Home बातम्या सामाजिक बांधिलकीचा सन्मान

सामाजिक बांधिलकीचा सन्मान

0

– वसंत आबाजी डहाके 

या वेळच्या साहित्य अकादमी पुरस्काराचं वृत्त पाहिलं आणि ऐकलं. ते पाहून मनस्वी आनंद झाला. मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक सतीश काळसेकर आणि चित्रसृष्टीमध्ये अर्थघन गीतांमुळे लोकप्रिय झालेले प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना या वेळचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. आपल्या गीतलेखनातून सामाजिक बांधिलकी जोपासणार्‍या या दोन्ही कवींना पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद मनात दाटतो आहे. त्यांच्याविषयी आणि त्यांच्या गीतलेखनाविषयी बोलावं तेवढं थोडंच आहे. या दोन्ही कवींनी गीतलेखन करताना सामान्य माणसाच्या जाणीवा-नेणिवांना अग्रस्थान दिलं. 

साहित्यात काव्य प्रकारातील एकंदर चित्र पाहिलं तर बहुतांश कवी प्रेम, विरह, मीलनाचा आनंद, प्रेमात होणारी तडङ्गड इत्यादी भावनांना प्राधान्य देत असल्याचं दिसतं. पण, या दोन्ही कवींची कविता त्यापेक्षा वेगळी आहे. प्रेम हे प्रत्येकाच्या मनात केव्हा ना केव्हा अंकुरत असतं. नंतर त्याला धुमारे ङ्गुटतात. ते बहरतं किंवा कोमेजून जातं. असा प्रकार सामान्यांपासून ग्लॅमरमध्ये असणार्‍यांपर्यंत अनेकांच्या बाबतीत कधी ना कधी होत असतो. पण, त्या पलीकडेही सामान्य माणसाचे काही प्रश्‍न असतात, प्रेमाच्या मर्यादांपलीकडे सामान्यांचं भावविश्‍व असतं, या ना त्या कारणाने त्यांच्या भावनांचा अनेकदा कोंडमारा होत असतो, त्यांच्या प्रश्‍नांची दखल घ्यायला कोणी तयार होत नाही, स्पर्धेच्या युगात धावता धावता तो पिचून निघतो आणि एक दिवस थकल्या-भागल्यानंतर तो चिरविश्रांती घ्यायला निघतो. सामान्यांचं हे भावविश्व या दोन्ही कवींनी आपल्या कवितेतून उलगडलेलं दिसतं.
सतीश काळसेकर हे माझे जवळचे मित्र आहेत. त्यामुळे एका मित्राचा गौरव झाल्यावर दुसर्‍या मित्राला जो आनंद होतो तो मलाही झाला. पण, या आनंद होण्यामागे ङ्गक्त मैत्रभाव नाही तर साहित्यभावही आहे. एक साहित्यिक म्हणून काळसेकर यांच्या लेखनाकडे पाहताना त्यांच्या लेखनातील खोली, मर्मभेदकता, जाणिवा-नेणिवांना हात घालण्याची अङ्गलातून शैली हे सारं जाणवत राहतं. वाचकांना काय आवडेल ते लिहिण्याचा विचार करण्याऐवजी त्यांनी मनाला काय भिडतं ते लेखनातून मांडण्याचा प्रयत्न सातत्याने केला. लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी कधीच केला नाही. अनेक ठिकाणी लेखन केल्याने लोकप्रिय होण्याची संधी मिळूनही मनाला पटत नसल्याने काळसेकर यांनी तेथे लेखन करण्याचं नाकारलं.
सतीश काळसेकर यांनी कविता लेखनाबरोबरच वाङ्‌मय वृत्ताचं संपादन केलं. त्यांनी लोकवाङ्‌मयाचं काम पाहिलं आहे. कोणतंही काम स्वीकारताना काळसेकर यांची त्यामध्ये स्वत:ची अशी ठाम भूमिका असते. त्या भूमिकेशी ते कधीच तडजोड करत नाहीत. लेखनातून पैसा कसा मिळेल याचा हिशेब न करता मनोधारणेशी सुसंगत असणारं लेखनच त्यांनी केलं. त्यांची भूमिका अनियतकालिकाच्या चळवळीतून तयार झाली आहे. १९६० ते १९८० च्या दशकात या अनियतकालिकांनी प्रस्थापित साहित्यव्यवहाराचा प्रतिवाद करणारी भूमिका घेतली होती. वाङ्‌मय हे शुद्ध कलावादी असतं हे सतीश काळसेकर यांच्यासारख्या काही मोजक्या साहित्यिकांना अमान्य आहे. कोणतीही साहित्यकृती ही कोणत्याही निर्वात पोकळीत तयार होत नाही असं त्यांचं म्हणणं असतं. कोणत्याही साहित्यकृतीला सामाजिक, राजकीय व्यवहाराचा आधार असतो असं त्यांचं मत आहे. त्यांच्यासारख्या साहित्यिकांनी मांडलेल्या चौकटी सर्व साहित्यप्रकारांना लागू होतात. त्यामुळे कला ही जीवनवादी असावी असं त्यांचं मत असून त्यामध्ये काहीही गैर नाही.
सतीश काळसेकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ते साहित्याच्या मुख्य प्रवाहापासून थोेडे दूर खेचले गेले. पण त्याची खंत त्यांना नाही. मुख्य प्रवाहात येण्यासाठी आपल्या भूमिकेशी तडजोड करणं त्यांना मान्य होणार नाही. सामाजिक अंगाने विचार करून उत्तम असं लेखन समोर आणायला हवं असं त्यांचं म्हणणं असतं. प्रस्थापित साहित्य व्यवहाराच्या पलीकडे जाऊन परिघावर काय चाललं आहे हे शोधण्याचा प्रयत्न काळसेकर नेहमी करतात. त्यामुळे त्यांच्यासारख्या साहित्यिकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद झाला.
जावेद अख्तर यांच्याविषयी मी काय बोलणार? सार्‍या देशात ते प्रसिद्ध आहेत. त्यांना मी एक-दोन कार्यक्रमांच्या निमित्ताने भेटलो आहे. पण, काळसेकर यांची आणि माझी जेवढी दाट ओळख आणि स्नेह आहे तसा तो अख्तर यांच्याविषयी नाही. पण, त्यांच्या लेखनाचा मी चाहता आहे. हिंदी चित्रपटात गीत लिहितानाही त्यांनी त्यातील सामाजिक बांधिलकी कायम ठेवली. केवळ प्रेक्षकांना रुचेल  म्हणून वाट्टेल ते शब्द त्यांनी कधी लिहून दिले नाहीत. तरीही त्यांच्या गीतांनी अङ्गाट लोकप्रियता मिळवली. गीतकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत तसेच लेखक म्हणूनही त्यांची ओळख आहे. सलिम-जावेद या जोडीने एके काळी प्रेक्षकांच्या मनावर काय गारुड केलं ते सार्‍यांनाच माहीत आहे. गद्य लेखन थांबवून अख्तर गीतलेखनाकडे वळले त्यावेळी त्यांनी आपल्या मनाच्या आरशात काय प्रतिबिंबित होत आहे ते मांडण्यालाच प्राधान्य दिलं. त्यांना मिळालेली लोकप्रियता त्यांच्या शब्दांनी मिळवून दिली. तरीही त्यांना प्रसिद्धीच्या वलयात येण्याचा हव्यास कधीच नसतो. जे मन सांगतं तेच मांडण्याचा प्रयत्न ते प्रत्येक गीतातून करत असतात.
नवोदित लेखक-गीतकारांना मार्गदर्शन करण्याचं कामही अख्तर करत असतात. आपल्या मोठेपणाचा अहं त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कधी दिसत नाही. आजची गीतं, त्याची मांडणी याविषयी ते नापसंती व्यक्त करतात. आज गीताला प्राधान्य कमी आणि संगीताच्या धूमधडाक्याला जास्त अशी भावना ते व्यक्त करतात. आजच्या दणदणाटी संगीतात अनेकदा गीताचे बोल काय आहेत हे ऐकूच येत नसल्याचं ते सांगतात. पूर्वीच्या संगीताबरोबरच गीताचे बोलही प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घ्यायचे. आज मात्र तसं होताना दिसत नाही. अनेकदा बोल ऐकूच येत नसल्याने ते प्रेक्षकांच्या स्मरणात कसे राहणार असा प्रश्‍न ते करतात आणि ते बरोबरही आहे. आज गुलजार, जावेद अख्तर यांच्यासारखे मोजकेच कसदार गीतकार आसपास आहेत. त्यांच्या गीतांचे बोल कधी विस्मरणात जाणार नाहीत. असो! काळसेकर आणि जावेद अख्तर यांना मिळालेल्या ताज्या पुरस्काराने हा पुरस्कार मोठा झाला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.