– अभिमन्यू
जॉन फर्नांडिस यांची गोवा प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची बातमी बुधवारी आली तेव्हा कोण हा जॉन फर्नांडिस असा प्रश्न अनेक तरुण पत्रकारांनाही पडला. जॉन फर्नांडिस हे नाव गेल्या १० वर्षांत या पत्रकारांनीही कधी ऐकले नव्हते असे त्यांचे म्हणणे आहे. २००७ ते २०१२ अशी पाच वर्षे गोव्यात कॉंग्रेसची सत्ता होती. त्यापूर्वी प्रतापसिंह राणे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे सरकार होते. मात्र या आठ वर्षांत जॉनचे नाव कधीच आले नव्हते. त्यामुळे कोण हा जॉन असा प्रश्न पत्रकारांनाही पडणे साहजिकच होते. पत्रकारांनाच ज्याचे नाव माहीत नाही त्या जॉनबद्दल सर्वसामान्य तरुणांना काय माहिती असणार?
कॉंग्रेसचे माजी प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी यांच्या कृपेने राज्यसभा सदस्य बनलेले जॉन फर्नांडिस यांनी खासदारकी संपल्यानंतर पक्षासाठी काहीच केल्याचे ऐकलेले नाही. गोव्याला घटकराज्याचा दर्जा मिळाल्यानंतर गोव्याला राज्यसभेवर प्रतिनिधित्व मिळाले. गोव्याला घटकराज्य मिळाले तेव्हा गोव्यात कॉंग्रेसची सत्ता होती. त्यामुळे एखाद्या ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्याला राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय झाला. ज्येष्ठ कॉंग्रेस नेते ऍड. पांडुरंग मुळगावकर यांचे नाव निश्चित झाले. युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष या नात्याने जॉन फर्नांडिस यांचे राजीव गांधींजवळ निकटचे संबंध होते. त्याचा लाभ घेऊन ऍड. मुळगावकर यांना डावलून ऐनवेळी जॉनचे नाव पुढे करण्यात आले. त्यांना मतदान करण्याचा व्हिप काढण्यात आल्याने जॉन ध्यानीमनी नसताना सर्वात तरुण राज्यसभा सदस्य बनले. आपल्या कारकिर्दीत जॉन यांनी खासदार विकास निधीचा सर्वात कमी वापर केला. आपल्याला आमदारांनी निवडून दिलेले असल्याने सर्वसामान्य नागरिकांशी आपले काहीच देणे नाही अशा थाटात ते वागले. त्यामुळे खासदार विकास निधीचा वापर करण्याची गरज त्यांना भासली नाही. स्थानिक कॉंग्रेस नेत्यांशी त्यांचा संपर्क नव्हता. त्यामुळे आमच्या गावात एखादा विकास प्रकल्प हाती घ्या अशी विनंती करायला त्यांच्याकडे कोणी पोचलाच नाही. राज्यसभा सदस्याला संपूर्ण गोव्यात विकास योजना राबविणे शक्य होते; मात्र जॉन फर्नांडिस यांनी काही अपवाद वगळता इतर कोणत्याही योजना हाती घेतल्या नाहीत.
राज्यसभा सदस्य म्हणून ऍड. शांताराम नाईक यांची निवड झाल्यावर जॉन फर्नांडिस यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. २००७ किंवा २०१२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जॉन फर्नांडिस कधीच दिसले नाहीत. कॉंग्रेस कार्यालयाखाली असलेल्या गोपी नाईक यांच्या दुकानावर जॉन नेहमी दिसायचे. पण गेल्या काही वर्षांत त्या दुकानावरही जॉन फारसे दिसले नाहीत. गोवा प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष, गोवा प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आलेले जॉन फर्नांडिस कॉंग्रेसच्या व्यासपीठावर कधीच दिसले नाहीत. कॉंग्रेस भवनात होणारी इंदिरा गांधी जयंती आणि पुण्यतिथी, राजीव गांधी जयंती आणि पुण्यतिथी या कार्यक्रमांना पूर्वी जॉन फर्नांडिस न चुकता हजर असायचे. पण गेल्या पाच-सहा वर्षांत ते कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे कॉंग्रेस नेत्यांनाच त्यांचा विसर पडला. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनाच त्यांचा विसर पडल्याने नव्या पिढीला त्यांची माहितीच नाही. अशा या नेत्याची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने लोकांना आश्चर्य वाटणे साहजिक आहे.
मार्च २०१२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे पार पानिपत झाले. या पराभवाला कॉंग्रेस सरकारचा भ्रष्टाचारी कारभार प्रामुख्याने जबाबदार होता. मात्र पराभवाचे खापर प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिरोडकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा श्रेष्ठींना सादर केला. पण पावणेदोन वर्षे झाली तरी कॉंग्रेसश्रेष्ठींना नवा अध्यक्ष सापडला नाही. या दरम्यान गोवा कॉंग्रेस प्रभारी म्हणून दिग्विजय सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. गोवा प्रदेश कॉंग्रेसची फेररचना करून कॉंग्रेसकार्याला ते संजीवनी देतील असा श्रेष्ठी तसेच स्थानिक नेत्यांचा अंदाज होता. गोव्यातील कॉंग्रेस नेत्यांच्या कारभाराला ते एवढे कंटाळले की त्यांनी गोव्याचा कारभार चेल्लाकुमार यांच्यावर सोपवून मोकळे झाले. कळंगुटचे माजी आमदार आग्नेलो फर्नांडिस यांना अध्यक्ष करावे अशी विनंती कॉंग्रेसच्या आमदारांनी केली. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनीही तयारी केली. त्यामुळे चल्लाकुमारही गोंधळून गेले.
दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांना अध्यक्ष करण्याचा कॉंग्रेसश्रेष्ठींचा विचार होता. मात्र त्यांना लोकसभेचे तिकीट हवे होते, त्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. विरोधी पक्षनेता हिंदू असल्याने प्रदेश कॉंग्रेसचा अध्यक्ष ख्रिश्चनच हवा असा श्रेष्ठींचा आग्रह होता. तसा विश्वासू नेता न सापडल्याने अखेर जॉन फर्नांडिस यांचे नाव चेल्लाकुमार व दिग्विजय सिंग यांनी पुढे केले. गांधी घराण्याशी त्यांची निष्ठा संशयातीत आहे. त्यामुळे अखेर त्यांच्या नावाला श्रेष्ठींची मान्यता मिळाली. गोवा मुक्तिदिनी या नव्या अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीत गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी जॉन यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. उत्तर भारतातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची जी बिकट परिस्थिती झाली आहे ते पाहता गोव्यात कॉंग्रेस दक्षिण गोव्याची जागा राखू शकेल की काय याबद्दल शंका आहे.
गोवा प्रदेश कॉंग्रेसने गोव्यातील दोन्ही मतदारसंघांसाठी प्रत्येकी चार याप्रमाणे आठ नावे पाठविली आहेत. उत्तरेत रमाकांत खलप आणि दक्षिणेत फ्रान्सिस सार्दिन यांच्या नावांना प्रथम पसंती देण्यात आली आहे. अर्थात या यादीला श्रेष्ठींच्या नजरेत काहीच महत्त्व नाही. श्रेष्ठींना वाटले तर यादीत नाव नसलेल्या व्यक्तीलाही तिकीट मिळू शकेल. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर युती नको असे प्रदेश कॉंग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. उत्तर गोव्याची जागा राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे असा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नीळकंठ हळर्णकर यांचा आग्रह आहे. अर्थात गोव्यातील नेत्यांचा कोणताही आग्रह असला तरी युतीचा आणि जागा वाटपाचा निर्णय सोनिया गांधी आणि शरद पवार घेणार आहेत. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्याची जागा राष्ट्रवादीला मिळाली होती. पण उमेदवार नसल्याने जितेंद्र देशप्रभू यांना दत्तक घेण्यात आले होते. कॉंग्रेस नेत्यांनी देशप्रभू यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम न केल्याने त्यांचा पराभव झाला. दरम्यानच्या काळात देशप्रभू स्वगृही परतले असून आता कॉंग्रेसचेच तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
भाजपाचे आमदार विष्णू सूर्या वाघ यांना राष्ट्रवादीत आणून लोकसभा तिकीट देण्यासाठी राष्ट्रवादीचे गोवा प्रभारी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर प्रयत्नशील होते. श्रीपाद नाईक यांच्याशी टक्कर देण्यासाठी भंडारी समाजाचाच उमेदवार हवा असे केसरकर यांचे मत होते. मात्र आता राजकीय वातावरण बदलले असून दीपक केसरकर सध्या गोव्याच्या राजकारणात कोणताच रस घेत नाहीत. श्रीपाद नाईक यांच्याशी टक्कर देण्यासाठी गिरीश चोडणकर यांच्या नावाचाही उत्तर गोव्याच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. गिरीश चोडणकर हे राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू बनले असून त्यामुळेच त्यांना अ. भा. कॉंग्रेसचे चिटणीस करण्यात आले आहे. त्यामुळे गिरीश चोडणकर यांना उत्तर गोव्याचे तिकीट मिळाल्यास आश्चर्य वाटण्याची गरज नाही.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला महाराष्ट्र राज्यात युती करावीच लागेल. युती न केल्यास महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युती आघाडी मिळवील. महाराष्ट्रात युती झाली तर गोव्यातही युती होणे अपरिहार्य आहे. युती झाली तर दक्षिण गोव्यात कॉंग्रेसला लाभ मिळेल. उत्तर गोव्यात कोण उमेदवार असेल त्यावर बर्याच गोष्टी अवलंबून आहेत. युती झाली आणि उत्तर गोव्याची जागा राष्ट्रवादीला सोडली तर कॉंग्रेसवाले त्यांच्यासाठी काम करणार नाहीत. युती झाली नाही तर राष्ट्रवादी दक्षिण आणि उत्तर या दोन्ही मतदारसंघांत भाजपा उमेदवाराला मदत करण्याची बरीच शक्यता आहे. तसे घडले तर कॉंग्रेसचे नुकसान अटळ आहे. या दोन पक्षांतील भांडणाचा लाभ भाजपाला मिळेल असे दिसते. भाजपाचे दक्षिण गोव्यातील उमेदवार नरेंद्र सावईकर यांच्या कुंडलीत पुढील वर्षी राजयोग दिसतो.
जॉन फर्नांडिस यांना अध्यक्षपद बहाल करण्यात आल्याने कॉंग्रेसमध्ये नाराजीचा सूर दिसतो. गोवा मुक्तीनंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. आता परत तशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. नूतन अध्यक्षांचा कॉंग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांशी मुळीच संपर्क नाही. कारण गेल्या दहा वर्षांत ते पक्षकार्यात मुळीच सहभागी झालेले नाहीत. पक्षाच्या आमदारांशी त्यांचा कोणताच संबंध नाही. गांधी घराण्याशी असलेली निष्ठा विचारात घेऊन त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालण्यात आलेली आहे. श्रेष्ठींच्या या निवडीवर आमदारांपासून तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत सर्वच कॉंग्रेसजन नाराज आहेत. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या राखेतून नव्याने पक्ष उभारण्याचे काम नव्या अध्यक्षांना जमेल असे कॉंग्रेसजनांना वाटत नाही. एक प्रकारची नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली असून त्याचा परिणाम लोकसभा निवडणूक आणि कॉंग्रेसच्या एकूण कार्यावर होणार आहे.
राष्ट्रीय पातळीवरील राजकारण गाजविणारे गोवा प्रभारी दिग्विजय सिंग गोवा प्रदेश कॉंग्रेसला नवसंजीवनी देतील अशी सगळ्यांचीच अपेक्षा होती; मात्र त्यांनी केलेली अध्यक्षाची निवड पाहता त्यांना गोव्यातील राजकारणाची नाडी कळलेली नाही असेच म्हणावे लागते. सुदीप ताम्हणकर यांना अध्यक्ष केले असते तरी कॉंग्रेसची कामगिरी सुधारली असती अशी चर्चा खुद्द कॉंग्रेस भवनात चालू आहे. गोवा प्रदेश कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष पुरुषोत्तम काकोडकर यांच्या तालमीत जॉन तयार झालेले असले तरी पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी आवश्यक असलेला एकही गुण त्यांच्याजवळ नाही. आज घडीला कॉंग्रेसमध्ये नेते अधिक आणि कार्यकर्ते कमी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. माजी मुख्यमंत्र्यांची संख्या अर्ध्या डझनावर आहे. त्याशिवाय ज्येष्ठ नेत्यांची तर रांगच लागलेली आहे. या सर्व नेत्यांना एकसंध करण्याची कामगिरी जॉन फर्नांडिस यांना जमेल असे वाटत नाही. तळागाळातील बर्याच कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गेल्या दोन वर्षांत पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. त्यांना परत पक्षात आणून कार्यरत करण्याचे कठीण काम जॉन फर्नांडिस यांना करायचे आहे. हे काम त्यांना जमेल असे वाटत नाही. त्यामुळे पक्षाची अधोगती आता कोणी थांबवू शकणार नाही.