Home Featured पेट्रोल, डिझेल 3 रुपयांनी महागले

पेट्रोल, डिझेल 3 रुपयांनी महागले

0

सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या किमतीत प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. शुक्रवारपासून हे दर लागू झाले. पाच राज्यांतील विधानसभांच्या निवडणुका संपल्यानंतर काही दिवस कळ सोसून अखेर मोदी सरकारने अखेर इंधनाच्या दरात वाढ केलीच. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने कंपन्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत होता. या इंधन दरवाढीनंतर गोव्यात पेट्रोल 99.71 रुपये, तर डिझेल 91.37 रुपयांवर पोहोचले आहे.

पश्चिम आशियातील युद्ध आणि त्यानंतर बंद झालेली होर्मुझ सामुद्रधुनी यामुळे जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या, इंधनाच्या किंमती वाढल्या. सरकार व ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी या दरवाढीपासून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढ केली नव्हती. मागील चार वर्षांत एप्रिल 2022 पासून पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढ झाली नव्हती. चार वर्षांत फक्त एकदा 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल व डिझेलच्या किमतीत घट करण्यात आली होती.

आणखी दरवाढीची शक्यता
पेट्रोलियम क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दरवाढीमुळे ऑइल मार्केटिंग कंपन्यांना फारच थोडा दिलासा मिळणार आहे. पेट्रोल व डिझेलची किरकोळ विक्रीची किंमत (रिटेल किंमत) आणि कंपन्यांना ज्या किमतीत पेट्रोल, डिझेल मिळते ती किंमत, यात खूप मोठी तफावत आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी भाववाढ होऊ शकते. या आठवड्याच्या सुरुवातीला ऑइल मार्केटिंग कंपन्यांचे प्रति लिटर पेट्रोलमागे 14 रुपयांचे, तर प्रति लिटर डिझेलमागे 42 रुपयांचे नुकसान होत होते. घरगुती स्वयंपाकासाठी लागणारा गॅस आणि देशांतर्गत विमानांना लागणारे जेट फ्युएल यांच्या विक्रीतूनही ओएमसी कंपन्यांचे नुकसान होत आहे. सध्या करण्यात आलेल्या भाववाढीमुळे ऑइल मार्केटिंग कंपन्यांना फारच थोडा दिलासा मिळणार आहे.

टप्प्याटप्प्याने होणार भाववाढ?
पेट्रोल व डिझेलची भाववाढ एकदाच न करता टप्प्याटप्प्याने करण्याचा मार्ग मोदी सरकारने स्वीकारला आहे. त्यामुळे राजकीय रोष ओढवून घेणे टाळता येईल, अशी सरकारची धारणा आहे.