दोन्ही जिल्ह्यांतील संचारबंदीत वाढ करण्याचा आदेश जारी

0
128

राज्यात कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमध्ये वाढ करणारा आदेश उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हाधिकार्‍यांनी काल जारी केला.

राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे २४ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदीचा आदेश जारी करण्यात आला होता. आता, संचारबंदी ३१ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या २१ मे रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत राज्यातील संचारबंदीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट न झाल्याने संचारबंदी आणखी वाढविण्याची मागणी केली जात होती. राज्यात मागील आठ दिवसांपासून नवीन बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३१ ते ३५ टक्के दरम्यान खाली आले आहे.

यापूर्वी चाळीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत नवीन रुग्ण आढळून येत होते. दररोजचे नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण आणखी कमी होण्याची गरज आहे. तसेच, राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये घट झालेली नाही. संचारबंदीच्या काळात सकाळी ७ ते दुपारी १ या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. हॉटेलमधून पार्सल सेवा सुरू आहे. राज्याला तौक्ते या वादळाने जोरदार तडाखा दिल्याने घर दुरुस्तीसाठी आवश्यक सामान उपलब्ध असलेली हार्डवेअरची दुकाने खुली करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.