Home Featured ‘नीट’ची फेरपरीक्षा 21 जूनला होणार

‘नीट’ची फेरपरीक्षा 21 जूनला होणार

0

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट यूजी परीक्षेची नवीन तारीख काल जाहीर केली. 21 जून 2026 रोजी नीट परीक्षा देशभरात घेतली जाणार आहे. यापूर्वी घेण्यात आलेली नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे रद्द करण्यात आली होती.
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. यावर्षी तब्बल 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती; पण 3 मे रोजी झालेली परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आली. नीट प्रश्नपत्रिकेतील प्रश्न गेस पेपर आणि इतर माध्यमांतून विद्यार्थ्यांना विकले गेल्याचे समोर आले. याबद्दलच्या तक्रारी वाढल्यानंतर याचा तपास करण्यात आला, त्यात पेपर फुटल्याचे तपासातून निष्पन्न झाले.

21 जून 2026 रोजी नीट परीक्षेची प्रवेशपत्रे 14 जूनपर्यंत उपलब्ध करून दिली जातील. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीची परीक्षा केंद्रे आणि शहर निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले जाईल. विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी यावेळी अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ दिला जाईल. ही परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5.15 या वेळेत पार पडेल. शिवाय, विद्यार्थ्यांवरील आर्थिक ओझे कमी करण्यासाठी एनटीएने परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढील वर्षीपासून सीबीटी
पद्धतीने होणार नीट परीक्षा

नीट परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणकावर आधारित म्हणजेच ‘सीबीटी) पद्धतीने घेतली जाईल, अशी घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल पत्रकार परिषदेत केली. पेपरफुटीच्या प्रकरणानंतर परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

पेपरफुटी प्रकरणी सूत्रधाराला अटक

नीट-यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) काल मोठी कारवाई केली. पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून रसायनशास्त्राच्या सेवानिवृत्त प्राध्यापकाला अटक करण्यात आली. पी. व्ही कुलकर्णी असे या सेवानिवृत्त प्राध्यापकाचे नाव असून, तो नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने परीक्षा प्रक्रियेत सहभागी होता आणि त्याच्याकडे प्रश्नपत्रिकाही उपलब्ध होत्या, अशी माहिती समोर आली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तोच सूत्रधार असल्याचे सीबीआयच्या तपासात आढळून आले आहे. कुलकर्णी याने एप्रिल 2026 च्या शेवटच्या आठवड्यात पुण्यातील निवासस्थानी विशेष कोचिंग सत्रे आयोजित केली होती. या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना फुटलेल्या पेपरवरुनच शिकवणी देण्यात आली होती.