Home Featured जीएसटी सुधारणांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवा : मुख्यमंत्री

जीएसटी सुधारणांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवा : मुख्यमंत्री

0

नव्याने लागू केलेल्या जीएसटी सुधारणांचे फायदे राज्यातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम राज्यातील उद्योग संघटनांनी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे (जीसीसीआय) जीएसटी सुधारणांवर आयोजित एका कार्यक्रमात बोलताना काल केले.
सामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून जीएसटीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे जीएसटी सुधारणांचे फायदे राज्यातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पर्यटन आणि निर्यात उद्योग या सुधारणांचा सर्वांत मोठा लाभ मिळणार आहे. काही आवश्यक वस्तूंवरील कर शून्यावर आणण्यात आल्याने सामान्य लोकांचे जीवनमान सुलभ होण्यास मदत होईल. जीएसटी 2.0 मुळे त्यांना कोणते फायदे मिळू शकतात हे सर्वांना माहीत असले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सुरुवातीच्या टप्प्यात सुधारणांमुळे राज्यांच्या महसूल संकलनावर परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. जीएसटी सुधारणांमुळे राज्यांना महसूल तोटा होईल याची आम्हांला जाणीव होती; परंतु देशातील सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. निर्यात शुल्कात 90 टक्के सूट, नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे आणि वाद मिटविण्यासाठी न्यायाधिकरणाची स्थापना यासारख्या उपाययोजना आठ वर्षांपूर्वी सादर केलेल्या एक राष्ट्र-एक कर संकल्पनेला लोकप्रिय करण्यात खूप मदत करतील, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. यावेळी जीसीसीआयच्या अध्यक्ष प्रतिमा धोंड व इतरांची उपस्थिती होती.