जोडे

0
37
  • – प्रा. रमेश सप्रे

तपश्‍चर्येमुळे सामान्य भक्ताच्या खडावांना पादुकांचं माहात्म्य प्राप्त होतं. असंख्य जण त्या पादुकांसमोर नतमस्तक होतात नि त्यांच्या स्पर्शानं प्रेरित होऊन भक्ती-कर्म-ज्ञान-ध्यान यांपैकी कोणत्याही मार्गाची उपासना करण्याचा संकल्प करतात. येत्या नववर्षासाठी आपण करू या का असा संकल्प?

प्रत्येकजण त्या छोट्याशा दुकानावर लावलेला तो भलामोठा फलक वाचून अचंबित होत असे. पण तो मोठ्या आवाजात वाचताना सर्वांना मजा येत असे. काय होतं असं त्या फलकावर? ‘गतप्राण पादत्राणात प्राण व त्राण आणणारे एकमेव पादत्राण सुधारणा केंद्र’ -म्हणजे फाटक्यातुटक्या चपला, जोडे दुरुस्त करण्याचं दुकान. आत म्हातारे गृहस्थ बसले होते. त्यांना एकदा त्या मोठ्या फलकाचं रहस्य विचारल्यावर त्यांनी सांगितलं ते विचार करण्यासारखं आहे. ‘रस्ता रुंदीकरणात आमचं पूर्वीचं मोठं दुकान हे इतकं छोटं झालं की कुणाच्या लक्षातही येईना, म्हणून हा फलक तयार करून लावला. तेव्हापासून प्रत्येकजण तो वाचण्याच्या निमित्तानं थांबू लागला. त्यामुळे गिर्‍हाईक विशेष वाढलं नाही, पण एका शुभचिंतकाच्या सूचनेतून माझ्या मुलानं प्रेरणा घेऊन दुसरीकडं पादत्राण विक्रीचं दुकान थाटलं जे आज छान चाललंय. त्याचं काय असतं, दारिद्य्रात असतानाही स्वप्नं संपन्नतेचीच पाहून ती जिद्दीनं साकारली पाहिजेत. खरं ना?’ हे ऐकल्यावर त्या आजोबांना नमस्कार करताना विचारलं, ‘आपले विचार, आपली भाषा एवढी चांगली कशी?’ आजोबा उद्गारले, ‘रेडिमेड जोड्यांच्या जमान्यात गिर्‍हाईक कमी कमी होत गेलं. रिकामा वेळ जास्त जास्त मिळत गेला. तो सगळा वाचनात नि चिंतनात घालवायची सवय लावली. वाचनानं जीवन समजायला खूप मदत होते. वाचन हवंच.’ हे ऐकून बरोबरच्या मित्राला उगीचच कुणीतरी जोडा मारल्यासारखं वाटलं. कारण तो ‘वाचनबंदी’ पंथाचा पुरस्कर्ता होता. असो.

  • पायांत घालण्याच्या जोड्यांसाठी अनेक पर्यायवाचक शब्द आहेत- पादत्राण, पायताण, चपला, खेटर, पैजार (हल्ली शूज, बूट हे शब्दही मराठीत अधिक प्रचलित आहेत).
  • मानवाच्या इतिहासातील पहिल्या पादत्राणाची कथा माहितेय?
    त्याचं असं झालं, आपले क्रोधी स्वभावाचे पती जमदग्नी यांच्या पूजार्चनासाठी रेणुका फुलं, दुर्वा, बेल अशी पूजासामग्री गोळा करण्यासाठी आली असताना सूर्याच्या उन्हाच्या झळा एवढ्या वाढल्या की तिला काहीवेळ भोवळ (चक्कर) आली व ती खाली बसली. त्यात वेळ गेल्यामुळे पतीला फुलं-दलं (तुलसीदलं, दुर्वादलं, बिल्वदलं) द्यायला उशीर झाला. त्यामुळे जमदग्नी क्रोधाविष्ट झाले. कारण समजल्यावर ते तसेच बाहेर आले की त्यांनी सूर्यावर संयम करायला म्हणजे सूर्याकडे रागानं रोखून पाहायला सुरुवात केली. सूर्य निस्तेज, निष्प्रभ होऊ लागला. त्यामुळे ऋषिमुनी, पाखरं-जनावरं, शेतकरी इ. सारेजण गोंधळून गेले. ग्रहण नसताना सूर्य कसा काळवंडला. कारण लक्षात आल्यावर देवगुरू बृहस्पतींनी इंद्राला भिक्षुकाच्या वेशात जमदग्नीकडे पाठवून एक छत्र (छत्री) नि पादत्राणे भेट म्हणून द्यायला सांगितले. जमदग्नींनी ते पाहून सूर्यावरची दृष्टी हटवली. कारण त्यांच्या पत्नीचा- रेणुकेचा- प्रखर उन्हात डोकं तापण्याचा नि पाय भाजण्याचा प्रश्‍न सुटला होता. या निमित्तानं सार्‍या मानवजातीला पादरक्षा म्हणजे पायांचं रक्षण करण्यासाठी पादत्राणं मात्र मिळाली. एक मनोरंजक प्रसंग म्हणून या घटनेकडे पाहायला काय हरकत आहे?
  • यातूनच आणखी एका प्रसंगाची आठवण येते. गुरुचरणांची अखंड सेवा करणारा एक शिष्य, खरं तर भक्त होता. सदैव गुरूंच्या पादसेवत, भक्तीत तो मग्न असे. यात अर्थातच भक्तीचे इतर पैलूही येत. जसे पूजन-वंदन-दर्शन-स्पर्शन इ. त्यामुळे तो गुरूचा प्रथम पसंतीचा शिष्य बनला. इतर शिष्यांनी त्याला एकदा धडा शिकवायचं ठरवलं. सारे एका कक्षात (खोलीत) जमले. दार असं बंद केलं की ते उघडताना वर ठेवलेले जोडे दार उघडणार्‍याच्या डोक्यावर पडतील. नंतर या पादसेवत- गुरुचरणांची भक्ती करणार्‍याला बोलावणं पाठवलं. अपेक्षेप्रमाणे त्या गुरुचरणी लीन झालेल्या नम्र भक्ताच्या डोक्यावर ते जोडे पडले. यावर सारे हसले पण त्या भक्तानं ते जोडे उचलले नि कपाळाला लावून डोक्यावर ठेवले (जशा भरतानं श्रीरामाच्या पादुका ठेवल्या होत्या) आणि एक संस्कृत स्लोक उत्स्फूर्तपणे म्हणाला- त्याचा अर्थ असा- ‘धन्य धन्य हे सद्गुरो, तुझी कृपा अनाकलनीय आहे. एरव्ही मी आपलं मस्तक तुमच्या पायांवर, पादुकांवर टेकतो; आज तुम्हीच आपल्या पादुका माझ्या मस्तकावर ठेवल्या. मी धन्य-कृतार्थ झालो.’ बाकी गुरुबंधूंचे चेहरे पाहण्यासारखे झाले हे सांगायला नकोच.
  • ‘पादत्राणं इथं ठेवावीत’ अशा आशयाचा फलक प्रत्येक मंदिरात वा पवित्रस्थानी असतो. त्याचा प्रतीकात्मक अर्थ लक्षात घ्यायला हवा- ‘अहंकार नि वासना’ या आद्य जोडप्याचं प्रतीक असलेली पादत्राणं बाहेर काढून शरणभावनेनं देवासमोर जायला हवं.
  • अनेक साधुसंतांच्या समाधिस्थानी जे उत्सव होतात त्यावेळी अनेक व्यवस्थांचा विचार करावा लागतो. यातली एक व्यवस्था म्हणजे ज्याची चिंता भक्तांच्या मनात निर्माण होते आणि देवदर्शनाच्या वा संतदर्शनाच्या आड येते, त्या पादत्राणांच्या रक्षणाची व्यवस्था! आजकाल अनेक स्थळी जत्रा किंवा उत्सवाच्या काळात येणार्‍या असंख्य भक्तांची पादत्राणं सांभाळण्याची निःशुल्क सेवा उपलब्ध असते. काही ठिकाणी पिशवीत पादत्राणं ठेवल्यावर ती कपाळाला लावून नमस्कार केला जातो. कारण दूरदूरच्या ठिकाणांहून येणार्‍या भक्तांची पादत्राणं पवित्रच असतात. १९९५ सालची गोष्ट. काही स्वयंसेवक वृत्तीच्या भक्तांनी आपल्याला ही सेवा करता येईल का असं विचारल्यावर उत्तर मिळालं- ‘का नाही? जरूर ही सेवा करायला मिळेल. पण त्यासाठी शंभर वर्षं थांबावं लागेल. कारण पुढच्या शतकापर्यंतच्या सेवेसाठी सेवकांनी आधीच ‘बुकिंग’ केलेय.’
  • शेवटी एक विचार मनात येतो- तपश्‍चर्येमुळे सामान्य भक्ताच्या खडावांना पादुकांचं माहात्म्य प्राप्त होतं. असंख्य जण त्या पादुकांसमोर नतमस्तक होतात नि त्यांच्या स्पर्शानं प्रेरित होऊन भक्ती-कर्म-ज्ञान-ध्यान यांपैकी कोणत्याही मार्गाची उपासना करण्याचा संकल्प करतात. लाखातल्या एकाच्या पादत्राणांना असं पादुकांचं पावित्र्य नि महात्म्य प्राप्त होतंही. येत्या नववर्षासाठी आपण करू या का असा संकल्प?