तीन दिवसांच्या दौर्‍यासाठी राष्ट्रपतींचे राज्यात आगमन

0
42

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे काल रविवारी दुपारी ३ वाजता दाबोळी हंस तळावर वायुसेनेच्या विशेष विमानाने आगमन झाले. हंस तळावर त्यांचे स्वागत गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, राज्य शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो व मुख्य सचिव परिमल राय उपस्थित होते. तसेच यावेळी पोलीस महासंचालक मुकेशकुमार मीना हेही उपस्थित होते.

राष्ट्रपती कोविंद यांचे विमानतळावर स्वागत झाल्यानंतर ते खास हेलिकॉप्टरमधून दोनापावल येथे रवाना झाले. राष्ट्रपती येणार असल्याने दाबोळी विमानतळ परिसर ते झुवारीनगरपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडता कामा नये म्हणून येथील दुकाने व इतर व्यवसाय संपूर्ण बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे दुपारी दोन वाजल्यापासून संपूर्ण महामार्गावर शुकशुकाट होता. राष्ट्रपती दोनापावला जायला रवाना होताच वाहतूक तसेच या भागातील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात आले.

राष्ट्रपती कोविंद यांचा हा तीन दिवसांचा दौरा असून ते ७ सप्टेंबरपर्यंत गोव्यात असतील. या काळात आज सोमवारी ६ सप्टेंबर रोजी हंस तळावर नौदलाच्या तळाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. त्यांचे वास्तव्य येथील राजभवनात असणार आहे.

भारतीय नौदलाच्या हवाई उड्डाण विभागाला ‘प्रेसिडेन्ट कलर्स’ हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला असून आज दि. ६ रोजी भारतीय नौदलाच्या ‘हंस’ तळावर एका परेडमध्ये राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. याप्रसंगी टपाल खात्यातर्फे खास तिकीट जारी करण्यात येणार आहे. यावेळी राज्यपाल पिल्लई, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नौदलप्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह व इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.