नेहरू, काश्मीर प्रश्‍न आणि नेहरू – पटेल वाद

0
176

शंभू भाऊ बांदेकर
(साळगाव)

सरदार वल्लभभाई पटेलही पं. नेहरूंसारखेच म. गांधींजींचे पट्टशिष्य होते. नेहरूंसारखाच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी सक्रीय भाग घेतला होता. आधुनिक भारताच्या निर्माणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले सरदार पटेल नेहरुंच्या मंत्रिमंडळात उपपंतप्रधान होते. नेहरुंसारखी पक्षीय राजकारणातही त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. पं. नेहरुंना सरदार पटेलांच्या कर्तृत्वाची, नेतृत्वाची पुरेपूर जाण होती.

पं. जवाहरलाल नेहरू म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. बाळ-गोपाळांमध्ये ते ‘चाचा’ म्हणून प्रसिद्ध. रागीट, शीघ्रकोपी असूनही राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसा ह्या मार्गाचा अवलंब करणारे जागतिक शांतिदूत. स्वातंत्र्यसैनिक, थोर लेखक, मुत्सद्दी राजकारणी, स्वतंत्र भारताच्या सर्व प्रकारच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान होते. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाला प्रगतिपथावर नेण्याची, देश सुजलाम् सुफलाम् करण्याची, देशाचा नावलौकिक सातासमुद्रापार नेण्याची किमया केली. म्हणूनच ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ असा त्यांचा सार्थ उल्लेख केला जातो.

हे सारे खरे असले तरी त्यांची जयंती असो किंवा पुण्यतिथी किंवा इतर कोणताही कार्यक्रम असो, विरोधक त्यांचा उल्लेख द्वेषाने करीत असतात आणि यात विशेष करून काश्मीर प्रश्‍न आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी असलेलं त्यांचं वैर या दोन गोष्टी ऐरणीवर असतात. म्हणून या दोन्ही गोष्टींचा उहापोह करण्याचा उद्देश या लेखामागे आहे.
पहिली गोष्ट म्हणजे काश्मीरचा प्रश्‍न गुंतागुंतीचा करून ठेवला तो तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनीच; सरदार पटेल पंतप्रधान असते तर हा प्रश्‍न चुटकीसरशी सोडविला गेला असता असे विरोधकांचे म्हणणे, पण वस्तुस्थिती अशी की, पं. नेहरू काय किंवा सरदार पटेल काय हे दोघेही नेते कट्टर राष्ट्राभिमानी देशभक्त तर होतेच, पण कुशल व मुत्सद्दी प्रशासकही होते. या दोघांपैकी कोणीही काश्मीरच्या समस्येला कारणीभूत नव्हते. उलट महात्मा गांधीजींच्या सूचनेबरहुकूम हा प्रश्‍न शांततेने व अहिंसेच्या मार्गाने सुटावा असाच दोघांचा प्रयत्न होता. सरदार वल्लभभाई पटेल हे उपपंतप्रधान होते. गृह व संस्थान खात्याचे ते मंत्री होते. तडजोड म्हणून निजामांच्या ताब्यात असलेले हैदराबाद संस्थान विनाविलंब विनाअट भारताच्या ताब्यात दिले तर काश्मीर पाकिस्तानाच्या ताब्यात देण्याबाबत गंभीरपणे विचार करता येईल असाही एक तोडगा सरदार पटेलांनी सुचविला होता. पं. नेहरू मात्र हातातून काश्मीर जाऊ नये या भूमिकेशी ठाम होते. त्याला व्यक्तिगत कारणही होते. पं. नेहरू हे काश्मिरी पंडित होते. शेख अब्दुल्ला यांच्याशी त्यांची विशेष मैत्री होती. याचे कारण शेख अब्दुल्ला यांचे पूर्वज हे काश्मिरी पंडित होते. नंतर त्यांनी मुस्लिम धर्मात प्रवेश केला होता. अफगाण राजवटीच्या काळात हे घडले होते. हा इतिहास शेख जिना यांना माहित होता. शिवाय भौगोलिकदृष्ट्या काश्मीर पाकिस्तानला खेटून असल्यामुळे व मुस्लिमबहूल असल्यामुळे हा भाग पाकिस्तानमध्ये विलीन करण्यास मोठा अडथळा येणार नाही, असे जिनांचे मत होते.

काश्मीरचे महाराजा हरिसिंग यांचा मात्र नेहरूंवर विश्‍वास नव्हता. त्यांना नेहरु-अब्दुल्ला मैत्री माहीत होती. शिवाय नेहरूंच्या मैत्रीखातर शेख अब्दुल्ला यांनी आपली त्यावेळची अत्यंत प्रभावी मुस्लिम संघटना- नॅशनल कॉन्फरन्स जी अत्यंत धर्मनिरपेक्ष तत्त्वांवर काम करत असे, ती मुस्लिम लीगबरोबर सामील झाली नाही, हेही राजा हरिसिंगला माहित होते. शेख अब्दुल्ला हे दाट मैत्रीमुळे जसे नेहरुंना जवळ होते, त्याचप्रमाणे त्यांच्या धर्मनिरपेक्षतेमुळेही ते भारताचे मित्र बनले होते. या सार्‍या गोष्टींमुळे काश्मीरचा प्रश्‍न जटील होऊन बसला होता. तेथे आणखी एक गोष्ट नमूद केली पाहिजे ती म्हणजे सरदार पटेल यांनी हैदराबादचा हक्क भारत कदापि सोडणार नाही, हे बजावून सांगतानाच ते काश्मीरवर पाणी सोडायला तयार झाले होते. याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे केंद्र सरकारच्या तिजोरीतून त्या राज्याला सतत अनुदान द्यावे लागेल, हे त्यांना खटकत होते. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत काश्मीर गमावता नये, ही नेहरूंची महत्त्वाकांक्षा तर पाकिस्तानने हैदराबादच्या निजामाच्या संस्थानावरचा हक्क सोडून द्यावा ही सरदार पटेलांची महत्त्वाकांक्षा. अशावेळी नेहरूंमुळे हा प्रश्‍न जटील बनला किंवा सरदार पटेलांनी तो चुटकीसरशी सोडविला असता याला काही अर्थ आहे का, हे वाचकांनीच ठरवावे.

नेहरू – पटेल वाद हा उचलली जीभ अन् लावली टाळ्याला अशाच प्रकारचा म्हणावा लागेल. प्रत्यक्षात या दोघांचे संबंध कसे होते ते पाहूयाः सरदार वल्लभभाई पटेलही पं. नेहरूंसारखेच म. गांधींजींचे पट्टशिष्य होते. नेहरूंसारखाच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी सक्रीय भाग घेतला होता. आधुनिक भारताच्या निर्माणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले सरदार पटेल नेहरुंच्या मंत्रिमंडळात उपपंतप्रधान होते. नेहरुंसारखी पक्षीय राजकारणातही त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. पं. नेहरुंना सरदार पटेलांच्या कर्तृत्वाची, नेतृत्वाची पुरेपूर जाण होती. म्हणूनच त्यांनी पटेलांना उपपंतप्रधानपदाबरोबरच गृह, संस्थान आणि माहिती प्रसारण ही खाती दिली. पटेलांनी या खात्यांना न्याय देताना कसा आपला आगळावेगळा ठसा उमटविला त्याची नोंद इतिहासात सापडते. नेहरु-पटेल यांच्यामध्ये ताण-तणावाचे प्रसंग आले. संधी पाहणार्‍यांनी त्याला वादाचे स्वरुप दिले. सरदार पटेल यांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी नेहरुंना सांगितले, ‘आपण गेली तीस वर्षे सातत्याने या ना त्या कारणाने एकमेकांच्या जवळ आहोत. त्यामुळे आपल्यात कोणतीही औपचारिकता नाही व ती असूही नये. माझी सेवा मी तुम्हाला कधीच अर्पण केली आहे. माझ्या आयुष्यात मी तुमच्याशी नेहमीच एकनिष्ठ राहिलो व पुढेही राहीन. आपल्यातील एकजूट कोणीच तोडू शकणार नाही.’ सरदार पटेल अखेरपर्यंत या म्हणण्याशी एकनिष्ठ राहिले. मुख्य म्हणजे नेहरू-पटेल वाद कॉंग्रेस पक्षात गाजले. वर्तमानपत्रातही ते गाजले. पण काही बाबतीत त्यांची भूमिका वादातीत असून, काही भूमिकांमध्ये विशिष्ट मतभेद असूनही महत्त्वाचे म्हणजेच त्यांची मैत्री अखेरपर्यंत कायम राहिली.

येथे त्यावेळी सर्वत्र गाजलेला एक किस्सा सांगावासा वाटतो. महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर सरदार पटेलांवर गृहमंत्री या नात्याने महात्मा गांधींचे संरक्षण न करण्याचा ठपका ठेवून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली. पटेलांनीही बिनशर्त व विनाविलंब राजीनामा देण्याची तयारी दाखविली व त्वरित तसे पंतप्रधान नेहरूंना कळवले. पं. नेहरुंनीही त्यांना तात्काळ कळवले,‘राजीनामा देण्याची काहीच गरज नाही. जेव्हा बापू जिवंत होते तेव्हा आपल्याला त्यांना भेटता येत होते आणि आपल्याला भेडसावणार्‍या प्रश्‍नांवर चर्चा करता येत होती. मतभेद विसरून या घटकेला आपण सर्वांनी एकमेकांच्या सहकार्याने काम करुया. गेल्या तीस वर्षांपासून आम्ही एकमेकांच्या सोबत आहोत आणि प्रत्येक वादाचा एकत्र सामना केला आहे. या कालखंडात तुमच्याबद्दलचे प्रेम आणि जिव्हाळा वाढला आहे, हे मी प्रामाणिकपणे कबूल करीत आहे. आपले मतभेद अनेक प्रश्‍नांवर झाले आहेत, पण आपण एक – दुसर्‍याचा आदर राखत ते सहन करीत आहोत. देशहितासाठी अखेरपर्यंत आपण तेच कार्य पुढे नेऊया.’ आता सांगा. नेहरु-पटेल वादाची टिमकी वाजवून काय फायदा?