>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती; आरोग्य आणि सरकारी यंत्रणेच्या कोरोनाविषयक तयारीचा घेतला आढावा
चीन, अमेरिकेसह अन्य काही देशांत कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारही सतर्क झाले आहे. राज्यात कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यास त्याविरोधात लढण्यासाठी आरोग्य आणि सरकारी यंत्रणेच्या तयारीबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल एका बैठकीत आढावा घेतला. गोवा राज्य कोरोनाविरोधातील लढाईसाठी सर्व आवश्यक साधनसुविधांनी सज्ज आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही; पण सतर्कता बाळगली पाहिजे. केंद्र सरकारचेही तसे निर्देश आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात आता नाताळ आणि नववर्ष स्वागताची धामधूम असणार आहे. त्यामुळे २ जानेवारीपर्यंत कोणत्याही गोष्टींवर कोरोनाविषयक निर्बंध असणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काल कोरोना महामारी आणि त्याविरोधातील तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक विशेष बैठक घेतली. या बैठकीला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आरोग्य सचिव, अन्य खात्यांचे अधिकारी, जिल्हाधिकारी व पोलीस महासंचालक उपस्थित होते.
ही बैठक होण्याआधी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्यासोबत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व अन्य अधिकार्यांची आभासी पद्धतीने बैठक झाली. त्यात मांडवीय यांनी राज्यातील कोरोना तयारीबाबत आढावा घेतला, तसेच सरकारी यंत्रणा सतर्क असली पाहिजे, याबाबत सूचना दिल्या, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
भविष्यात केंद्र सरकारकडून कोरोनाबाबत ज्या ज्या मार्गदर्शक सूचना मिळतील, त्यांचे पालन राज्यात केले जाईल. सद्य:स्थितीत दाबोळी विमानतळावर जे विदेशी प्रवासी उतरत आहेत, त्यापैकी २ टक्के प्रवाशांची यादृच्छिक पद्धतीने कोरोना चाचणी केली जात आहे. तसेच त्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंगही केले जात आहे. गोव्यात जिनोम सिक्वेन्सिंगची सुविधा उपलब्ध असून, सध्या गोमेकॉ आणि आझिलो इस्पितळात जिनोम सिक्वेन्सिंग होत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग या नियमांचे पालन करावे; मात्र सध्या तरी त्याची सक्ती नाही. सर्दी, खोकला, ताप असणार्यांनी खबरदारी घ्यावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सध्या कोरोना परिस्थिती आटोक्यात आहे; परंतु कदाचित येत्या काळात कोरोना धोका वाढला, तरीही राज्य सरकार सज्ज आहे. सध्या राज्यात सणांची रेलचेल आहे. सद्य:स्थिती पाहता कोरोनाविषयक निर्बंधांची गरजही भासणार नाही. २ किंवा ३ जानेवारीनंतर कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
२७ डिसेंबरला गोव्यातील तीन इस्पितळांत ‘मॉक ड्रिल’
२७ डिसेंबरला संपूर्ण देशात कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी एक ‘मॉक ड्रिल’ होणार आहे. गोव्यातही हे मॉक ड्रिल होणार आहे. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ, उत्तर गोवा जिल्हा इस्पितळ आणि हॉस्पिसिओ इस्पितळात सर्व सुविधा अद्ययावत आहेत की नाही हे तपासण्यासाठी मॉक ड्रिल होईल. या मॉक ड्रिलमधून आरोग्य यंत्रणेच्या तयारीची चाचपणी होईल. ऑक्सिजनपासून पीपीई कीटपर्यंत सर्व साधनसुविधांच्या उपलब्धतेची चाचपणी देखील या मॉक ड्रिलमध्ये होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.