नवा मोटरवाहन कायदा १ मे पासून

0
154

राज्यात नव्या मोटर वाहन कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी येत्या १ मे २०२१ पासूनच केली जाणार आहे अशी माहिती वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी काल दिली. दरम्यान, येत्या १६ एप्रिलपासून नव्या कायद्यासंदर्भात जनजागृती केली जाईल. यासंबंधीचा आदेश वाहतूक संचालक राजन सातर्डेकर यांनी जारी केला आहे.

राज्यात गेल्या वर्षभरापासून सुधारित मोटर वाहन कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चर्चा सुरू आहे. कोरोना महामारी, राज्यातील खराब रस्त्यांचे कारण देत सुधारित मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्यात आली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील रस्त्याच्या खराब स्थितीमुळे सुधारित कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध करण्यात आला होता. सुधारित मोटर वाहन कायद्यानुसार वाहतूक नियमांचा भंग केल्यास पाचपट दंड आकारण्याची तरतूद आहे. दुचाकी, तीन चाकी वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणार्‍याला पहिल्या वेळी १५०० रुपये दंड ठोठावला जाणार असून दुसर्‍या वेळी १० हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे. तर, चार चाकी वाहनासाठी पहिल्या वेळी ३ हजार आणि दुसर्‍या वेळी १० हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे.

वाहन चालविताना आसनपट्टा न वापरणार्‍याला १ हजार रुपये दंड, विनाकारण हॉर्न वाजविणार्‍याला १ हजार रुपये दंड, रुग्णवाहिकेला वाट न देणार्‍याला १० हजार रुपये दंड, निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणार्‍याला १,५०० रुपये दंड, विना हेल्मेट, विना परवाना वाहन चालविणार्‍यालाही मोठ्या दंडाची तरतूद नव्या कायद्यात आहे. टॅक्सी ऍग्रीगेटर सेवांना परवाने, डिजिटल मीटर आदींची कार्यवाहीही नव्या कायद्यानुसार अनिवार्य आहे.