद मसूद यांना आपल्या पराभवाची चाहुल लागली होती आणि म्हणूनच रविवारी रात्री त्यांनी तालिबान युद्ध थांबवायला आणि आपले मुजाहिद मागे घ्यायला तयार असेल तर सर्व शस्त्रे खाली ठेवून चर्चेला सामोरे येण्याची तयारी दर्शवली होती. परंतु तालिबानला वाटाघाटींत रस नव्हता. त्यांना पंजशीर काबीज करून मसूद आणि अमरुल्ला सालेहचा नायनाट करायचा होता. अद्याप तरी त्यांना ते शक्य झालेले नाही. अहमद मसूद आणि अमरुल्ला सालेह ह्या दोन्ही नेत्यांनी पंजशीर खोर्‍याबाहेर आश्रय घेतल्याच्या बातम्या आहेत आणि तालिबानच्या म्हणण्यानुसार मसूद कजाकिस्तानमध्ये पळून गेले आहेत. अमरुल्ला सालेह यांच्या हेलिकॉप्टवर तालिबानने ताबा मिळवल्याचेही सांगितले जात आहे. प्रत्यक्ष सत्य काय आणि प्रचाराचा भाग काय हे बाह्य जगाला कळणे अवघड आहे, परंतु पंजशीर आज अजेय राहिलेले नाही ही वस्तुस्थिती दिसते.
पंजशीर खोर्‍याची संपूर्ण रसद तोडून तालिबानने त्या प्रदेशाची कोंडी केली होती. खरे तर आंतरराष्ट्रीय संस्थांनी ह्या प्रश्नाची, पंजशीरच्या जनतेच्या मानवाधिकारांची दखल घेऊन तातडीने हस्तक्षेप करणे जरुरी होते, परंतु संयुक्त राष्ट्रसंघासह सर्व आंतरराष्ट्रीय संस्था आणि अमेरिकेसह सर्व महासत्तांनी केवळ बघ्याची भूमिका घेणेच पसंत केले. त्यामुळे पंजशीरच्या लढ्याला बाह्य पाठबळ मिळू शकले नाही. आता अमेरिकेने आपले दूत म्हणून परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांना कतारला मध्यस्थीसाठी रवाना केले आहेत, परंतु मुळातच उशीर झाला आहे. पंजशीरच्या जनतेची संपूर्ण कोंडीमुळे खाण्यापिण्याची आबाळ चालली आहे. छोट्या छोट्या मुलांच्या छायाचित्रासह अमरुल्ला सालेह यांनी जगाला मदतीची हाक दिली होती, परंतु त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. शियापंथीय इराण वगळता कोणीही पंजशीरच्या बाजूने ठामपणे भूमिका घेतलेली दिसली नाही. परंतु आज पंजशीरच्या पराभवासरशी तेथील जनतेवर तालिबान्यांकडून अत्याचार होणार नाहीत, त्यांना अमानुष क्रौर्याचा सामना करावा लागणार नाही, बायाबापड्यांवर तेथे सूड उगवला जाणार नाही हे तरी किमान आंतरराष्ट्रीय समुदायाने पाहिले पाहिजे. पंजशीरचा पराभव हा केवळ नॅशनल रेझिस्टन्स फोर्सचा पराभव नाही. पुन्हा एकवार अफगाणिस्तानला मध्ययुगाकडे घेऊन चाललेल्या तालिबानच्या विरोधात भक्कमपणे उभ्या ठाकलेल्या पंजशीरच्या शेरांचा हा पराभव नाही. हा समस्त सुसंस्कृत आधुनिक मानवजातीचा पराभव आहे. तो मानवतावादाचा पराभव आहे. तो आधुनिक विचारांचा पराभव आहे हे विसरले जाऊ नये. तालिबानशी अल कायदा आणि पाकिस्तानी आयएसआयची अभद्र युती हा अवघ्या जगासाठी भावी धोक्याचा गंभीर इशारा आहे.