Home Featured धार भोजशाला हे देवी वागदेवी सरस्वतीचे मंदिर

धार भोजशाला हे देवी वागदेवी सरस्वतीचे मंदिर

0

मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचा निकाल; हिंदूंना पूजेचा अधिकार

गेल्या काही महिन्यांपासून मध्य प्रदेशमधील वादग्रस्त धार भोजशाला-कमाल मौला मशीद परिसर चर्चेचा विषय ठरला होता. या ठिकाणी आधी मंदिर होते, असा दावा करण्यात आला. या संदर्भात मध्य प्रदेश उच्च न्यायालयात सविस्तर खटलादेखील चालला. अखेर काल त्यासंदर्भात न्यायालयाने मोठा निकाल दिला. धार भोजशाला हे देवी वागदेवी सरस्वतीचे मंदिर असल्याच्या दाव्यावर काल उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आणि हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार दिला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवादन पूर्ण झाल्यानंतर 12 मे रोजी उच्च न्यायालयाने या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर आपल्या निकालपत्रात न्यायालयाने या ठिकाणाबाबत सविस्तर टिप्पणी केली आहे. ऐतिहासिक दस्तावेज आणि स्थापत्यशास्त्राचे संदर्भ पाहाता हे सिद्ध झाले आहे की वादग्रस्त परिसर हा परमार वंशाचे राजे भोज यांच्याशी संबंधित असून संस्कृत प्रशिक्षणाचे एक केंद्र होते. त्या काळातील लेखी व स्थापत्यशैलीचे संदर्भ हे स्पष्ट करतात की त्या काळी धारमधील या ठिकाणी देवी सरस्वतीचे मंदिर होते, असे न्यायालयाने नमूद केले.

हिंदू समुदायाला धार भोजशाला येथे पूजेची परवानगी
यावेळी न्यायालयाने हिंदू फ्रंट फॉर जस्टिसतर्फे दाखल करण्यात आलेली याचिका मान्य करत 7 एप्रिल 2003 रोजी पुरातत्व खात्याच्या संचालकांनी दिलेले आदेश रद्द केले. या आदेशांनुसार, वादग्रस्त ठिकाणी हिंदू समुदायाला पूजेची परवानगी नाकारण्यात आली होती. तसेच, मुस्लीम समुदायाला तिथे नमाज पठणाची परवानगी देण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाने हे आदेशच रद्द ठरवत भोजशाला परिसरात हिंदू समुदायाला पूजेची परवानगी देण्यात आली.

वास्तूवरील नियंत्रण पुरातत्व खात्याकडेच
हिंदू समुदायाला या ठिकाणी पूजेची परवानगी देण्यात आली असली, तरी धार भोजशाला वास्तूचे नियंत्रण न्यायालयाने पुरातत्त्व खात्याकडेच ठेवले आहे. भोजशाला आणि तेथील संस्कृत प्रशिक्षण केंद्रासंदर्भातील व्यवस्थापन करण्याबाबत न्यायालयाने यावेळी केंद्र सरकार व केंद्रीय पुरातत्व विभागाला आदेश दिले. या वास्तूचे जतन, संवर्धन व व्यवस्थापनाची पूर्णपणे जबाबदारी पुरातत्व खात्याकडे असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.