गोवा मुक्तीसाठी नौदलाची महत्त्वाची भूमिका

0
42

>> राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून गौरवोद्‌‌गार; नौदल विमानसेवेला ‘राष्ट्रपती ध्वज’ प्रदान

नौदल विमानसेवेने केवळ युद्धातच आपली क्षमता सिद्ध केली नाही, तर ऑपरेशन कॅक्टस, ऑपरेशन ज्युपिटर, ऑपरेशन शील्ड, ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन पराक्रम यासारख्या मोहिमांमधील आपल्या शौर्याने स्वतःला वेगळे सिद्ध केले आहे. विमानवाहक आयएनस विक्रांत जहाज १९६१ मध्ये कार्यान्वित झाल्यानंतर भारतीय नौदलाला शक्ती प्राप्त झाली. या नौदल विमानसेवेने गोवा मुक्ती संग्रामात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे आज नौदल विमानसेवेला ‘राष्ट्रपती ध्वज’ प्रदान करणे हे आपल्यासाठी खरोखर अभिमानास्पद क्षण आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी दाबोळी येथील आयएनएस हंसा तळावर भारतीय नौदल विमानसेवेला ‘राष्ट्रपती ध्वज’ सुपूर्द केला. यावेळी नौदलाने राष्ट्रपतींना ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. तीन दिवसीय गोवा दौर्‍यावर असलेल्या राष्ट्रपतींनी नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह यांच्या उपस्थितीत नौदल विमानसेवेला ‘राष्ट्रपती ध्वज’ अर्पण केला. राष्ट्रपती ध्वज हा कोणत्याही लष्करी तुकडीला राष्ट्राच्या अतुलनीय सेवेसाठी दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. भारतीय सशस्त्र दलांमध्ये पहिल्यांदा हा सन्मान भारतीय नौदलाला मिळाला होता. त्यावेळी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २७ मे १९५१ रोजी हा ध्वज प्रदान केला होता.

हंसा तळावरील या समारंभाला राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटन, बंदर जहाज आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक, नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ वेस्टन नेव्हल कमांड व्हाइस ऍडमिरल आर. हरी कुमार आणि फ्लॅग ऑफिसर नेव्हल एव्हिएशनसह रिअर ऍडमिरल फिलिपोज जी. पायनुमूटिल, इतर नागरी आणि लष्करी मान्यवर उपस्थित होते.

भारतीय नौदल स्वदेशीकरणात आघाडीवर आहे आणि हे नौदलाच्या वर्तमान आणि भविष्यातील योजनांतून चांगले दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’च्या अनुषंगाने भारतीय नौदल विमानसेवेने ‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या अनुरूप प्रगती केली आहे. विमानसेवा तंत्रज्ञानाच्या प्रचंड प्रगतीमुळे आज आधुनिक, अत्याधुनिक स्वदेशी, शस्त्रे स्थापित केली जात आहेत. एचएएल निर्मित चेतक, एएलएच, डॉर्नियर आणि हॉक विमाने गेल्या ६ दशकांपासून भारतीय नौदलाच्या ताफ्यात आहेत, असे रामनाथ कोविंद म्हणाले.

भारतीय नौदल विमानसेवेने गेल्या काही दशकांमध्ये एक स्थिर प्रवास केला आहे. ११ मे १९५३ रोजी आयएनएस गरुडाच्या पहिल्या भारतीय नौदल हवाई केंद्राच्या कामाला सुरुवात झाली, तेव्हापासून नौदलाची विमान वाहतूक शाखेने खूप प्रगती केली आहे. युद्ध आणि आपत्ती निवारणाच्या कार्यासाठी नौदलाच्या विमानसेवेला राष्ट्रपतींचा रंग देणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. या महत्त्वाच्या प्रसंगी सर्व दिग्गजांचे आणि नौसेनेतील विमानसेवकांचे अभिनंदन करू इच्छितो, असेही ते म्हणाले.

नैसर्गिक आपत्तीतही महत्त्वाची भूमिका
देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारताच्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी एका मजबूत नौदलाची गरज होती. देश सुरक्षेच्या हेतूने स्थापन झालेल्या नौदल विमानसेवेने केवळ युद्धातच आपली क्षमता सिद्ध केली नाही, तर असंख्य मानवतावादी मदतकार्ये आणि नैसर्गिक आपत्ती निवारणाच्या कार्यात देखील नौदल विमानसेवेने महत्त्वाची भूमिका बजावली, असेही राष्ट्रपती म्हणाले.

विविध पदक प्राप्तीतून कार्याची साक्ष
गेल्या अनेक वर्षात नौदल विमानसेवेला एक महावीर चक्र, सहा वीर चक्र, एक कीर्ती चक्र, सात शौर्य चक्र, एक युध्द सेवा पदक आणि मोठ्या संख्येने नौसेना पदके देण्यात आली आहेत. हा सन्मान नौदल विमानसेवेच्या कार्याची साक्ष आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले.