पंजशीरचा लढा

0
53

गेल्या पंधरा ऑगस्टला काबूलवर कब्जा करून अवघ्या अफगाणिस्तानवर सत्ता गाजवू पाहणार्‍या तालिबानला पंजशीर खोर्‍यातून नॅशनल रेझिस्टन्स फोर्सेसच्या लढवय्यांनी दिलेले जबरदस्त आव्हान मोडून काढण्यासाठी तालिबानने सध्या आकाशपाताळ एक केलेले दिसते. काबूलच्या उत्तरेस अवघ्या शंभर किलोमीटरवर असलेले पंजशीरचे दुर्गम आणि आजवर अजेय राहिलेले खोरे ताब्यात मिळवण्यावर तालिबानने आपले सर्व लक्ष केंद्रित केलेले आहे. घनघोर लढाई तेथे सुरू आहे. सरकार स्थापन करायच्याही आधी पंजशीर ताब्यात घेऊन अवघा अफगाणिस्तान आपल्या टाचेखाली आणायचा तालिबानचा प्रयत्न दिसतो.
अफगाण राष्ट्राध्यक्ष अब्दुल घनी यांनी ओमानमध्ये पलायन करताच अमरुल्ला सालेह यांनी आपण अद्याप मैदानावर आहोत आणि घटनेनुसार राष्ट्रप्रमुखपदाची जबाबदारी आपली आहे असे सांगून तालिबानला ललकारले आणि पंजशीरमध्ये आश्रय घेतला, तेव्हापासून पंजशीर खोरे हे जगाच्या कुतूहलाचा विषय बनून राहिले आहे. अहमद मसुदच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानातील सर्व तालिबानविरोधी शक्ती तेथे आज एकवटल्या आहेत आणि अक्षरशः जिवाची बाजी लावून तालिबान्यांच्या प्रतिकारासाठी सज्ज आहेत, अहोरात्र लढत आहेत.
सोव्हियतांच्या अफगाणिस्तानमधील घुसखोरीच्या काळात अहमदशहा मसूद यांनी पंजशीरमध्ये त्यांना पाऊलही ठेवू दिले नव्हते. तालिबान्यांनी जेव्हा सोव्हिएतांच्या गमनानंतर आपले क्रूर, राक्षसी शासन लागू केले तेव्हाही पंजशीर हाच विरोधाचा सर्वांत खणखणीत सूर राहिला होता आणि तालिबान्यांना तेथे पाय टाकू दिला गेला नव्हता. दुर्दैवाने अकरा सप्टेंबरच्या जागतिक व्यापार केंद्रावरील हल्ल्याच्या दोनच दिवस आधी अहमदशहा मसुद यांची टीव्ही कॅमेर्‍यात ठेवलेल्या शक्तिशाली बॉम्बच्या स्फोटाद्वारे अल कायदाच्या दहशतवाद्यांनी हत्या केली, परंतु आज मसुद यांचेच सुपुत्र अहमद मसुद आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल टाकत तालिबानसमोर बंडाचे निशाण घेऊन ठामपणे उभे ठाकलेले आहेत.
तालिबानने चहुबाजूंनी पंजशीर खोर्‍याची कोंडी केलेली आहे आणि तेथील सातपैकी खिंज आणि उनाबाह ह्या दोन जिल्ह्यांवर आपण कब्जा मिळवल्याचा आणि प्रांतिक राजधानी बझारकच्या गव्हर्नरचे निवासस्थानही काबीज केल्याचा तालिबानचा दावा आहे, परंतु त्याला अद्याप रेझिस्टन्स फोर्सकडून दुजोरा मिळालेला नाही. उलट त्यांनी तुंबळ लढाईमध्ये सहाशेहून अधिक तालिबान्यांना यमसदनी पाठविल्याचे वृत्त रशियाच्या ‘स्पुतनिक’ वृत्तसंस्थेने दिलेले आहे. त्यामुळे पंजशीरमधील प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे आणि कोण विजयाच्या दिशेने चालले आहे हे समजणे कठीण आहे, परंतु ज्या निर्धाराने आणि प्रखरपणे अहमद मसुद आणि त्याच्या लढवय्या वीरांनी तालिबान्यांच्या विरोधात संघर्ष पुकारला आहे तो निश्‍चितपणे ऐतिहासिक स्वरूपाचा आहे. जय – पराजय कोणाचाही होवो, इतिहास त्याची नेहमीच नोंद ठेवील.
पंजशीर सर करण्यासाठी तालिबानने अल कायदाचीही मदत घेतली आहे आणि नुकत्याच उघड झालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी सैन्यही तालिबानच्या मदतीला धावलेले आहे. काही पाकिस्तानी सैनिकांची ओळखपत्रेही रेझिस्टन्स फोर्सेसच्या हाती लागली. रावळपिंडीच्या पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयातून पंजशीरमधील लढाईवर नजर ठेवली जात आहे आणि पाकिस्तानी लष्कराने आपली द्रोन आणि इतर युद्धसामुग्री तालिबानच्या मदतीस तेथे तैनात केली आहे अशा बातम्या आहेत. पाकिस्तानच्या आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद नुकतेच काबूलमध्ये डेरेदाखल झाले. तालिबानशी असलेले पाकिस्तानचे साटेलोटे तर जगजाहीर आहेच. पण आयएस- खोरासान आणि अल कायदाच्या निःपातासाठी पाकिस्तानने पुढाकार घ्यावा यासाठी अमेरिका पाकिस्तानवर दबाव आणत असल्याची बातमी नुकतीच पाकिस्तानच्या ‘डॉन’ वृत्तपत्राने अमेरिकेच्या काही गोपनीय तारांच्या आणि कागदपत्रांच्या हवाल्यानिशी दिली आहे. काहीही करून पंजशीर सर करण्यासाठी तालिबान अल कायदापासून पाकिस्तानपर्यंत सर्वांची मदत घेताना दिसते आहे. त्यांच्यासाठी तो प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. पंजशीर अजेय राहिले तर हा काटा आपल्या वाटेत सलत राहील ह्याची तालिबानला कल्पना आहे. या घडीला उर्वरित जग पंजशीरच्या लढ्याकडे त्रयस्थपणे नुसते बघत बसणार आहे का हाच खरा प्रश्न आहे. पंजशीरच्या शेरांना आज मदतीची जरूरी आहे.