अबोली

0
231

प्राजक्ता प्र. गावकर
(नगरगाव- वाळपई)

तसं पाहिलं तर ती आमच्या ना नात्याची, ना गोत्याची. पण आमच्या घरासमोरील नवीनच बांधलेल्या फ्लॅटमध्ये ती आणि तिचा पती रहात होते. एकूण पाच – सहा भाडेकरु तिथे रहात होते.
ती राहात असलेल्या फ्लॅटच्या आणि आमच्या घरामध्ये फक्त अंगण होते. त्यामुळे तिचे येणे-जाणे जास्तीत जास्त आमच्याकडेच असे. काही ना काही कारणाने ती वहिनी, वहिनी करत माझ्याकडे यायची.
स्वभावाने सालस. कधी उलटून बोलायची नाही. तिच्या घरी नवरा आणि ती दोघंच. लग्नाला नुकतंच वर्ष झालं होतं. राजा – राणीचा संसार मजेत चालला होता.

माझे मिस्टर कामाला गेले आणि मुले शाळेला गेली की ती आपले घरकाम पट्‌कन उरकून माझ्याकडे येत असे. तिचा नवरा आकाश सकाळी नऊ वाजता कामावर जायचा तो रात्री नऊ वाजता घरी यायचा. अबोली घरी एकटीच राहून कंटाळायची. हो! तिचं नाव अबोली. नाव मात्र शोभायच हें तिला. तिच्या शेजारी पाच-सहा भाडेकरू होते. त्यांची बायकामुले होती, पण हिचा जीव काही त्यांच्यात रमायचा नाही. नवरा कामावर गेला की ही झटपट सारं आवरून आमच्या घरी हजर होई आणि येताना आपण केलेली भाजी आमटी डब्यातून माझ्यासाठी आणायची. म्हणायची, ‘‘वहिनी, काल आकाशने मटार आणले होते. त्याची आमटी केलीय. पाहा कशी झालीय ती? ‘‘वहिनी आमच्या सातार्‍याला वांग्या-बटाट्याची भाजी अशी करतात पाहा.. एक ना दोन.
माझ्या बरोबर तिची खूपच गट्टी जमायची. ती दिवसभर घरी एकटीच बसणार म्हणून मग मी पण तिला आग्रहाने जेवायला आमच्याकडेच ठेवून घ्यायची. ती म्हणायची, ‘‘वहिनी, अहो सकाळचा स्वयंपाक घरी तसाच आहे. संध्याकाळी आकाशला ताजा स्वयंपाक हवा असतो’’ खूप आढेवेढे घ्यायची ती, पण मी तिला थांबवून घ्यायचेच.
दिवस जात होते. ती आता आमच्या घरातीलच एक झाली होती. माझी मुले आकाशला काका आणि अबोलीला काकू अशी हाक मारू लागली. आकाशचेही आमच्या घरी येणे जाणे वाढले. परकेपणा नाहिसा झाला. ‘यांना’ पण आयताच दोस्त मिळाला. काही दुखलं – खुपलं तर अबोली माझ्याकडे यायची. नवरा बायकोत काही भांडणतंटा झाला की आम्ही उभयता तो सोडवत असू.

बाकी काही म्हणा, अबोली दिसायला सुंदर होती. देवाने दोन्ही हातांनी लक्षपूर्वक तिला घडवले होते. कंटाळा हा शब्द तिच्या जागी नव्हताच. ती गाणी सुरेख म्हणायची. तिचा आवाज गोड होता. चित्रं काढायला तिला आवडायचे. ती सुंदर सुंदर रांगोळ्या घालायची. विणकाम, भरतकाम, शिवण – टिपण या सर्वांची तिला आवड होती. सर्व तर्‍हेचा स्वयंपाक करण्यात ती पटाईत होती. मला तिच्या लांब काळ्याभोर केसांचे फार अप्रुप वाटे. डाव्या बाजूने बोटभर भांग काढून ती आपल्या लांबसडक केसांची वेणी घालून त्यावर एखादा गजरा माळी, तेव्हा मी अगदी देहभान हरपून तिच्याकडे पाहात राही.

सहजच माझा हात माझ्या डोक्यावरून फिरे. मनात वाटे, देवाने मला सारे काही दिले, पण लांबसडक केसच का नाही दिले? कधी कधी ती आपल्या लांब केसांचा भला मोठा आंबाडा घालून येई. तेव्हा मी आपणहून आमच्या बागेतले एखादे लाल टपोरे गुलाबाचे फूल आणून तिच्या कानशिलाजवळ खेचत असे. आणि कुणाची नजर लागू नये म्हणून तिच्या कानामागे काजळाचा टिळाही लावायला विसरत नसे.
एक दिवस काय झाले नवरा बायकोमध्ये माहीत नाही. अबोली सकाळी नेहमीप्रमाणे आमच्या घरी आली तेव्हा मी तिला पाहातच राहिले. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. फुलासारखा तिचा चेहरा कोमेजला होता. मी तिला जवळ घेऊन विचारपूस केली, तर तिला हुंदका आवरता आवरेना.
खूपदा विचारल्यावर तिने सांगितले, ‘‘काल संध्याकाळी आकाश कामावरून घरी आल्यावर तिने दोन दिवस रजा घेऊन कुठेतरी फिरायला जाऊया असे त्याला सांगितले. पण तो म्हणाला, ‘‘आता नको. ऑफिसमध्ये खूप काम आहे. पुढच्या शनिवारी, रविवारी सांगते.’’ पण हिला फिरून यावेसे वाटत होते. आकाशला वेळच मिळत नव्हता. त्यामुळे तिला कुठे फिरायला न्यायला मिळत नव्हते. तो तरी काय करणार? सकाळी नऊ ते रात्री नऊ असा त्याच्या ऑफिसचा वेळ असल्यामुळे कुठे जाताच येत नव्हते. त्यामुळे ती कंटाळली होती. हळव्या मनाच्या अबोलीने मनाला खूपच लावून घेतले आणि वर आकाशने आपल्याला जवळ घेतले नाही की आपली समजूत काढली नाही याचे तिला अतिशय वाईट वाटले.

सारा प्रकार ऐकून मीच कात्रीत सापडले. हिच्या बाजूने विचार केला तर हिची कींव वाटत होती. आणि आकाशच्या बाजूने विचार केला तर त्याचे काही चुकले नाही हेही पटत होते. शेवटी अबोलीचीच समजूत घालायची हे ठरवून मी उठले.

सर्वप्रथम मी काय केले, तर तिच्या आवडीचा केशर घातलेला शिरा करून तिला खायला लावला. शिरा खाताच तिला बरे वाटले. नंतर मी चार समजुतीच्या गोष्टी तिला सांगितल्या, ‘‘शांतपणे विचार कर अबोली, आकाशला सुट्टी मिळत नसणार. त्याने तुला सांगितले आहे ना? पुढच्या शनिवारी किंवा रविवारी सांगतो म्हणून. मग तू उगाच त्याच्यावर राग धरून बसू नकोस. आकाशला परत परत तेच तेच विचारू नकोस. तो काय सांगतो याची प्रतीक्षा कर.’’ असे मी बजावून सांगितले. दिवसभर मी तिला माझ्याकडेच थांबवून घेतले. संध्याकाळी ती घरी गेली.
दुसर्‍या दिवशी सकाळी ती परत आली ती हसत हसत. आल्याबरोबर मला मिठी मारून म्हणाली, ‘‘वहिनी, आकाशने मला रात्री आपणहून सांगितले की येत्या रविवारी आम्ही सर्वजण म्हणजे, दादा, तुम्ही आणि मुले आणि आम्ही दोघं असे मिळून जवळच्या टेकडीवरच्या धबधब्यावर जायचं. पुरा दिवस तिथे घालवून संध्याकाळी घरी यायचं. धमाल करायची, नाच, गाणी, अंताक्षरी, गप्पागोष्टी, तेव्हा जायची तयारी करा. मी पण खूश झाले. खायला काय न्यायचे म्हणताच ती म्हणाली, ‘‘वहिनी तुम्ही फक्त पोळ्या करा. पुलाव, छोले, गुलाबजामुन वगैरे मी करते. सारी तयारी झोकात झाली. शनिवारी कपडे भरून झाले. थोडा फराळही करून झाला. रात्री घरी जाताना ती म्हणाली, ‘‘वहिनी, सात वाजता निघूया ना? म्हणजे उन्ह लागायच्या आत टेकडी चढून जाता येईल.’’ मी हो म्हणाले. पण मनात आलं, सात वाजता जायचे म्हटले तरी नऊ केव्हा वाजतात याचा पत्ताच लागत नाही.

त्यानंतर आम्ही झोपलो आणि पहाटे चार साडेचार वाजण्याच्या सुमारास एक कर्णभेदक किंकाळी ऐकून आम्ही सारेजण खडबडून उठलो. काय झाले म्हणून धावत पळत घराबाहेर येऊन पहातो तर? अबोलीच्या फ्लॅटमध्ये लोकांची रीघ लागली होती.
मी, माझे पती, मुले सारेच तिकडे पळालो. ऍब्युलन्स आली आणि मला भोवळ येऊ लागली. पडता पडता मी पाहिले. पूर्ण जळालेल्या अबोलीला स्ट्रेचरवर ठेवताना तिचा तो काळाभोर केशसंभार जमिनीवर लोळत होता. माझ्या तोंडून शब्दच