>> आलेक्स रेजिनाल्ड यांची माहिती
राज्यातील वेर्णा आणि लाटंबार्से या दोन औद्योगिक वसाहतींच्या विकासाला प्राधान्य दिले जाणार आहे. या दोन्ही औद्योगीक वसाहतींतील रस्ते, पाणी, साधनसुविधा आदी कामांना प्राधान्यक्रम दिला जाणार आहे, अशी माहिती औद्योगिक विकास महामंडळाचे (आयडीसी) अध्यक्ष तथा आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी आयडीसी संचालक मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
या वसाहतीमध्ये रस्ते व इतर साधन सुविधांचा अभाव असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत मूलभूत साधनसुविधांवर विचारविनिमय करून त्या जलदगतीने मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही रेजिनाल्ड यांनी सांगितले.
वेर्णा औद्योगिक वसाहतीतील सेझ जमीन विक्रीची प्रक्रिया सुटसुटीत व पारदर्शक केली जाणार आहे. मंडळाच्या बैठकीत कोळसा खाणींचा विषय चर्चेला आला. गोव्याकडे कोळसा खाण नाही. मध्यप्रदेशमधील कोळसा खाण सुध्दा गमावली आहे. आम्ही सरकारकडे कोळसा खाणींबाबत प्रस्ताव सादर केला आहे, असेही रेजिनाल्ड यांनी सांगितले.