Home Featured नव्या युद्धाची चाहुल

नव्या युद्धाची चाहुल

0

एकीकडे पश्चिम आशियामध्ये युद्ध भडकलेले असताना दुसरीकडे पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये थेट काबूलमध्ये चढवलेल्या हवाई हल्ल्यात चारशेच्या वर नागरिक मारले गेले, तर शेकडो जखमी झाले. आपण केवळ लष्करी ठाण्यांना लक्ष्य केले असे पाकिस्तान जरी म्हणत असला, तरी प्रत्यक्षात ह्या हल्ल्यात इस्पितळातील शेकडो रुग्णांचा बळी गेला आहे. पाकिस्तान मात्र हे मान्य करायला तयार नाही. आपण लष्कराचा दारूगोळा साठवून ठेवलेल्या कोठारावर हल्ला चढवला असे पाकिस्तानतर्फे सांगितले जात आहे. मात्र, ज्या प्रमाणात प्राणहानी झाली आहे, ती पाहिली, तर पाकिस्तानकडून झालेली ही सरळसरळ कत्तलच म्हणावी लागेल. भारत सरकारने ठाम शब्दांत ह्या रानटी हवाई हल्ल्याचा निषेध केला आहे. चीनने मात्र ह्या संधीचा फायदा घेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात समेट घडवून आणण्यासाठी मध्यस्थीचा आव आणलेला दिसतो. पाकिस्तानी नेतृत्वाचा आत्मविश्वास सध्या पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीरच्या काळात गगनाला भिडलेला दिसतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे पाकिस्तानने चालवलेला लाळघोटेपणा अवघ्या जगाने पाहिला. त्याचे फळ म्हणून ट्रम्प यांचे पाकिस्तानप्रेम उतू चालले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाला अपशकून करण्यासाठी आणि त्यात अडथळा आणण्यासाठी ट्रम्प पाकिस्तानचा वापर करू इच्छित आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून चाललेल्या पाठराखणीमुळे पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्ध नवी आघाडी उघडली आहे. पाकिस्तानात दहशतवादी कारवाया करणाऱ्या तेहरीक ई तालिबान पाकिस्तान ह्या दहशतवादी संघटनेविरुद्ध पाकिस्तान सरकारने उघडलेली मोहीम आता थेट पाकिस्तान सरकार आणि अफगाणिस्तानमधील नवी राजवट चालवणाऱ्या अफगाण तालिबान यांच्या संघर्षात रुपांतरित झाली आहे. आजवर केवळ ड्युरांड रेषेवर हल्ले प्रतिहल्ले होत होते, परंतु आता पाकिस्तानने थेट अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ले चढवून कत्तलीचा कळस गाठलेला दिसतो. काबूल, कंदाहारवरील हल्ले हा अमानुषतेचा कळस आहे. आपण केलेला हल्ला हा लष्करी ठिकाणांवरील हल्ला होता असे पाकिस्तान म्हणत असले, तरी ते तसे असते तर एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांचा बळी कसा गेला असता? ही सरळसरळ कत्तल आहे आणि तिचा निषेध झाला पाहिजे. अफगाणिस्तानमध्ये आपल्याला अनुकूल राजवट यावी असा पाकिस्तानचा प्रयत्न होता, परंतु तेथील तालिबान पाकिस्तानला पुरून उरले आहेत. ब्रिटिशांनी आखून दिलेली ड्यूरांड रेषा मानायला ते तयार नाहीत. ही तालिबानी राजवट तेहरिक ई तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचा वहीम पाकिस्तानने घेतला आहे आणि ते निमित्त करून अफगाणिस्तानच्या लष्करी ठाण्यांना आजवर लक्ष्य केले जात होते. मात्र, आता हा पाकिस्तान – अफगाणिस्तान दरम्यानचा संघर्ष – नव्हे प्रत्यक्ष युद्धच सुरू झाले आहे. अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचा पुरस्कार भारत करीत आला आहे. अफगाणिस्तानशी मैत्रिपूर्ण संबंध निर्माण करण्यास भारताचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. मध्य आशियाशी व्यापारउदिमासाठी पाकिस्तानला वगळून अफगाणिस्तानच्या माध्यमातून व्यवहार करण्याची भारताची नीती राहिली आहे. सध्या इराण युद्धग्रस्त स्थितीत आहे, परंतु तेथील छाबहार बंदराद्वारे ही सगळी व्यापारी वाहतूक होत असते. अफगाणिस्तानमध्ये शांतता नांदणे भारताच्या हिताचे आहे. मात्र, सध्याच्या संघर्षात अफगाणिस्तानची पाठराखण करीत असतानाच त्या राजवटीच्या आश्रयाखालील दहशतवादी संघटनांना वाढू देणेही भारताच्या हिताचे नाही. एका अर्थी ही दुधारी तलवार आहे. उद्या आयसिस किंवा अल कायदासारख्या दहशतवादी संघटना अफगाणिस्तानात निर्माण झाल्या, तर त्यांचा धोका पाकिस्तानबरोबरच भारतालाही असेल. तालिबानी राजवटही काही उदारमतवादी राजवट नव्हे. त्यामुळे ह्या विषयात भारत काळजीपूर्वक पावले टाकत आहे. चीनचा पाकिस्तानला किती सक्रिय पाठिंबा आहे हे ऑपरेशन सिंदूरदरम्यान दिसून आले. आता अफगाणिस्तानविरुद्धच्या युद्धातही चीन पाकिस्तानसोबत असेल, कारण त्याचे हितसंबंध पाकिस्तानात गुंतले आहेत. त्यामुळे मध्यस्थीचा आव चीनने आणला आहे. मात्र, चीनची लुडबूड वाढू देणे भारतासाठी तापदायक ठरू शकते. एकीकडे पाकिस्तानच्या आक्रमक पावलांना अटकाव करताना आणि अफगाणिस्तानशी राजनैतिक मैत्रीसंबंध पूर्वीप्रमाणेच कायम राखताना अफगाण तालिबानच्या आश्रयाखाली निर्माण होणाऱ्या दहशतवाद्यांना आपल्यापासून दूर ठेवण्याची ही कसरत भारतासाठी खरोखर कसोटीचा क्षण असेल.