वाघ यांची प्रकृती आता सुधारू लागलेली असून तीन दिवसांनंतरच्या पूर्ण विश्रांतीनंतर काल वाघ यांच्या समर्थकांना व मित्रांना त्यांची भेट घेण्यास परवानगी देण्यात आली.
काल या प्रतिनिधीने वाघ यांच्याशी संवाद साधला असता वाघ म्हणाले की मी एक आमदार असतानाही हल्ल्यानंतर मला एका अत्यंत सामान्य माणसासारखी वागणूक देण्यात आली.
मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असतानाही हल्ल्यानंतर एकाही वरिष्ठ पोलीस अधिकार्याने घटनास्थळी अथवा म्हापसा पोलीस स्थानकावर भेट देऊन माझे म्हणणे ऐकून घेण्यची तसदी घेतली नाही. माझी तक्रार नोंदवून घेतली ती निरीक्षकाने. खरे म्हणजे उत्तर गोवा अधीक्षकाने घटनास्थळी अथवा किमान पोलीस स्थानकावर भेट द्यायला हवी होती. पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक आदीनीही पाठच फिरवली. कुणाच्या तरी आदेशावरूनच त्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली असावी असे म्हणण्यास वाव असल्याचे ते म्हणाले.
तपासकामाला वेग नाही
माझ्यावर प्राणघातक असा हल्ला झाला. ज्या पध्दतीने व नियोजनबध्द रितीने हा हल्ला झाला तो पाहता माझी हत्या करण्याचाच त्यांचा विचार होता असे दिसते. माझे दैव बलवत्तर म्हणून मी वाचलो. गाडीच्या मागच्या बाजूने जो प्रचंड मोठा दगड घालण्यात आला तो मागची कांच फुटून गाडीत कोसळला. तो माझ्यावर कोसळला असता तर मी गाडीतच ठार झालो असतो. सगळ्यांना त्याची कल्पना आहे. मात्र, असे असतानाही या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी का केली जात नाही.
माझ्यावर हल्ला केलेल्यांना शिक्षा व्हायला हवी. मला न्याय मिळायला हवा. पुढचे तीन दिवस मी वाट पाहणार आहे. पुढची कृती त्यानंतरच ठरवणार असल्याचे वाघ यांनी सांगितले.
आमदारकीच्या राजीनाम्याची अफवा
आमदार विष्णू वाघ हे आपणावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी करीत असल्याची अफवा काल पणजीत पसरली होती. मात्र, प्रत्यक्ष विष्णू वाघ यांनाच त्याविषयी विचारले असता त्यांनी आपला राजीनामा वगैरे देण्याचा कोणताच विचार नसल्याचे सांगितले. या घडीला मी बर्फासारखा थंड आहे. मी माझे सगळे लक्ष केंद्रित केले आहे ते माझ्या आरोग्याकडे. येथे इस्पितळात उपचार चालू असताना राजकारणाबद्दल आपण जराही विचार करीत नसल्याचे ते म्हणाले.आपल्या हल्लेखोरांवर काय कारवाई केली जाते तिकडे मात्र आपले लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर लोकसभेचा निवडणूक लढवण्याचा विचार करीत असल्याची अफवा भाजपनेच पसरविली होती. आता आपण आमदारकीचा राजीनामा देण्याचा विचार करीत असल्याची जी अफवा आहे तिही भाजपनेच उठवली असावी, असे ते म्हणाले.
वाघांवरील हल्ल्याचा भाजपच्या बैठकीत निषेध
सांत आंद्रे मतदारसंघाचे आमदार विष्णू वाघ यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करणारा ठराव काल भाजपच्या येथे झालेल्या बैठकीत संमत करण्यात आला.
उद्योगमंत्री महादेव नाइर्ंक यांनी हा ठराव मांडला व तो सर्वानुमते संमत करण्यात आला. या हल्ल्यात ज्यांचा हात आहे त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी या ठरावाद्वारे करण्यात आली. १२ जानेवारी रोजी गोव्यात भाजपचे प्रधानमंत्रीपदासाठीचे उमेदवार व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. कांपाल येथे होऊ घातलेल्या या सभेविषयी आखणी करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
आणखी अटक नाही
वाघ यांच्यावर हल्लाप्रकरणी अवधूत ऊर्फ कामू हळर्णकर या संशयितास म्हापसा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. तर या प्रकरणातील इतर संशयित पकडण्यास पोलिसांना अजून यश आलेले नाही. काही हल्लेखोर राज्याबाहेर गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यांचा शोध म्हापसा पोलीस घेत आहेत. म्हापसा पोलिसांनी अवधूत हळर्णकर (५३) कोलवाळ यांना संशयावरून अटक केली आणि त्याला पाच दिवसासाठी पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. अवधूत हळर्णकर यांना गुन्हा नसतानाही त्याला अटक केल्या प्रकरणी थिवी मतदारसंघातून अवधूत हळर्णकर यांच्याबाजूने त्याना अटक केल्या प्रकरणी निषेध करण्यात येत आहे.एवढे दिवस उलटून गेले तरी इतर संशयितांना अटक होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यातील काही संशयित राज्याबाहेर गेल्याची माहिती म्हापसा पोलिसंना मिळाल्याचे समजते.
सभेच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी
गोवा वेल्हा येथील निषेध सभेवेळी जवळील राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबून राहिली. रस्त्याच्याकडेला दोन्ही बाजूनी पार्किंग केलेल्या वाहनांमुळे ही कोंडी निर्माण झाली. सभेला उपस्थित असलेल्या पोलिसांनी ही वाहने चालकांना ती तेथील मैदानावर हलविण्याची विनंती केल्यानंतर वाहने मैदानात पार्क करण्यात आली व वाहतुकीची कोंडी सुटली. मोठ्या संख्येने लोक सभेला हजर होते.