नोकरभरती गुणवत्तेनुसार, पारदर्शकपणे व्हावी ः गोम्स

0
75

३२ डेटा ऑपरेटर्सचे काय
झाले त्याचे स्मरण करा

राज्यातील विविध सरकारी खात्यातील हजारो पदे भरण्याचे काम पारदर्शकपणे व गुणवत्तेनुसार होईल याकडे राज्यातील तरुण वर्गाने लक्ष ठेवावे, असे आवाहन कॉंग्रेसचे नेते एल्वीस गोम्स यांनी तरुणाईला केले आहे. सरकारी नोकरी देण्यासाठी अन्य मंत्री जसे पैसे घेतात तसे आपण घेत नाही असे राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी केलेले विधान व्हिडिओद्वारे वायरल झालेले आहे. ही अत्यंत गंभीर अशी बाब असाहे. मात्र यावरून राज्यात नोकरभरतीचा बाजार कसा सुरू आहे हे उघड होत असल्याचे गोम्स म्हणाले. पुढे बोलताना गोम्स यांनी वशिलेबाजी व लांच घेऊन नोकरभरती करण्याच्या सरकारच्या गैरकृत्यात सामील होऊ पाहणार्‍या सरकारी अधिकार्‍यांना इशारा दिला असून त्यांना परिणाम भोगावे लागतील, असे स्पष्ट केले आहे.

वीज खात्यात २०१६ साली साहाय्यक डेटा एन्ट्री ऑपरेटर्स पदांची भरती करण्यात आली होती. या भरतीला काही उमेदवारांनी आव्हान दिले होते. पाच वर्षे खात्यात सेवा बजावलेल्या ह्या कर्मचार्‍यांना उच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे घरी जावे लागले याची आठवण गोम्स यांनी करून दिली. ही भरती राजकीय वशिल्याने झाल्याचे सिद्ध झाल्याचे गोम्स यांनी म्हटले आहे. नंतर गुणवत्तेनुसार नव्या उमेदवारांची भरती करण्यात आली. संबंधितांवर मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. वीजमंत्री नीलेश काब्राल हे या प्रकरणी मूग गिळून गप्प का आहेत, असा सवालही गोम्स यांनी केला आहे. ह्या नोकर भरतीला कॉंग्रेसचा विरोध नाही. मात्र, ती पारदर्शकपणे व गुणवत्तेवर आधारीत व्हायला हवी, असे गोम्स यांनी म्हटले आहे.