पोलिसांबरोबरच्या चकमकीत 20 युवकांचा मृत्यू; 400 हून अधिक जखमी; गृहमंत्र्यांचा राजीनामा
नेपाळच्या काठमांडूमध्ये सोमवारी युवा (जेन झी) आंदोलकांनी सोशल मीडियावरील बंदी आणि देशात वाढलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठे आंदोलन उभे केले. यावेळी या आंदोलकांनी नेपाळच्या संसदेवर धडक देत संसदेच्या प्रवेशद्वाराची तोडफोड तर केलीच शिवाय ते प्रवेशद्वार पेटवले. याचबरोबर काही आंदोलक संसदेतही घुसले. यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात आतापर्यंत 20 युवा आंदोलकांचा मृत्यू झाला आहे, तर 400 हून अधिक जण जखमी झाले आहेत. सोशल मीडिया बंदीविरोधात काल जवळपास 12 हजार नेपाळी युवक रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, या मृत्यूंची जबाबदारी स्वीकारत नेपाळच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.
काही दिवसांपूर्वी नेपाळ सरकारने 26 सोशल मीडिया साईट्सवर बंदीचा निर्णय घेतला होता. नेपाळने सोमवारपासून जवळपास सर्वच लोकप्रिय सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली. त्यामध्ये फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, सिग्नल, वी चॅट अशा प्रचलित सोशल मीडिया साईट्सचाही समावेश आहे. सरकारच्या या निर्णयामुळे युवक, प्रामुख्याने ‘जेन झी’ (2000 सालानंतर जन्माला आलेले आणि सध्या विशीत असणारे युवक) रस्त्यावर उतरून सरकारच्या या निर्णयाविरोधात व प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात निदर्शने करू लागले आहेत. संतप्त जमावाने नेपाळच्या संसदेवरही मोर्चा काढला. सोमवारी सकाळी 12 हजारांहून अधिक निदर्शक संसद भवन संकुलात घुसले. यावेळी पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला. काही ठिकाणी पोलिसांनी गोळीबार केला असून, त्यात 20 तरुणांना आपले प्राण गमवावे लागले. निदर्शकांची पोलिसांशी चकमक झाल्याने आंदोलन हिंसक झाले आणि त्यामुळे काठमांडू जिल्हा प्रशासनाने न्यू बानश्वर आणि आसपास जमावबंदी लागू केली. दरम्यान, संसद भवन, राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान निवासस्थानाभोवती जमावबंदी लागू केली आहे.
नेपाळच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा
नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी सोशल मीडिया बंदी आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या हिंसक निदर्शनांमध्ये झालेल्या मृत्यूंची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना राजीनामा सादर केला आणि सुरक्षा दलांनी निदर्शकांवर केलेल्या बळाच्या वापरामुळे झालेल्या मृत्यूंबद्दल त्यांना खूप दुःख झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.