विघ्नहर्त्या, दुःख दूर कर!

0
49
  • डॉ. जयंती नायक

गणेशाच्या आगमनाचा आनंद लहान-मोठ्या, गरीब-श्रीमंत सर्वांनाच आहे. दुःखहर्ता गणेश पृथ्वीतलावरील सारी दुःखे दूर करणार असा विश्वास लोकांच्या मनात आहे. देवा, लोकांच्या या श्रद्धेला-विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस!

गणेशचतुर्थी वा ‘चवथ’ हा हिन्दू धर्मीयांचा महत्त्वाचा सण. भारतभर किंबहुना जगात जिथे जिथे हिन्दुधर्मीय समाज आहे, तिथे तिथे हा सण साजरा केला जातो. भारताच्या इतर राज्यांच्या मानाने गोवा-महाराष्ट्रात या सणाचे प्रस्थ जास्त आहे. पूर्ण कोकणपट्टीतला हा प्रमुख सण. भारतीय समाजाचा धार्मिक आणि सामाजिक सलोखा जपणारा हा सण आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. गरिबातील गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत आपल्या ऐपतीप्रमाणे हा सण साजरा करतो.

यासंबंधाने गोव्यात प्रचलित असलेल्या एका लोककथेचा मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो. एक बाई आपल्या मुलांसह एका गावात राहत होती. ती खूपच गरीब होती. मुलांना पोटभर जेवायला वाढायचीही तिची ऐपत नव्हती. तर एके चतुर्थीच्या दिवशी ‘आमच्याही घरी गणपती पुजूया’ म्हणून मुलं हट्ट धरतात. त्यावेळी मुलांच्या आनंदासाठी ती गणपती पुजायचा ठरवते. मुलं मातीपासून गणपतीची मूर्ती बनवतात. इथल्या तिथल्या झाडांची पानं-फुलं आणून त्या मूर्तीची पूजा करताना, त्यावेळी घरात गणपतीच्या नैवेद्यासाठी काहीच नसल्याने टाकळ्याचा पाला शिजवून त्याचा गणपतीला नैवेद्य दाखवायचा ठरवून ती टाकळ्याची भाजी आणायला रानात जाते. तिथे तिला चोरांनी लुटून आणलेला माल सापडतो, ज्यामुळे पुढे तिची गरिबी दूर होऊन ती अन् तिची मुलं सुखानं जगतात.

गणेशचतुर्थी अथवा सामान्यांच्या भाषेत जिला ‘चवथ’ म्हणतात, तो सण भाद्रपद शुद्ध चतुर्थीला येतो. सामान्यतः तो दीड दिवसाचा असतो. हा सण गणपती या दैवताचा, ज्याला गजानन, विघ्नहर्ता, विनायक, लंबोदर, एकदंत, विद्याधर, हेरंब अशा विविध नावांनी ओळखतात. चतुर्थी हा गणपतीचा प्रिय दिवस. त्यातल्या त्यात भाद्रपदातील चतुर्थी त्याला अधिक प्रिय म्हणून या दिवशी त्याची खास पद्धतीने पूजा केली जाते. तोच दिवस सण आणि पुढे उत्सव झाला अशी धारणा आहे. मात्र गोव्यातील सर्वसामान्यांमध्ये तो गणपती जन्माचा दिवस अशी समजूत आहे, आणि या समजुतीला धरून गौरीच्या डोहाळ्याचे वगैरे पदार्थ नैवेद्यात बनवले जातात.
भारतीय लोकमानसावर गणपती या दैवताचा मोठा प्रभाव आहे. ते आराध्य अथवा इष्ट दैवत असल्याने त्याची पूजा-आराधना कोणीही करू शकतो. स्त्रियासुद्धा त्याची पूजा करू शकतात असे शास्त्र सांगते. मात्र समाजात आपापल्या सोयीप्रमाणे धारणा तयार केलेल्या दिसतात, ज्यांना धरून गोव्यात तरी गणेशचतुर्थीला पुरुषांनीच गणपतीच्या मूर्तीची पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच एका वंशावळीमध्ये मूळ घरातच गणेशमूर्तीची स्थापन करावी अशीसुद्धा समजूत आहे. मात्र हल्ली तिला कलाटणी दिलेलीही दिसते. सख्खे भाऊ-भाऊसुद्धा वेगवेगळे गणपती आज पुजताना दिसतात. तसेच आदिवासी समाजात घरात गणपतीच्या मूर्तीपूजनाची परंपरा बरीच उशिरा आल्याची माहिती सापडते.

गणपती अथवा गणेश या दैवताची उत्पत्ती कृषिप्रधान अनार्य संस्कृतीत झाली हा सिद्धांत सर्वमान्य आहे. तरी पण गोव्यात घरोघरी गणपतीची मातीची मूर्ती पूजनाची परंपरा कधीपासून सुरू झाली याचा निश्चित काळ अजून सापडत नाही. परंतु पोर्तुगिजांनी सुरू केलेल्या इंक्वीझिशनकाळी ही परंपरा चालू होती हे सत्य. पोर्तुगिजांच्या जुलमांपासून आपल्या धार्मिक प्रथा-परंपरांचा सांभाळ करण्याच्या हेतूने मातीच्या मूर्तीच्या जागी कागदावर रेखाटलेले गणपतीचे चित्र लाकडी पेटीच्या झाकणाला आतील बाजूने चिकटवून पुजले गेल्याची माहिती सापडते, जे आज या घरांमध्ये प्रथारूप बनून आजही प्रचालनात असलेले दिसते.
गणपतीचे हस्तीमुख रूप पाचव्या शतकापूर्वी अस्तित्वात नव्हते अशी माहिती मिळते. गुप्तकाळात त्याच्या हस्तीमुख रूपाचे सर्वप्रथम संदर्भ सापडतात. परंतु घरोघरी गणेशमूर्ती पूजनाची प्रथा कधीपासून सुरू झाली, याचे ठोस संदर्भ मात्र सापडत नाहीत. माझ्या मते ती प्रथा निदान एक हजार वर्षांपूर्वीची तरी असावी. आणि जरी गणपती हे मूळ कृषिप्रधान अनार्य संस्कृतीत उदयाला आलेले दैवत असले तरी ही प्रथा मात्र आर्य संस्कृतीच्या प्रभावातून जन्माला आलेली असावी.

आज गणपतीच्या पूजेत आर्य आणि अनार्य संस्कृतीच्या वैशिष्ट्यांचा सुरेख असा सुमेळ दिसतो. कित्येक विधी वैदिक मंत्रोचारांनी पूर्ण केलेले दिसतात, तर काही प्रथा पूर्वापार चालत आलेल्या दिसतात, ज्यामुळे शेतीप्रधान अनार्यांच्या आहेत हे स्पष्ट जाणवते. उदा. नव्यांची पूजा (नवकणसांची पूजा). नव्या धान्याच्या लाह्या गणपतीवर उधळण्याची प्रथा, गणपतीच्या नैवेद्याच्या जेवणात २१ पालेभाज्या बनवण्याची प्रथा वगैरे.
कृषिसंस्कृतीत गणपतीला सृजनाचे दैवत मानून, निसर्गातील अनेकविध सृजन प्रतीके वापरून त्याची आराधना करण्याची प्रथा उदयाला आली. गणपती पूजनात माटोळीला असलेले महत्त्व, गणपतीला दूर्वा-पत्री अर्पण करणे या गोष्टींचा यासंदर्भाने इथे उल्लेख करता येतो. इतर राज्यांच्या मानाने कोकणात माटोळीला जास्त महत्त्व दिलेले दिसते. सुमारे ४०० वस्तू माटोळीला गोव्यात बांधल्या जातात अशी सूची सापडते. पावसाळ्यात रुजलेल्या, फुललेल्या, फळलेल्या औषधी आणि जीवनसत्त्वे यांनी युक्त अशा वनस्पती आणि त्यांची फळे माटोळीला बांधली जातात.

गणेशचतुर्थीचा मूळ उत्सव फक्त दीड दिवसाचा; परंतु भाद्रपद शुद्ध तृतीयापासून अनंत चतुर्थीपर्यंत चवथीच्या उत्सवाचे वातावरण असते. काही घरांमध्ये २१ दिवसांपर्यंत गणपती ठेवलेला असतो. गणपतीविषयी एवढा स्नेह गोमंतकीय समाजात आहे की त्याचे विसर्जन करूनसुद्धा त्याची मूर्ती पुढील वर्षी गणपती घरी येईपर्यंत काही घरांनी ठेवली जाते.

गोव्यात तरी गणेशचतुर्थी हा नुसता धार्मिक भावना जोपासणारा सण नसून तो येथील अर्थव्यवस्थेलाही चालना देणारा सण आहे. घरादारांची सजावट, रंगरंगोटी, रोषणाई, सजावट, कपडेलत्ते, अलंकार, जेवण सामग्री, मिठाई, अन्य जीवनावश्यक वस्तू इत्यादींची खरेदी-विक्री यानिमित्याने करोडो रुपयांची उलाढाल होते.

हा हिन्दुधर्मीयांचा सण असला तरी पूर्वीपासूनच शेजार-पाजारच्या इतर धर्मीयांशी असलेले भावबंध या सणाच्या निमित्ताने वृद्धिंगत होताना दिसतात. हिंदूंबरोबरच इतर धर्मीयसुद्धा या सणाची उत्सुकतेने वाट बघतात. आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्यातील कित्येक जण मोठ्या भावार्थाने गणेश देवाला साकडे घालताना आणि प्रार्थना करताना दिसतात. या वर्षांत कुठे कुठे इतर धर्मीयांनी भाद्रपद चतुर्थीला आपल्या घरात गणपतीची मूर्ती पुजली आहे अशाही बातम्या ऐकू येतात. मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गावोगावी आणि नाक्यानाक्यांवर सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव हाही तितकाच महत्त्वाचा आहे. सामाजिक एकात्मता बलिष्ठ बनवण्यास त्याचे खूप मोठे योगदान आहे.
मात्र गेली चतुर्थी आणि यंदाची चतुर्थी म्हणून एकंदर दोन चतुर्थ्या कोरोना महामारीच्या प्रभावाखाली गेलेल्या आहेत. यंदा कोरोनाची सध्याची स्थिती थोडी बरी आहे, परंतु मागील तीन-चार महिन्यांत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने जो थरकाप माजवला त्याची भीती अजूनही लोकांच्या मनातून गेलेली नाही. त्यात भर म्हणून जुलै महिन्यात पावसाने तांडव करून हजारो लोकांचे जीवन होत्याचे नव्हते केले. त्या धक्क्यातून अजून कित्येक गाव सावरलेले नाहीत. या वातावरणात यंदाची चतुर्थी येते आहे. गणेशाच्या आगमनाचा आनंद लहान-मोठ्या, गरीब-श्रीमंत सर्वांनाच आहे. त्याचबरोबर दुःखहर्ता गणेश येऊन पृथ्वीतलावरील सारी दुःखे दूर करणार असा विश्वास लोकांच्या मनात आहे. माझी त्या विघ्नहर्त्याकडे दोन्ही हात जोडून प्रार्थना आहे की लोकांच्या या श्रद्धेला-विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस.