फोंडा मतदारसंघ पोटनिवडणूक : मल्लिकार्जुन खर्गेंकडून नावावर शिक्कामोर्तब; गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची माहिती
गोवा विधानसभेच्या फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी डॉ. केतन भाटीकर हे काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केतन भाटीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असल्याची माहिती काल गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली. मल्लिकार्जुन खर्गे यांनी डॉ. केतन भाटीकर यांच्या उमेदवारीला मान्यता दिली असल्याचे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आपल्याला कळवले असल्याचे काल अमित पाटकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, केतन भाटीकर हे उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.
एकेकाळचे मगो पक्षाचे दिग्गज नेते असलेल्या डॉ. केतन भाटीकर यांनी 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत मगोकडून काँग्रेसचे उमेदवार रवी नाईक यांच्याविरूद्ध निवडणूक लढवली होती. अटीतटीच्या या लढतीत भाटीकर यांचा अवघ्या 77 मतांनी पराभव झाला होता. नंतरच्या काळात रवी नाईक हे भाजपमध्ये दाखल नंतर मंत्री देखील बनले होते.
गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात ह्दयविकाराच्या झटक्याने रवी नाईक यांचे निधन झाल्याने फोंडा मतदारसंघातील जागा रिक्त झाली होती.
पोटनिवडणुकीसाठी भाजप व मगो पक्षात युती झालेली असल्याने आपल्याला मगोची उमेदवारी मिळू शकणार नसल्याने केतन भाटीकर यांनी हल्लीच काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे नाराज बनलेल्या भाटीकर यांनी नवा मार्ग स्वीकारला. यानंतर आता काँग्रेसने फोंड्यातून उमेदवारी देखील जाहीर केली आहे.
काँग्रेसचा विजय
निश्चित : पाटकर
गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी दै. ‘नवप्रभा’शी बोलताना फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा दावा केला.
भाजपकडून कोणाला उमेदवारी?
फोंडा पोटनिवडणुकीसाठी गोवा भाजपकडून दोन उमेदवारांच्या नावांची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे. त्यापैकी कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपतर्फे त्यांचे दिवंगत नेते रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
उमेदवारी अर्जांच्या प्रक्रियेला सुरुवात
फोंडा मतदारसंघात 9 एप्रिल रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीची अधिसूचना सोमवारी जारी झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला देखील सुरुवात झाला आहे. या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 24 मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. 26 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत ठेवण्यात आली आहे. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज तिस्क फोंडा येथील सरकारी इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत.
भाजपचा उमेदवार दोन दिवसांत जाहीर होणार
फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवाराच्या नावाच्या घोषणेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे नवी दिल्ली दौऱ्यावर असून, भाजपकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा उद्या किंवा परवा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आरजीपीची रणनीती लवरकच ठरणार
रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष (आरजीपी) फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत रणनीती लवकरच जाहीर करणार आहे, अशी माहिती आरजीपीचे प्रमुख मनोज परब यांनी पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली. फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसंदर्भात रणनीती निश्चित करण्यासाठी अंतर्गत बैठका सुरू आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच एका अधिकृत पत्रकार परिषदेत जाहीर केला जाणार आहे. अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे आरजीपीचे प्रमुख मनोज परब यांनी सांगितले.
भाजपकडून दोघांच्या नावांची शिफारस
भाजपच्या प्रदेश निवडणूक समितीने फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी दोघांच्या नावाची शिफारस केंद्रीय निवडणूक समितीकडे केली आहे. माजी मंत्री तथा फोंड्याचे माजी आमदार दिवंगत रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक आणि विश्वनाथ दळवी यांच्या नावाची शिफारस केली आहे. केंद्रीय समितीकडून या दोघांपैकी कुणाला उमेदवारी जाहीर केली जाते की अन्य उमेदवाराच्या नावाचा विचार केला जातो, याकडे लक्ष लागले आहे.
आपचा 2 दिवसांत निर्णय : केजरीवाल
फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या विषयावर उद्या किंवा परवापर्यंत निर्णय घेतला जाणार आहे, असे आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी काल सांगितले. फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या विषयावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जात आहे. पोटनिवडणूक स्वबळावर लढवावी की विरोधकांशी आघाडी करावी याबाबत चर्चा सुरू आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले.