निमशिक्षकांनी आंदोलन मागे घ्यावे

0
87

>>मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा सल्ला

आपणाला सेवेत कायम करावे या मागणीसाठी गेल्या सुमारे महिनाभरापासून आंदोलन करणार्‍या निम-शिक्षकांनी काल पर्वरी येथे सचिवालयाजवळ धरणे धरले. नंतर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागणीसंबंधी विचार चालू असून आंदोलन मागे घेण्याचा त्यांना सल्ला दिला.
रोज धरणे धरण्यापेक्षा अधूनमधून तुमच्या शिष्टमंडळाला सरकारपाशी चर्चेसाठी पाठवा, अशी सूचना पार्सेकर यांनी या शिक्षकांना केली.
दरम्यान, यासंबंधी या शिक्षकांचे नेते अजितसिंह राणे यांना विचारले असता आंदोलन मागे घ्यावे की नाही याचा निर्णय गुरुवारी होणार असलेल्या या शिक्षकांच्या बैठकीत होणार असल्याचे ते म्हणाले.
काल सकाळी १० ते १ या दरम्यान निम-शिक्षकांनी पर्वरी येथील सचिवालयाच्या फाटकाजवळ धरणे धरले. यावेळी ११ वाजता मुख्यमंत्र्याची भेट घेण्यासाठी या शिक्षकांनी सचिवालयात घुसण्याचा प्रयत्न केला. पण तेथे असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवले. नंतर शिक्षकांनी पोलिसांमार्फत मुख्यमंत्र्यांना संदेश पाठवून भेटायचे आहे असे कळवले. मुख्यमंत्र्यानी या शिक्षकांना नंतर दु. १ वाजता भेटायला बोलावले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना आंदोलन मागे घेण्याची सूचना करताना मागणी मान्य करण्यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे त्यांना सांगितले.
दरम्यान, आंदोलन मागे घ्यावे की नाही याचा निर्णय निम शिक्षकांच्या गुरुवारी होणार असलेल्या बैठकीत होणार आहे.