वन्यप्राणी व महाभयंकर भुतेखेते

0
10
  • गो. रा. ढवळीकर

आमच्या कुत्र्याचे वाघाबरोबर भांडण चालले होते. वाघाची व त्याची मोठी झटापट चालू होती. वाघ आमच्या कुत्र्यावर पंजे मारीत होता व त्याचा चावा घेण्याचा प्रयत्न करीत होता. पण कुत्राही काही कमी नव्हता. तोही तेवढ्याच ताकदीने प्रतिकार करीत होता.

आमच्या घरात संध्याकाळ होताच लहान-मोठी सर्वजणं देवाकडे बसून ‘शुभंकरोती’ व स्तोत्रे म्हणत. स्तोत्रे म्हणून झाल्यावर सर्वजण ओसरीवर गोळा होत आणि तिथे गाण्यांचा कार्यक्रम होत असे. गप्पांचे विषय बहुधा साप, रानटी जनावरे व भुताखेतांचे असत. एखाद्याच्या घरातून वाघाने गाय पळवलेली असे, तर कुणाला सापाने दंश केलेला असे अथवा कुणाला रात्रीच्या वेळी ‘देवचार’ अथवा भूत दिसलेले असे. झाडावर देवचार असतो आणि रात्र झाली की हातात मोठी चूड घेऊन त्याचा जमिनीवर संचार सुरू होतो, असे सांगितले जायचे. चूड म्हणजे माडाच्या झावळ्यांची म्हणजेच चुडताची पाने एकत्र करून बनवलेला नैसर्गिक टॉर्च. पूर्वी रात्रीच्या वेळी प्रवास करायचा झाल्यास अशा चुडी घ्याव्या लागत. परंतु महाकाय देवचार हातात मोठी पेटलेली चूड घेऊन येताना दिसला तर त्या माणसाची बोबडीच वळे.

आमचा शेजारचा ‘सावळा’ चूड घेऊन रात्रीच्या वेळी नाटकाला चालला होता. काही अंतर गेल्यावर मधल्या निर्मनुष्य जागी पोचल्यावर त्याला चूड पेटवून येणारी महाकाय आकृती दिसली. ती पाहून तो घाबरला आणि माघारी फिरून पळत-पळत त्यानं घर गाठलं. अशा प्रकारच्या घटनांची रसभरीत वर्णने करून वडील मंडळी सांगत आणि आम्ही मुले ती गप्प बसून ऐकत असू. रानटी जनावरांच्या व भुताखेतांच्या गोष्टी चालू असताना बाहेर रातकिड्यांचा आवाज व घुबडाचे घुटुर घुम्म चालू होई अन् त्यांच्या आवाजाने मनात खूप भीती दाटून येत असे. एका बाजूने त्या भय निर्माण करणार्‍या गोष्टी ऐकाव्या असेही वाटे, तर दुसर्‍या बाजूने त्या ऐकताना अंगावर काटा उभा राही.

रात्रीच्या वेळी चूड पेटवून येणारा देवचार एकदम गायब कसा होतो याचे आम्हाला आश्‍चर्य वाटे. एके दिवशी आमच्या गावातून एक इसम नाहीसा झाला. सगळीकडे शोध घेऊनही तो सापडला नाही तेव्हा त्याला देवचाराने पळवून नेले असावे असे लोक बोलू लागले. आठ दिवसांनी तो स्वतःच गावात प्रगट झाला. परंतु आपण आठ दिवस कुठे होतो हे तो सांगू शकत नव्हता. आठ दिवसांनी देवचाराने त्याला सोडल्याचे गावातले जाणते लोक सांगत होते.
त्यावेळी पुस्तकांतून, मासिकांतून विक्रम-वेताळ यांच्या गोष्टी येत असत. अशा गोष्टी वाचण्याचा अथवा ऐकण्याचा असा परिणाम होत असे की रात्रीच नव्हे तर दिवसादेखील एक प्रकारची भीती मनात सतत वावरत असे. मनात असलेल्या भीतीमुळे रात्री स्वप्नेही तशीच भयानक पडत.

काही स्वप्नांची तर मला अजूनही आठवण आहे. एके रात्री मला स्वप्न पडले की एका निर्जन स्थळी वाघ माझा पाठलाग करतोय आणि मी घाबरून पळत सुटलोय. एवढ्यात त्याने मला गाठले आणि माझ्यावर उडी घेतली. मी मोठ्याने किंचाळलो व जागा झालो. एके दिवशी तर मला असे स्वप्न पडले की मी आमच्या घराकडून खाली वाड्यावर निघालो असताना अर्धी वाट चालून गेल्यावर अचानक चार दिशांनी चार वाघ डरकाळ्या फोडत भरदिवसा माझ्यावर चाल करून येतात आणि चौघेहीजण माझ्यावर एकदम हल्ला करतात. मी खूप घाबरलो आणि झोपेतच मोठ्याने ओरडतो. आई जागी होते आणि काय झाले म्हणून मला विचारते. परंतु मी बोलू शकत नाही, कारण भीतीने माझी वाचाच बसलेली असते. मी रडू लागतो तशी ती मला जवळ घेते व धीर देते- ‘घाबरू नकोस. काही झालेले नाही. मी आहे तुझ्याजवळ. काय झाले? कसले स्वप्न पडले ते मला सांग!’ काही वेळाने माझे तोंड उघडले व मी बोलू लागलो. तेवढ्यात घरातली इतर माणसेही गोळा झाली. काही वेळाने माझी भीती कमी होते व मी आईच्या कुशीत पुनः झोपी जातो.

स्वप्नात एकदा एक साप माझ्या मागे लागला. तो माझी पाठ सोडीना. मी पळून जिथे जाई तिथे तो फणा उभारून हजर होई. अखेर त्याला मारण्याकरिता मी एक काठी उचलली. मी त्याच्यावर प्रहार करणार एवढ्यात त्याने माझ्या पायाचा चावा घेतला आणि मी घाबरून जागा झालो.

सापांच्या अनेक जातींशी माझा लहानपणीच परिचय झाला होता. हिरव्या रंगाची ‘हरियाळी’ ही एक जात. फुलझाडांवर अथवा झाडाच्या फांदीवर तो साप असला तर हिरव्या रंगामुळे सहसा दिसत नाही. तो डोकीवर फुंकर घालतो व माणसे मरतात असे सांगितले जात असे. अंगावर अंतरा-अंतराने आडव्या पांढर्‍या रेषा असलेला भयंकर विषारी साप म्हणजे मण्यार (कांडेर). एके दिवशी वडील दुपारच्या वेळी वामकुक्षी घेत असता त्यांना त्यांच्या खाटेखाली एक मणेरीचं पिल्लू दिसलं. कण्यार विषारी असल्याने त्याला मारणे भाग होते. वडिलांनी त्याला मारले आणि बाहेर टाकण्यासाठी त्यांनी खोलीचे दार उघडले तर दाराच्या खाचीत आणखी एक कणेराचं पिल्लू. दार उघडताना ते खाचीत चिरडले. मग त्यालाही यमसदनाला पाठवावे लागले. घराच्या आसपास बहुधा सर्पिणीने पिल्लं काढली असावी म्हणून मग सगळीकडे शोध घ्यावा लागला.

याहूनही एक भयंकर घटना आमच्या घरीच घडली. आमच्या घरी एक कुत्रा होता. तो कसला ते माहीत नाही. बहुधा गावठीच असावा. परंतु तो अल्सेशियन कुत्र्याप्रमाणे अंगानं चांगला मजबूत होता. त्याला पाहिले असता कुणालाही त्याची भीती वाटे. त्याचा भुंकण्याचा आवाज कानठळ्या बसवणारा होता. नवीन माणसावर तो धावून जात असे म्हणून दिवसा त्याला साखळीने बांधून ठेवावं लागे. त्याचे धिप्पाड शरीर व गुरगुरणे यामुळे सर्वांना त्याची भीती वाटे. आप्पांचा व काकांचा तो खूप लाडका होता. ते त्याला जवळ घेऊन कुरवाळीत व तोही त्यांचे हातपाय चाटत असे.

रात्री तो घराच्या पडवीवर बसून राही व कुणाची चाहूल लागली तर जोरजोरात भुंके. एका रात्री तो असाच भुंकू लागला आणि थोड्याच वेळात भांडणाचा आवाज ऐकू येऊ लागला. वडील जागे झाले आणि खिडकीतून बाहेर पाहू लागले. पाहतात तर काय… आमच्या कुत्र्याचे वाघाबरोबर भांडण चालले होते. वाघाची व त्याची मोठी झटापट चालू होती. वाघ आमच्या कुत्र्यावर पंजे मारीत होता व त्याचा चावा घेण्याचा प्रयत्न करीत होता. पण कुत्राही काही कमी नव्हता. तोही तेवढ्याच ताकदीने प्रतिकार करीत होता. परंतु कितीही झाले तरी वाघ तो वाघच! वाघापुढे कुत्र्याचा टिकाव लागणे मुश्कीलच! एवढ्यात घरातली सर्व माणसे जागी झाली आणि सगळ्यांनीच आरडाओरडा सुरू केला तेव्हा काय झाले कुणास ठावूक, पण कुत्रा वाघाच्या तावडीतून सुटला व धूम पळाला. वाघही डोंगरावर निघून गेला.

आठ दिवस झाले- पंधरा दिवस झाले… कुत्र्याची काहीच खबर कळली नाही. त्याच्या अंगाला वाघाने अनेक ठिकाणी चावा घेतला होता व त्याचे शरीर रक्तबंबाळ झालेले वडिलांनी पाहिले होते. इतके दिवस तो परत आला नाही त्याअर्थी तो मेला असावा असे सर्वांना वाटले. आणि काय आश्‍चर्य! सुमारे महिन्याभराने कुत्र्याची स्वारी घरी हजर! तो जो आला तसा आप्पांच्या पाया पडला. त्यांच्या पायांवर लोळू लागला. आप्पांचे काळीज भरून आले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.

आप्पांनी त्याच्या अंगावरून हात फिरवला. परंतु त्याच्या अंगावरच्या जखमा तशाच होत्या. नदी पार करून दुर्भाट-आडपईकडे जाऊन त्याने आपला जीव वाचवला होता. तिथे त्याच्यावर औषधोपचार कोण करणार? आप्पांनी त्याला औषधोपचार करण्यास सुरुवात केली. परंतु जखमा एवढ्या चिघळल्या होत्या की त्या भरून येणे कठीण होते. त्याचे खाणे-पिणे कमी झाले होते व तो कृश होत चालला होता. त्याचे भुंकणे कमी झाले आणि एके दिवशी त्याने जगाचा निरोप घेतला. सर्वांनाच खूप दुःख झाले. तो गेला तरी सगळ्यांच्या मनात घर करून गेला. वाघालाही तो शरण गेला नाही. त्याच्या लढवय्या वृत्तीचे कौतुक करावे तेवढे थोडेच!