दहावीची परीक्षा रद्द, १२ वीबाबत बुधवारपर्यंत निर्णय

0
130

>> अंतर्गत गुणांच्या आधारे निकाल

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

राज्य सरकारने कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची १० ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीचा निकाल अंतर्गत गुणांच्या आधारावर जाहीर केला जाणार आहे. तर, या मंडळाच्या १२ वीच्या परीक्षेबाबत येत्या बुधवार २६ मेपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेला संबोधित केलेल्या भाषणात काल दिली.

दहावीच्या परीक्षेबाबत निर्णय घेण्यासाठी शालांत मंडळ, शिक्षण खाते आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची एक समिती निवडण्यात आली होती. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा घेणे कठीण असल्याने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत गुणांच्या आधारावर जाहीर केला जाणार आहे. या अंतर्गत गुणांच्या आधारे जाहीर करण्यात येणार्‍या निकालामध्ये एखादा विद्यार्थी एखाद्या विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास त्या विद्यार्थ्याला एटीकेटीचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत पालक, विद्यार्थी यांच्याकडून वारंवार विचारणा केली जात होती. या दोन्ही परीक्षांमुळे विद्यार्थी व पालकांवर ताण वाढत चालला होता, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

अकरावीच्या प्रवेशासाठी
तीन तासांची परीक्षा

दहावीनंतर पुढील अकरावी वर्गातील प्रवेशासाठी विज्ञान शाखा आणि पदविका शाखेतील प्रवेशासाठी तीन तासांची एक परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा साधारण जुलै महिन्याच्या अखेरीस घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या तारखेची घोषणा १५ दिवसांपूर्वी केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंहसोबत
व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या शिक्षणाशी संबंधित एका उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सहभाग घेतला. या बैठकीत दहावी, बारावीच्या परीक्षेबरोबर नीट, जेईई आदी परीक्षांवर चर्चा करण्यात आली आहे. केंद्र सरकार या परीक्षाबाबत दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

१२ वीबाबत निर्णय २६ मेनंतर
राज्यातील १२ वीच्या परीक्षेबाबत अजूनपर्यत निर्णय घेण्यात आलेला नाही. केंद्रीय पातळीवर जेईई, नीट आदी परीक्षाबाबत निर्णयानंतर झाल्यानंतर राज्यातील १२ वीच्या परीक्षेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. येत्या बुधवार २६ मेपर्यंत निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

कामत, सावईकरांकडून स्वागत

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी स्वागत केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच बारावीच्या परिक्षेबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे कामत यांनी म्हटले असून सरकारने आगामी शैक्षणिक वर्षासाठी सर्व स्तरांसाठीचा कृती आराखडा तयार करावा, अशी सूचनाही कामत यांनी केली आहे. शिक्षणासंबंधीचे सर्व निर्णय हे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच घेतले जावेत, असेही कामत यांनी म्हटले आहे.
सरकारने आता ऑनलाइन प्रवेश परीक्षा तसेच योग्यता चाचणी परीक्षांसाठी व्यवस्थित नेटवर्क सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे कामत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दहावी इयत्तेच्या परीक्षा रद्द करण्याचा गोवा सरकारच्या निर्णयाचे दक्षिण गोव्याचे माजी खासदार व भाजप नेते नरेंद्र सावईकर यांनी स्वागत केले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने योग्यच निर्णय घेतला असल्याचे सावईकर यांनी म्हटले आहे.