नोटबंदी हा ९९ टक्के प्रामाणिक लोकांवरील हल्ला ः राहुल

0
98

>> फातोर्ड्यातील सभेत मोदी सरकारवर टीकास्त्र

 

मोदी सरकारची नोटबंदी ही भ्रष्टाचार किंवा काळ्या पैशाविरुद्धची लढाई नसून देशातील एक टक्का अतिश्रीमंत लोकांसाठी ९९ टक्के सर्वसामान्य प्रामाणिक लोकांवर केलेला हल्ला आहे, अशी टीका कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काल फातोर्डा येथील जाहीर सभेत केली. नोटबंदी हा भ्रष्टाचारावरील सर्जिकल स्ट्राइक नसून प्रामाणिक लोकांवरील अग्निवर्षाव आहे असे ते उद्गारले.

मोदी सरकारने देशाला एक टक्का अतिश्रीमंत आणि ९९ टक्के गोरगरीब अशा दोन भागांत विभागले असून शेतकरी, मजूर, छोटे दुकानदार, मध्यमवर्गीय यांच्या कष्टाची कमाई नोटबंदीने काढून घेतली आहे अशी टीका त्यांनी केली. गेल्या अडीच वर्षांत मोदी सरकारने १ टक्का अतिश्रीमंतांना देशाचे ६० टक्के धन मिळवून दिले असे ते पुढे म्हणाले. देशातील ५० कुटुंबांपाशी सर्वाधिक काळा पैसा असून तेच लोक मोदींसमवेत विदेश दौरे करून स्वतःचे व्यापारी करार-मदार करीत आहेत अशी टीकाही राहुल यांनी यावेळी केली.
देशातील एक टक्का अतिश्रीमंत लोकांनी बँकांमधून आठ लाख कोटी रुपये हडप केले होते. पण याच लोकांना कर्जमाफी या सरकारने दिली. नोटबंदीनंतर विजय मल्ल्याचे बाराशे कोटी कर्ज माफ केले गेले असे सांगून राहुल म्हणाले की ‘गरिबोंसे खिंचो और इन लोगोंको सिंचो’ हेच मोदी सरकार करीत आले आहे. गरिबांचा पैसा हिसकावून घेऊन मोदींनी बँका चालू केल्या. एटीएमपुढे लागणार्‍या रांगांत एक तरी बडी व्यक्ती दिसली का, असा प्रश्न त्यांनी केला.
कॅशलेस व्यवहारांत पाच ते सहा टक्के रक्कम मधल्या मध्ये गायब होईल आणि ती या एक टक्का लोकांपाशी जाईल असे टीकास्त्रही राहुल यांनी सोडले.
भाजपची सरकारे सर्वसामान्यांचे हक्क काढून घेत आहेत, त्यांनी मनरेगा संपवण्याचा प्रयत्न केला, संसदेत त्याची खिल्ली उडवली, अनेक राज्यांत आदिवासींचे हक्क हिरावून घेतले, गोव्यात खाण माफियांना समर्थन दिले असे आरोपही राहुल यांनी केले.
सगळा रोख पैसा म्हणजे काळा पैसा नव्हे आणि सगळा काळा पैसा रोखीत नसतो असे सांगून राहुल म्हणाले की देशातील अतिश्रीमंत कुटुंबांनी काळा पैसा रिअल इस्टेट, विदेशी बँका आदींमध्ये गुंतवलेला आहे. केवळ ६ टक्के काळा पैसा रोखीत असून ९४ टक्के काळा पैसा रिअल इस्टेट, सोने आणि विदेशी बँकांत गुंतवलेला आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. मोदींना हे पुरेपूर ठाऊक आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी विदेशी बँकांतील काळा पैसा भारतात आणण्याची बात केली होती. ते पैसे परत आणून गरिबांच्या खात्यांत प्रत्येकी १५ लाख घालणार म्हणाले होते. मिळाले का तुम्हाला ते पैसे? मोदी सरकारने किती बड्या लोकांना तुरुंगात टाकले? ललित मोदी आणि विजय मल्ल्या कुठे आहेत असे सवाल त्यांनी केले.
नोटबंदीद्वारे मोदींनी शेतकरी, मजूर यांच्या घरादाराला आग लावली. गोव्यातील मासेमारी, पर्यटन उद्योगाला नामशेष केले, पुण्यातील वाहन उद्योग, पंजाबमधील सायकल उद्योग, कानपूरचा चामड्याचा उद्योग अशा उद्योगांना नेस्तनाबूत केले असल्याचे ते पुढे म्हणाले.
लोक हुशार आहेत. जनता सगळे जाणते. ती निर्णय घेईल. गोव्यात कॉंग्रेसचे सरकार येईल आणि आम लोकांसाठी काम करील. पाच वर्षांत ‘चमकणारा गोवा’ देऊ असे सांगून राहुल यांनी भ्रष्टाचाराचे एक जरी प्रकरण समोर आले तरी शंभर टक्के कारवाई करू अशी ग्वाही यावेळी दिली.
या सभेत व्यासपीठावर कॉंग्रेस प्रभारी दिग्विजयसिंह, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रतापसिंह राणे, रवी नाईक, आमदार बाबू कवळेकर, प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो आणि इतर कॉंग्रेसजनांची उपस्थिती होती.

क्षणचित्रे
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी आपल्या भाषणात राहुल गांधी यांना उद्देशून सांगितले की, ‘‘आपल्या आजोबांनी गोव्याला स्वातंत्र्य दिले, आजीने कोकणी भाषेला साहित्य अकादमीची मान्यता दिली, वडिलांनी घटक राज्याचा दर्जा दिला आणि कोकणीला राजभाषा बनवले’’ सोनिया गांधी यांचा उल्लेख त्यांनी त्यागमूर्ती असा केला.
राज्य सरकारचे वर्तन ठीक नाही, ते परिवर्तन काय करणार असे फालेरो म्हणाले.
प्रतापसिंह राणे यांनी यावेळी हिंदीतून भाषण केले. राहुल यांचा उल्लेख त्यांनी ‘भारताचे भावी प्रधानमंत्री’असा केला. विद्यमान सरकार कुचकामी असल्याची टीका त्यांनी केली.
यावेळी राहुल यांच्या हस्ते प्रचारगीताच्या सीडीचे प्रकाशन करण्यात आले. त्यातील ‘यू टर्न मारपी सरकार’ या गाण्यावर राहुल यांनी उभे राहून टाळ्यांवर ताल धरला. उपस्थित कार्यकर्त्यांनीही त्यांना साथ दिली.
राहुल यांनी आपल्या भाषणात बेंगलुरूच्या ‘लक्ष्मी’ या फूलवालीची गोष्ट सांगितली. नोटबंदीमुळे ती बेंगलुरूच्या रस्त्यांवर भीक मागत असल्याचे त्यांनी सांगितले.